Monday, July 15, 2024

कसरत

प्रियानी पाटील

मुलीचं आयुष्य आणि जीवनातील कसरत असं एक गणितच बनून गेल्याचं दिसून येतं. जन्मोजन्मीचं हे गणित कधी पालटेल तेव्हा पालटेल, पण शिक्षणातून प्रगतीची तिच्यासाठी खुली असणारी द्वारे याचा लाभ तरी ती पुरेपूर आज घेतेय का, हे पाहणं अत्यंत आवश्यक बनलं आहे.

शिक्षण घेण्याच्या तिच्या लहानग्या वयात तिला करावी लागणारी कसरत ही पाहणाऱ्यांचं मनोरंजन करणारी, पण तिच्या आयुष्यात पुढे काय? की हेच तिला आयुष्यभर करावं लागणार आहे? हे कोडं न उलगडणारंच. ही कसरत करण्यासाठी तिला किती मेहनत करावी लागली असणार, किती प्रॅक्टिस करावी लागली असणार? लहानग्या वयात पोटासाठी फिरणारं तिचं कुटुंब पाहिलं तर मुलगी तारेवर कसरत करतेय… आणि कुटुंब पैसे गोळा करतंय ही स्थिती काहीशी न पटणारीच. त्या मुलीचं वय तरी काय? शिक्षणाच्या वयात ही कसरत म्हणजे आयुष्य जगण्याचा पहिला धडाच. तिच्यासाठीही आणि ही तिची कसरत पाहणाऱ्यांसाठीही.

पोटासाठी तारेवरची कसरत करताना ही छोटी मुलगी जेव्हा पाहिली तेव्हा न राहवून तिच्या पालकांना शाळेत जाण्याचं तिचं वय आणि हे असं का करताय? तुम्ही काम का नाही करत? हा प्रश्न आपसुकच विचारला. तेव्हा पालकांची मान झुकली. ते म्हणाले, शाळेत जाते ना, तिसरीला आहे. या त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा म्हटला तरी बसणं अशक्य? कारण फिरता कारभार. आज इथे तर उद्या तिथे, मग कुठली आली शाळा नि कसलं आलं शिक्षण? मुलगी नुसती तारेवरच कसरत करत नाही, तर डोक्यावर इवलाली मडकी घेऊन, हातात काठी घेऊन समतोल साधतेय. बिनधास्तपणे गाण्याच्या तालावर त्या तारेवरून फिरतेय. पाहणाऱ्याच्या काळजात धस्स होईल, पण ते क्षणभरासाठी. कारण तिचा बिनधास्तपणा पाहून कुणालाही कौतुक वाटेल आणि वाईटही. कारण तिचं हे वय शिक्षणाचं आहे. या वयात तिच्या आयुष्याची चाललेली कसरत पाहिल्यावर तिने ठेवलेला बॅलन्स नकळतच मनात घर करून राहतो. शिवाय घरातील माणसांचा पाठिंबा तिच्यासाठी मोलाचा ठरतो.

यांच्या जीवनाचं गणित तसं पाहिलं तर न उलगडणारं. कसरत करताना यांनी आपल्या मुलीला जीवनातील बॅलन्स शिकवला. तारेवरची कसरत शिकवली, शिक्षणही देतो म्हणतात, पण तिचं वय? त्याचं काय? इवल्याशा वयात तिचं आयुष्य सांधणारी कला तिला काहीतरी सांगून जाणारी कदाचित पिढीजात वारसा चालवणारी. हे तिचं आयुष्य मुलगी म्हणून किती सावरणार पुढे? की तिला आयुष्यभर अशीच तारेवरची कसरतच करावी लागणार?

ही मुलगी म्हणजे आई-वडिलांची प्रेरणा आहे. जगण्याचं बळ आहे. ती या वयात इतका बॅलन्स राखते म्हणजे याची प्रॅक्टिस तिने वयाच्या कितव्या वर्षापासून केली असणार? खरंच तिचा बॅलन्स पाहिला आणि आश्चर्यच वाटलं. आजूबाजूला तिची ही कसरत पाहण्यासाठी माणसं जमतात. आश्चर्याने तिला पाहतात. लहान मुलांनाच काय मोठ्यांनाही तिचं कौतुक वाटून जातं.

साऱ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळतात. तारेवर चालताना तिचा बॅलन्स, हातातील काठी आणि डोक्यावर ठेवलेली तीन मडकी हे सारं घेऊन ती बिनधास्तपणे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे गाण्याच्या तालावर आपला बॅलन्स राखून चालते. आपला तोल ती अजिबात ढळू देत नाही. यातच सारं आलं. या मुलीचं शिक्षण होईल की नाही माहीत नाही. या मुलीच्या भवितव्याचंही पुढे काय तेही माहीत नाही. ही मुलगी आज ज्या पद्धतीने कसरत करतेय आणि अवघ्या जनमाणसाला खिळवून ठेवतेय हे पाहून ही एक कला जिवंत ठेवतेय असं वाटून गेलं. पोटाची खळगी भरण्याची ही कला नकळतच या मुलीने जन्मजात आत्मसात केली आहे. जगण्याचा हा पैलू तिच्या निराकार जीवनाला कलाटणी देणारा असला तरी तिच्या भवितव्याचे काय? हा प्रश्न मात्र शेवटपर्यंत अनुत्तरित करून जातो हे नक्की!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -