प्रा. प्रतिभा सराफ
मी तेव्हा सहावी-सातवीत असेन. आईसोबत एका वाण्याच्या दुकानात गेले होते. त्या वयात माझे लक्ष दुकानातील रंगीबेरंगी चॉकलेटकडे, आकर्षक वेस्टनातील वस्तूंकडे, काचेच्या बरणीत ठेवलेल्या खाद्यपदार्थांकडे होते.
आईला साखर विकत घ्यायची होती. त्या दुकानदाराने आईच्या हातात एक दहाची, एक पन्नासची नोट आणि साखरेचा पुडा दिला. त्याबरोबर आई म्हणाली की, “मी तुम्हाला पन्नासची नोट दिली, तर तुम्ही मला फक्त दहा रुपये परत द्यायला हवे.” असे बोलून आईने पन्नासची नोट त्याच्यासमोर धरली.
ते पाहून दुकानदार आईला म्हणाला की, तिने त्याला शंभरची नोट दिली होती. त्यामुळे त्याला साठ रुपये परत करणे भाग आहे. मग दोघेही आपापली बाजू मांडू लागले. आई म्हणाली की, “तिच्या पर्समध्ये गेले चार-पाच दिवस ती एकच पन्नासची नोट होती, तर ती शंभरची नोट कशी काय देणार?”
दुकानदार म्हणाला की, “तुम्ही शंभराची नोट दिल्यावर मी पन्नासचे सुट्टे कसे देणार?” बराच वेळ चाललेला हा संवाद मी मन लावून ऐकू लागले. दुकानातील वस्तू पाहण्यात गुंतल्यामुळे आईने कोणती नोट दिली, ते मी पाहिले नाही. मग त्या पन्नासच्या नोटेचं काय झालं मला आठवत नाही. पण त्यादिवशी एक गोष्ट मी आपोआप शिकले ती म्हणजे “प्रामाणिकपणा!” काही गोष्टी शिकवल्या जात नाहीत, त्या आपण शिकत जातो. त्यातीलच एक महत्त्वाचा गुण म्हणजे “प्रामाणिकपणा”!