अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यासोबतच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वरसोली समुद्रकिनारी शनिवारी (ता.१७) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला विद्यार्थी, नागरिक, सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता सेवा अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शनिवारी आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सागरी सीमा मंच, माणुसकी प्रतिष्ठान, वरसोली ग्रामपंचायत, इंडियन एज्युकेशन सोसायटी, वरसोली, रायगड जिल्हा परिषद शाळा वरसोली, रोटरी क्लब, लायन्स क्लब, लाईफ फाऊंडेशन, कारभारी क्लास, वरसोली ग्रामस्थ यांनी सक्रीय सहभाग घेतला. जमा करण्यात आलेला कचरा वरसोली ग्रामपंचायतीच्या घंटा गाडीच्या माध्यमातून डंपिंग ग्राऊंडवर नेण्यात आला.
स्वच्छता सेवा अभियानांतर्गत थळ, कीहिम, आक्षी येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम रबविण्यात आली. या मोहिमेत नागरिक, विद्यार्थी तसेच सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या. थळ समुद्रकिनारी सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, किहीम समुद्रकिनारी ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, आक्षी समुद्रकिनारी सीडीपीओ गीतांजली पाटील यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम पार पडली.
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता स्वच्छता सेवा अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. पर्यावरण रक्षण करणे गरजेचे असून, प्लास्टिक कचरा सार्वजनिक ठिकाणी न टाकता तो संकलित करून पुर्नप्रक्रिया करण्यासाठी द्यावा. प्रत्येकाने स्वच्छता राखणे ही स्वतःची जबाबदारी आहे हे ओळखून रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार नाही याची दक्षता घ्यावी. – डॉ. किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड