Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीसध्याचे युग युद्धाचे नाही

सध्याचे युग युद्धाचे नाही

यूक्रेन युद्धावर मोदी यांचा सूचक इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उझबेकिस्तानमधील समरकंद येथे शांघाय सहकार्य संघटना परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची महत्त्वपूर्ण भेट झाली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये यूक्रेन युद्ध, दोन्ही देशांची मैत्री, परस्पर सहकार्य, अन्नसंकट या मुद्द्यांवर चर्चा झाली. मोदी आणि पुतीन यांची भेट सकारात्मक होती. मात्र, सध्याचे युग हे युद्धाचे युग नसल्याचे मोदी यांनी आवर्जून सांगितले. तसेच आपल्याला चर्चेतून प्रश्न सोडवावे लागणार आहेत, असे मोदी म्हणाले. भारत आणि रशियाचे संबंध पहिल्यापासून मजबूत आहेत, असे म्हणत पुतीन यांनी मोदी यांना रशियाला येण्याचे निमंत्रण दिले. नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि भारताचे संबंध भविष्यात आणखी मजबूत होतील, असे सांगितले.

नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या द्विपक्षीय बैठकीत पुतीन यांनी यूक्रेनबरोबरचे युद्ध आणि भारताची भूमिका माहिती असल्याचे सांगितले. आम्हाला देखील हे सर्व लवकर संपले पाहिजे, असे वाटत असल्याचे ते म्हणाले. तिथे काय घडतेय याची माहिती आम्ही तुम्हाला देत राहू, असे पुतीन म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी त्यापूर्वी यूक्रेन युद्धामुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याचे म्हटले होते. कोरोना महामारी आणि यूक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगासमोर अन्नसंकट निर्माण झाले आहे. यापुढे जाऊन ऊर्जा संकट देखील निर्माण झाल्याचे मोदी म्हणाले. पुतीन यांनी भारत आणि रशिया एकत्र येऊन काम करत आहे. नरेंद्र मोदी यांनी रशियाला यावे, असे निमंत्रण पुतीन यांनी दिले. नरेंद्र मोदींनी बैठकीत भारत आणि रशियाचे संबंध मजबूत झाल्याचे म्हटले. जगाला आपल्या मैत्रीविषयी माहिती आहे. आपली मैत्री २२ वर्षांपासून मजबूत होत आहे, असे मोदी म्हणाले.

शांततेच्या मार्गाने जायला हवे…

नरेंद्र मोदी यांची भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री सातत्याने वृद्धिंगत होत आहे, असे स्पष्ट करून आगामी काळात दोन्ही देशांचे संबंध आणखी मजबूत होणार आहेत. आपल्याला विविध प्रश्नांवर एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. त्यासाठी शांततेच्या मार्गाने पुढे जावे लागेल, असे मोदी म्हणाले. आंतरराष्ट्रीय संस्थांनी रशियावर यूक्रेन युद्धामुळे बंधने टाकल्यानंतर देखील भारताने जुनी मैत्री कायम ठेवत कमी किमतीत खनिज तेल खरेदी केले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -