Thursday, July 25, 2024
Homeसाप्ताहिककोलाजगेली सांगून ज्ञानेश्वरी

गेली सांगून ज्ञानेश्वरी

माधवी घारपुरे

शनिवारची सुहावनी पावसाळी सकाळ. एखादा दिवस उगवतानाच तुमच्या मनाची कळी खुलवतच उगवतो. कोसळणारा पाऊस, पसरलेलं ढगांचं धुकं, शहारा आणणारा गारवा आणि समोर मसाल्याचा वाफाळता चहा. दुधात साखर म्हणजे ऑफीसला सुट्टी आणि गप्पांना चार मैत्रिणी. स्वर्ग सुख यापेक्षा अधिक काय? चहाचा कप ठेवता ठेवताच चित्राला लहर आली.

नयी क्रेटा ली है, अभी के अभी सिंहगड चलेंगे आणि पिठलं भाकरी, भजी गरम गरम खाएंगे! उठा उठा, तासाभरात आमची क्रेटा सिंहगड रोडला लागली.

खडकवासला धरणात छान पाणी होतं. धरण तृप्त झालं होतं. उतरून कणसं खायचा मोह आवरला नाही. पुढे मात्र सुसाट सुटलो. आमच्या आनंदाला आमचीच नजर लागली. चेक नाक्यावर गाडी अडवली तिथं मनच पंक्चर झालं. अत्यंत रुक्ष आवाज. ‘वर गर्दी आहे. आणखी दीड एक तास तरी गाड्या वर जाणार नाहीत. एंट्रीची पावती फाडा’

मनातलं पिठलं तिथंच रटरटलं. रागाची भाकरी तिथेच फुगली आणि असाहयतेची खेकडा भजी समोर आली. एका जागी थांबणं कुणालाच पटणारं नव्हतं. गाडी फिरवली ‘तू नही तो और सही,’ म्हणत पानशेतच्या दिशेने निघालो. आज स्वच्छंदी होतो.

घडते ते चांगल्यासाठीच. कमी, मोजकी असलेली माणसं आणि गाड्या. दोन्ही बाजूंनी हिरव्या रंगाच्या केलेल्या कमानी, मधूनच येणारी सर, क्षणात डोकावणारा सूर्यप्रकाश! सूर्य आणि पावसाचं चाललेलं तू तू मै मै आम्ही पाहत होतो.

नेहा म्हणाली, ‘अगं बघा ना मी हिरव्या रंगाच्या छटा मोजल्या. किती त्या! पांढरट हिरवा, पिवळट हिरवा, मेंदी हिरवा, पोपटी, विड्याच्या पानाचा हिरवा, बॉटल ग्रीन, ब्लॅकीश ग्रीन आपण सगळ्याची बोळवण ‘हि. र. वा.’ यांत करून त्या रंगाचा अपमान करतो.’

मी म्हटलं, ‘इतके रंग शेवटी पांढऱ्यालाच जाऊन मिळतात आम्ही मात्र काळा, सावळा, गहूवर्णी, गोरा, निमगोरा, पिठ्ठ गोरा करत बसतो. शेवटी सगळी माणसं लाल रक्ताचीच ना! ’ माझं तत्वज्ञान कुणाला नको होते.

ड्राईव्ह करता करताच चित्रा म्हणाली, ‘ओ गॉड, आता आपण नीलकंठेश्वरा’जवळ आलोय. तो डोंगर चढायचाच’ दोनेक किलोमीटर गेलो. पुढं गाड्या पार्क होत्याच. आम्ही पण गाडी पार्क केली आणि चिखलातूनच चालायला सुरुवात केली. ‘होय, नाही’ करता करता चढायला लागलो. आज सिंहगडावरचे दर्शन नाही तर नीळकंठेश्वराचे दर्शन होणार हा आनंद होता. ढग अजूनच खाली आले होते. ढगांचे दाट धुके मी प्रथमच पाहत होतो. गंमत म्हणजे आमच्या जणू सोबतीनेच म्हणाना का? एक बकरी आणि तिचे छोटेसे पिल्लू डोंगर चढत होते. अर्ध्या एक तासाने ते पिल्लू बेंऽऽऽ बेंऽऽऽ करत ओरडत होतं. पण ती बकरी पुढे पुढे जात होती. दृश्य बघण्यासारखे होते. पिल्लू अडून राहिले. पुढे गेलेली बकरी मागे आली. त्याला चाटू लागली. सांगत असेल, ‘आता थोडंच अंतर हं, चल बाबा’. ते पिल्लू दुध प्यायला तिच्या पोटाशी जाऊ लागलं तसं सावत्र आईसारखं बकरीने त्याला लाडीक लाथेने दूर लोटलं. दोघं पुढं झाली. खरी गमंत आताच होती. मी टक लावून बघत बसले, तिघी पुढे गेल्या. त्याचं भानही मला नव्हते. पुढं बऱ्यापैकी खोल खड्डा होता. चार फूट तरी लांब असेल. त्याच्यात पाणी भरलेले पुढं वाहत होते. बकरी आणि पिलू तिथपर्यंत आले. बकरीने टुणकन लांब उडी मारली आणि पलीकडे गेली. बकरीच्या हालचाली चालल्या होत्या. पिल्लू खड्ड्यांपर्यंत जायचे आणि माघारी फिरायचे., बकरी उडी मारून पुन्हा पिल्लाजवळ आली. पिल्लू दुधासाठी गेलं, परत तिने पायाने दूर केले. ढकलत ढकलत त्याला खड्ड्यापर्यंत आणले आणि आपण उडी मारून पलीकडे गेली. हाच प्रकार २/४ वेळेला घडला. मला वाटलं बकरी पिल्लाला उडी मारायला शिकवतीय. एवढी उडी मार, मग तुला दूध मिळेल, असेच तिला जणू म्हणायचे होते. एवढा अभ्यास कर, मग खाऊ. दुनियेत सगळ्या आया सारख्या. बकरीने पलीकडून जोरात बेंऽऽऽ आवाज केला. हा आवाज म्हणजे फायनल वॉर्निंग दिसतेय. असाच होता.

मी दमले या कल्पनेत तिघी वर चढून माझी चेष्टा करत होत्या. पण मी जे पाहत होते ते उद्या कितीही पैसे खर्च करून पाहायला मिळाले नसते. आता पिल्लू जरा धीट वाटलं. आईकड बघून बेंबेंऽऽ केलं. सगळे बळ एकवटले आणि उडी मारली. मी डोळे मिटले. बिचारं पाण्यात पडले तर! डोळे उघडले तर पिल्लू पलीकडे दिसलं. चारी पायावर नाचत होतं. आपण परीक्षेत पास झाल्याचा तो आनंद होता. आता आई दूध देण्यासाठी त्याच्या मागे धावत होती आणि ते गोल गोल फिरत होतं. शेवटी बकरी आईचं दमून आडवी पडून राहिली. पिल्लू मात्र आनंद ओसरेपर्यंत दुडदुडलं आणि नंतर आईलाच आचकायला लागले. बकरीने डोळे शांतपणाने मिटले आणि निरखून पाहिले तर तिच्या डोळ्यातून पाणी ओघळत होते. न कळत माझ्याही डोळ्यांतून पाणी आलेले मला कळलेच नाही.

बकरीचे अश्रू मुलाचे पोट भरवायचे होते की सुखरूप असल्याचे होते की जीवनाताला एक धडा तो शिकला याचे होते, मला कळेना. नीलकंठेश्वर मला त्या दोन जिवांत दिसला, परत निघालो. आकाश बऱ्यापैकी स्वच्छ झाले होते. वाटेत एका दगडावर गुराखी एकटाच गात होता.

अल्याड डोंगर, पल्याड डोंगर, मध्येच खोल खोल दरी गेली सांगून ज्ञानेश्वरी अन् माणसापेक्षा मेंढरं बरी।।

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -