Friday, June 13, 2025

वसई-विरार शहरात पावसाची उसंत! विरार-मनवेल पाडा रस्ता गेला वाहून

वसई-विरार शहरात पावसाची उसंत! विरार-मनवेल पाडा रस्ता गेला वाहून

विरार (प्रतिनिधी) : मुसळधार पावसाने उसंत घेतली असली तरी सतत दोन दिवस झालेल्या पावसाने वसई-विरार महापालिकेचा कारभार धुऊन नेला आहे. गणेशोत्सवापूर्वी मलमपट्टी केलेले बहुतांश रस्त्यांवर या पावसामुळे खड्डे पडले आहेत. तर काही रस्त्यांवरील खडी आणि डांबरच वाहून गेले आहे.


हिमालयाच्या पायथ्याशी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामान खात्याने गुजरातसह पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून झालेल्या पावसाने वसई-विरार शहरातील बहुतांश भागांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. वसई, नालासोपारा व विरारमधील सखल भागांत पाणी साचल्याने वाहतुकीची बोजवारा उडाला होता. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गही पाण्याखाली गेल्याने अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. या मार्गावरील वाहतूकही कोलमडून पडल्याने शहराशी संपर्क तुटला होता. कित्येक वाहने रस्त्यात बंद पडली होती. त्यामुळे अनेकांचे हजारो रुपयांचे नुकसान झालेले आहे.


दरम्यान; शनिवारी सकाळी पावसाने किंचित उसंत घेतल्याने शहरवासीयांनी सुटकेचा निश्वास टाकला. पावसाने उघडीप घेतल्याने उन्हे डोकावत होती. त्यामुळे शहरवासीयांना किमान बाहेर पडता आले. दरम्यान; दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसात वसई-विरार महापालिकेचा कारभार पुन्हा धुऊन निघाला आहे. गणेशोत्सवापूर्वी पॅचअप करण्यात आलेले बहुतांश रस्त्यांवर या पावसामुळे खड्डे पडले आहेत. तर अनेक रस्त्यांवरील खडी आणि डांबर वाहून गेले आहे.


विरार पूर्व-मनवेल पाडा रस्ताही याला अपवाद राहिलेला नाही. दोन आठवड्यापूर्वीच या रस्त्याची डागडुजी करण्यात आलेली होती. मात्र वसई-विरार महापालिकेची रस्ते कामातील टक्केवारी पावसाने उघड केली आहे. सध्या या रस्त्यावर दोन-दोन फुटांपेक्षाही मोठे खड्डे पडलेले असून; वाहन चालकांचा जीव धोक्यात आलेला आहे.


सुरुची बीच सफाई मोहीम रद्द!


आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत वसई-विरार महापालिकेने इंडियन स्वच्छता लीग, सुरुची बीच सफाई मोहीम आयोजित केली होती. शनिवार, १७ सप्टेंबर २०२२ रोजी ही मोहीम होणार होती. मात्र भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्हा तसेच वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने ही सफाई मोहीम रद्द करण्यात आली आहे. या मोहिमेची पुढील तारीख व वेळ लवकरच वसई-विरार महापालिकेकडून जाहीर करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment