नरेंद्र मोदी या दोन शब्दांतच देशभक्ती, देशप्रेम आणि विकास सामावलेला आहे. नरेंद्र मोदी यांचा भारताच्या राष्ट्रीय क्षितिजावर उदय झाल्यापासून भारतीय राजकारणाचा पोतच बदलला. कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करण्यात ते यशस्वी झाले. पंतप्रधान हा देशाचा सर्वोच्च नेताच केवळ नसतो, तर देशाचा प्रधानसेवक असतो हे त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिले. पंतप्रधानपद हे केवळ सुरक्षा दलाच्या कडेकोट बंदोबस्तात उपभोगायचे पद नसून जनतेच्या जीवनाशी समरस होऊन काम केले, तर आपण घराघरांपर्यंत पोहोचू शकतो हे मोदींनी गेल्या आठ वर्षांत दाखवून दिले. पंतप्रधान हा सिलिब्रिटी नसतो, केवळ घरात बसून स्वाक्षऱ्या करणारा नेता नसतो तर देशभर फिरणारा व जनभावना समजावून घेणारा देशाचा पालक असतो हे त्यांनी आपल्या कामातून सिद्ध करून दाखवले आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते डॉ. मनमोहन सिंगपर्यंत देशाने अनेक पंतप्रधान बघितले, पण नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाशी त्याची तुलनाच होऊ शकत नाहीत. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग हे त्यांच्या गुणांनी आणि कामांनी मोठे होते. काँग्रेसच्या पंतप्रधानांना देशात विरोधही मोठा सहन करावा लागला. पण मोदींना कितीही राजकीय विरोधक असले आणि ते कितीही त्यांच्या विरोधात टोकाला जात असले तरी सर्व कोट्यवधी सामान्यांच्या हृदयात स्थान निर्माण करण्याचे भाग्य त्यांना लाभले हे मान्य करावेच लागेल. अहोरात्र देशासाठी वाहून घेणारा हा नेता आहे. रोज अठरा तास काम करूनही न थकणारे हे नेतृत्व आहे. भारताची परंपरा, इतिहास, संस्कृती, यांची जपणूक करणारा व हिंदुत्वाविषयी विलक्षण प्रेम, आदर असणारा नेता, अशी त्यांची जगभर प्रतिमा आहे.
नरेंद्र मोदी यांचा उल्लेख विश्वगुरू असा केला जातो. त्यांनी देशाचे नेतृत्व स्वीकारल्यापासून भारताची प्रतिमा जगात उंचावली तसेच देश-विदेशात मोदींविषयी आकर्षण आणि आदर सर्वत्र विलक्षण वाढला असल्याचे दिसून येते. विदेशातील भारतीय नागरिकांना व तेथील जनतेलाही मोदींविषयी मोठा आदर आहे. मोदी जिथे जिथे जातील तिथे त्यांचे भारतीयांकडून जंगी स्वागत होते. मोदी-मोदी जयघोषांनी परिसर दुमदुमून जातो, असा अनुभव युरोप-अमेरिकेत सर्वत्र येतो. भारताच्या पंतप्रधानांचे विदेशात होणारे स्वागत पाहून भारतीयांच्या अंगावर अभिमानाने रोमांच उभे राहते. यापूर्वी कोणत्याही भारताच्या पंतप्रधानांला असे भाग्य लाभले नाही.
राजधानी दिल्लीत त्यांनी उभारलेला सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प अद्वितीय म्हणावा लागेल. राजपथचे कर्तव्यपथ नामांतर करून त्यांनी देशवासीयांना सुखद धक्का दिला. इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून त्यांनी नेताजींच्या अलौिकक कार्याचा सन्मान केला. स्वदेशी बनावटीच्या आयएनएस विक्रांत या लढाऊ युद्धनौकेचे पुनरागमन होताना त्यांनी नौदल अाधुनिक व सुसज्ज कसे होईल यावर आपला कटाक्ष असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर नौदलाला नवा ध्वजही मिळाला व नवे चिन्ह म्हणून शिवमुद्रा झळकू लागली. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि प्रमुख म्हणून बजावलेली भूमिका असो किंवा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून केलेले काम असो, प्रत्येक पदावर काम करताना त्यांनी आपल्या कामगिरीचा वेगळा ठसा उमटवला. देशाचे पंतप्रधान म्हणून काम करताना सर्वाधिक लोकप्रियता त्यांना प्राप्त झाली आहे. देश- विदेशात भारताचा शक्तिशाली पंतप्रधान अशी त्यांची प्रतिमा आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व त्यांचे पुत्र राहुल यांची नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी चालू आहे. त्यांना चौकशीला बोलावले म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर संतापाचे प्रदर्शन केले. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरात दंगलीची चौकशी करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार एसआयटी नेमली होती. चौकशीला बोलाविल्यावर कोणताही गाजावाजा न करता ते एसआयटीपुढे हजर झाले.
हाच मोदी आणि गांधी परिवार यांच्यातला मूलभूत फरक आहे. मोदींनी सामान्य जनतेच्या कल्याणाचे किती निर्णय घेतले याची फार मोठी यादी सांगता येईल. पण सामान्य नागरिकाला ताठमानेने उभे केले. चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांना उज्ज्वला गॅस योजनेखाली त्यांनी सिलिंडर मोफत दिले, त्याची संख्या साडेनऊ कोटींच्या घरात आहे. तिहेरी तलाक कायदा करून बंद केला, त्यामुळे देशातील लाखो मुस्लीम महिलांना दिलासा मिळाला. पुरुषांशिवाय महिला आता एकट्याने हाज यात्रेला जाऊ शकतील, अशी व्यवस्था केली. एनडीएमध्ये महिलांना प्रवेशमुक्त केलाच पण महिलांसाठी सैन्यदलात कायमस्वरूपी कमिशनही दिले. बेटी बचाव बेटी पढाव या अभियानाने महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली. लष्करी प्रशिक्षण देणारी अग्निपथ योजना मोदींनीच सुरू केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोविड काळात एकशे पस्तीस कोटी लोकसंख्येचा भारत कसा तग धरू शकणार असे जगाला वाटले होते, पण या देशातच प्रतिबंधक लस तयार झाली, जवळपास दोनशे कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या. ९० टक्केपेक्षा जास्त लोकसंख्येला लस दिलीच, पण जगातील ९० देशांना भारताने लस पुरवली. अयोध्येत राम मंदिराची उभारणी, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० वे कलम रद्द करणे, हे कधी शक्य होईल, असे कोणाला वाटले नव्हते. पण जे शक्य नाही ते मोदींनी करून दाखवले. जिद्द, परिश्रम आणि सातत्याने पाठपुरावा यामुळेच मोदी जे बोलतात ते करून दाखवतात. म्हणूनच नरेंद्र मोदींसारख्या नेत्यांकडे भारताचे नेतृत्व यापुढेही सदैव काळ राहो व त्यांना आरोग्यसंपन्न उदंड आयुष्य लाभो, अशी देशाच्या प्रधानसेवकाला वाढदिवसानिमित्त प्रहार परिवाराच्या वतीने शुभेच्छा!