Friday, April 25, 2025
Homeसाप्ताहिककोलाजमत्स्य पुराण!

मत्स्य पुराण!

सतीश पाटणकर

‘ईतुक्या लवकर येई न मरणा, मज अनुभवू दे या सुखक्षणा’ अशी कामना करणाऱ्या कविवर्य बा. भ. बोरकरांनी ‘दिवसभरी श्रम करीत राहावे, मासळीचा सेवीत स्वाद दुणा’ अशी ‘सुख-क्षणा’ची कल्पना आपल्या कवितेतून केली होती. मात्र माशांचा वास नको म्हणून एकीकडे सोसायटीतील घरे नाकारणारी लॉबी आहे, तर दुसरीकडे स्वयंपाकघरातील झणझणीत कालवणाच्या निव्वळ वासाने तरतरी येणारेही आहेत. कुरकुरीत भाजलेले बोंबिल, मसाला भरलेले पापलेट, तळलेली सुरमई, घमघमीत कोळंबी बिर्याणी… स्वयंपाकघरातून जेवणाच्या ताटापर्यंत होणारा माशांचा प्रवास जसा रंग, रूप, वासाचे अनोखे दालन खुले करून देतो तसाच समुद्रापासून घरापर्यंत माशांचा होणारा प्रवासही अतिशय मनोरंजक आहे.

मुंबई आणि ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पश्चिम किनारपट्टीवर रोज येणाऱ्या माशांची संख्या डोळ्यांना दिसली तरी मेंदूत गणित उतरायला वेळ लागतोच. वर्षभरात या संपूर्ण किनारपट्टीवर साधारण पाच लाख मेट्रिक टन मासा उतरतो. या माशातील ३५ हजार मेट्रिक टन वाटा एकट्या ससून डॉकचा. भाऊच्या धक्क्यावरही साधारण तेवढेच मासे उतरतात. यातील दीड लाख मेट्रिक टन मासे पूर्व आणि पश्चिमी देशांमध्ये जातात. याचाच अर्थ वर्षाला साधारण साडेतीन लाख मेट्रिक टन म्हणजे दिवसाला दहा मेट्रिक टन किंवा दहा लाख किलो मासे स्थानिक बाजारपेठेत येतात. त्यात अर्थातच मुंबईचा वाटा पन्नास टक्क्यांहून अधिक आहे. रात्री समुद्रावर जायचे आणि भल्या पहाटे मासे घेऊन किनाऱ्याला यायचे ही पद्धत मागे पडून जमाना झाला आहे. किनाऱ्याजवळ मासे सापडण्याचे कमी झालेले प्रमाण आणि मोठ्या होड्यांसाठी डिझेलचा वाढलेला खर्च यामुळे समुद्रात गेलेल्या लहान होड्या साधारण तीन ते चार दिवसांनी परततात.

भाऊचा धक्का आणि ससून डॉकवर येणाऱ्या ट्रॉलरची रीत तर आणखीन न्यारी. खोल समुद्रात मासे पकडण्यासाठी गेलेली जहाजे किनाऱ्यावर येतच नाहीत. इन्सॅट बी या उपग्रहावरून समुद्रातील माशांच्या थव्याची नेमकी माहिती अक्षांश-रेखांशासह पोहोचवली जात असल्याने एकाच वेळी टनावारी मासे जहाजात जमा होतात. या जहाजांना डिझेल आणि अन्नाचा पुरवठा करून त्यांच्यावरील मासे परत घेऊन येण्याची कामगिरी मदरशिपवर असते. या बलाढ्य जहाजावरून साधारण १५ दिवसांनी किनाऱ्यावर माशांचा डोंगर ओतला जातो. माशांचे प्रमाण वाढले की, व्यापाऱ्यांकडून बोलीची रक्कम कमी होत असल्याने समुद्रातच सॅटेलाइट फोनवरून कोकण किनारपट्टीवरील माशांची चौकशी करून त्याप्रमाणेच माल किनाऱ्यावर आणला जातो. जहाजावरच माशांची वर्गवारी केली जाते. त्यातील पापलेट, कोळंबी असा चांगला, दर्जेदार माल पश्चिमी देशांसाठी रवाना होतो. पूर्वेकडील चीन, तवान, कोरिया, इंडोनेशिया अशा देशांमध्ये चिरी, बघा, शेवंडी, तारली असा थोडा कमी किमतीचा माल दिला जातो.  सर्वच मासे एका दिवसात विकले जात नाहीत. बुधवार, शुक्रवार आणि रविवारी माशांची किरकोळ विक्री तेजीत असते. याउलट मंगळवार, गुरुवार, सणाच्या दिवशी ही विक्री अर्ध्याहून कमी होते. त्यामुळे या दिवशी माशांची घाऊक विक्रीही कमी होते. उरलेले मासे बर्फाच्या पेट्यांमध्ये साठवले जातात. त्यासाठी प्रत्येक घाऊक विक्रेत्याकडे प्लास्टिकचे मोठे टब असतात. या लहान शीतगृहांमध्ये साधारण सहा ते सात दिवस मासे टिकतात.

काही वेळा विदेशांमध्ये नेलेले मासे कस्टम क्लिअरन्समुळे समुद्रातच अडकून पडतात. मासे साठवताना त्यातील ऑक्सिजन, ड्राय आइस यांचे प्रमाण कमी झाल्यास आयात करणाऱ्या देशाकडून नाकारले जातात. मग हेच मासे पुन्हा परतीच्या प्रवासाला लागतात. काही टनांमध्ये असलेले हे मासे मग थेट बाजारात उतरवले जात नाहीत. शीतगृहांमध्ये इतर मासे साधारण वजा १४ अंश सेल्सिअस तापमानाला ठेवले जातात. मात्र बरेच दिवस उलटलेले हे मासे वजा २८ अंशांपर्यंत गोठवले जातात. असे मासे सहा महिने टिकतात. मात्र त्यांच्या रूपावर-चवीवर परिणाम होतोच. घाऊक बाजारातून हे मासे किरकोळ बाजारात येतात. थोडा मऊ पडलेला मासा सुकवण्यासाठी ठेवला जातो, तर इतर मासे सरळ कचऱ्यातही जातात. मासे उत्तम दिसण्यासाठी त्यात रंग मिसळण्याचा प्रकारही सर्रास चालतो. मांदेली, बोंबील लाल रंगात बुडवून ठेवले जातात. खवल्यातून पांढरे पाणी आल्यास मासा ताजा असल्याची खूण पटते. त्यामुळे खवल्यांमध्ये पांढरा गम लावला जातो. हे रंग आणि गमची चाचणी अर्थातच केलेली नसते. त्याच वेळी माशांवरील शायनिंग टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आरोग्यदृष्ट्या चाचणी केलेली उत्पादनेही बाजारात मिळू लागली आहेत व त्याचा वापरही वाढतो आहे.  विदेशात जात असलेल्या माशाला चांगला भाव मिळावा आणि व्यापार वाढावा यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. त्यात सतत बदलही होत आहेत. मात्र स्थानिक पातळीवर माशांच्या बाजारात गेल्या पन्नास वर्षांत म्हणावा असा फरक पडलेला नाही. बर्फाचा वापर वगळता मासेविक्रीची पारंपरिक पद्धत बदललेली नाही. मॉलमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेले स्वच्छ, बिनवासाचे मासे उपलब्ध होऊ लागले असताना मासेबाजारात मात्र माशांवरील गळणाऱ्या पाण्यातून आणि मांजरांच्या उड्यांमधून मार्ग काढावा लागतो. मच्छीच्या कचऱ्यामुळे येणाऱ्या वासाने मासेविक्रेत्याही त्रासतात. मात्र या वातावरणात बदल करण्याचे प्रयत्न झालेले नाहीत. मात्र बाजारीकरणाच्या जोरदार रेट्यात ही स्थिती बदलण्याची घंटा वाजते आहे, हे निश्चित…

समुद्राच्या माशांना मागणी प्रचंड आणि पुरवठा कमी असल्याने दर कायम तेजीत असतात. मासे घेताना योग्य ती माहिती असेल, तर आपल्याला पैशाचा योग्य मोबदला आणि खाल्ल्याचे समाधान मिळते. यासाठी प्राथमिक पण आवश्यक माहिती मी इथे देत आहे. आशा करतो की, निदान काही लोकांना तरी ती उपयुक्त ठरेल. मासे विक्रेत्यांना ही माहिती बहुधा मुळीच आवडणार नाही. ताज्या माशाचे कल्ले आतून गुलाबी किंवा लालबुंद असतात. ताज्या माशाचे डोळे चकचकीत काळेभोर असतील. किनारपट्टीच्या नजीकचे लोक मासे खरेदीत अतिशय चोखंदळ असतात. मासे अगदी ताजेताजेच पाहून घेतात आणि मासळी मार्केटात पाय ठेवताना त्यांची यादी बहुधा ठरलेली असते. हे नाही तर ते, अशी  दर आणि उपलब्धतेनुसार प्राथमिकता बदलते. खरे तर गुणवत्ता व दरात सुरमई, सुळे, शेंगाट कितीतरी वरच्या पायरीवर. पण तरी काहींची फसगत होतेच. त्यासाठी मासळी पारखूनच घ्यावी.

मासे ताजे आहेत हे कसे ओळखावे ?

दिसण्यातला ताजेपणा : ताजे मासे दिसायला ताज्या फुलांप्रमाणे तरतरीत व चकचकीत ओलसर दिसतात. थोडेसेही मरगळलेले असले, तर शंकेस वाव असतो.

वासावरून ओळख : काही ताज्या माशांना किंचित हिंवस वास असला तरी घाण कुजकट वास येत नाही.

ढिगातीलमासे : ख राब मासे काही वेळा ताज्या माशांच्या ढिगात मिसळून विकले जातात. या प्रकारात कुजकट वास आणि मरगळलेले मासे ओळखणे केवळ साधने अंतीच शक्य होते.

बोटाने दाबून पाहा : मासा ताजा नसेल, तर बोटाने थोडासा दाब दिल्यावर तिथे खोलगट ठसा उमटतो. ताज्या माशामध्ये असं होत नाही.

तिसरे व खुबे : ताजे तिसरे व खुबे यांची कवचं गच्च बंद असतील व त्यात मुळीच गॅप दिसणार नाही.

माशाचे डोळे पाहा : ताज्या माशाचे डोळे चकचकीत काळेभोर आणि पारदर्शक दिसतील. लालसर किंवा धुरकट पांढरे मुळीच नसावेत.

तुकडे व काप यांचा रंग : काही मासे कापं पाडून विकले जातात. ताज्या माशांचे तुकडे दिसायला व्यवस्थित असतात व त्यावर पारदर्शक पांढऱ्या रंगाची झाक असते.

कल्ले उघडून पाहा : ताज्या माशाचे कल्ले थोडेसे उघडून पाहिल्यास आतमधून बऱ्यापैकी लाल किंवा गुलाबी दिसतील. ते जर फिकट असले, तर ताजेपणा संपलेला आहे. फसवण्यासाठी शिळ्या माशांचे कल्ले रंग लावून लाल करतात तरी त्यापासून सावध!

खेकडे व चिंगुळ : खेकडे, चिंगुळ यांची मंद हालचाल होत असल्याचे दिसेल. म्हणजे ते जिवंत असतानाच घ्यावेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -