
नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबातील १७ वर्षीय तरुणीचा नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आमच्या लेकीचा मृत्यू झाला, असा तिच्या कुटुंबीयांचा आरोप आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील वैष्णवी बागेश्वर नावाच्या १७ वर्षीय तरुणीला तिच्या आई वडीलांनी उपचारकरीता नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले होते. मात्र, व्हेंटिलेंटर उपलब्ध नाही असे कारण देत तिथल्या डॉक्टर्सनी तब्बल २० तासांपेक्षा जास्त वेळ तिला अंबू बॅगद्वारे कृत्रिम श्वास देत ठेवले. धक्कादायक म्हणजे या कामी आजारी तरुणीच्या आई वडिलांना लावल्याने वीस तासांपेक्षा जास्त अवधी तिचे आई-वडील अंबु बॅग ला दाबून आपल्या लेकीला कृत्रिम श्वास देत होते.
आशियातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमांकाचे रुग्णालय म्हणून नागपूर मेडिकलची ओळख आहे. परंतु, येथे सोयी उपलब्ध असताना रुग्ण वाचविण्यासाठी लागणाऱ्या प्रयत्नाची उणीव असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा पुढे आले. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील रहिवासी वैष्णवी राजू बागेश्वर हिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला १५ सप्टेंबर रोजी सकाळी मेडिकलच्या वॉर्ड क्र. ४८ मध्ये भरती केले.
वैष्णवीच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या. श्वास घेण्यासही त्रास होत होता. तिला व्हेंटिलेटरची गरज होती. मात्र, व्हेंटिलेटर नसल्याने तिला ‘अॅम्बू बॅग’वर ठेवले. याची माहिती सायंकाळी मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार यांना देण्यात आली. परंतु, त्यांनाही व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणे शक्य झाले नाही. अखेर तिने शुक्रवारी दुपारी ‘अॅम्बू बॅग’वरच शेवटचा श्वास घेतला.