निरंजन वसंत डावखरे
पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारून नरेंद्र मोदीजी यांना आठ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. या काळात नरेंद्र मोदीजींचे नेतृत्व म्हणजे कणखर, बुलंदी, करारी, धोरणी आणि आत्मविश्वास असलेले जगाला दिसले. भारताच्या प्रतिष्ठेत वेगाने वाढ झाली. भविष्यातील एक महासत्ता म्हणून भारताकडे पाहू लागले. त्यामुळे मोदीजी हे कोट्यवधी भारतीयांच्या हृदयात विराजमान झाले. त्याचबरोबर मोदीजींची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे माझ्या मते भारतातील कोट्यवधी सर्वसामान्यांना दिलेला आधार. केंद्र सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयामध्ये सामान्यांच्या हिताचे व आर्थिक उन्नतीचे आणि त्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी केलेले प्रयत्न दिसून येतात. भारताच्या इतिहासात पंतप्रधान म्हणून सामान्यांसाठी सातत्याने मोदीजी झटत आहेत. कोविड आपत्तीच्या काळात कोट्यवधी कुटुंबांना धान्य, प्रधानमंत्री आवास योजना, किसान सन्मान निधी, आयुष्मान भारत योजना, उज्ज्वला योजनेतून गॅस, आदी योजनांमधून त्यांची गरिबांविषयी कणव दिसून येते. त्यामुळे भारताला लोककल्याणकारी पंतप्रधान लाभला, असे म्हणता येईल.
केंद्र सरकारकडून पाठविण्यात येणाऱ्या १ रुपयापैकी १५ पैसेच लाभार्थींपर्यंत पोहोचतात, अशी स्पष्ट कबुली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी एकेकाळी दिली होती. सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराची ती जाहीर कबुलीच होती. मात्र, त्यांच्या वक्तव्यानंतरही अशीच परिस्थिती कायम राहिली होती, हे दुर्दैव आहे. सरकारी योजनांचा फायदा प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे, हा ध्यास घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केंद्र सरकारकडून सामान्य व्यक्तीला मिळणारा लाभ थेट व्यक्तीला पोहोचविण्यासाठी जनधन योजना सुरू केली. त्यानुसार प्रत्येक लाभार्थींचे बँक खाते उघडले गेले. या योजनांमुळे गरजू लाभार्थींपर्यंत थेट फायदा पोहोचला. त्या कुटुंबाला मोदीजींकडून आर्थिक आधार मिळाला. कोणत्याही मध्यस्थाला लाभार्थींच्या रक्कमेवर डल्ला न मारण्याची संधी न देता थेट लाभार्थ्यांना पैसे मिळणारी ही योजना खूप लोकप्रिय ठरली आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या काळातील सर्वच कल्याणकारी योनजांचा आढावा घेतल्यास प्रत्येक योजनेत गरिबांना प्राधान्य दिले गेले. खेड्यांचा देश असलेल्या भारतात महत्त्वाचा असलेल्या बळीराजाचा विचार केला गेला. सामान्य शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यावर भर दिला गेला. किसान सन्मान निधीअंतर्गत शेतकऱ्यांना प्रती वर्ष सहा हजार रुपये दिले जातात.
त्यानुसार आतापर्यंत शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचे ११ हप्ते देण्यात आले आहेत. शेवटचा ११ वा हप्ता हा तब्बल १० कोटी शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मिळाला. त्यावरून या योजनेची व्याप्ती समजू शकते. विशेषत: निसर्गाच्या तडाख्यात नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांचा हा मोदीजींच्या सरकारने केलेला सन्मान आहे. भारतात राहणाऱ्या प्रत्येक गरीब कुटुंबांला मोदी सरकारने आधार देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जीवनात सकारात्मक क्रांती व्हावी, यासाठी प्रयत्न केले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागांबरोबरच शहरातील नागरिकांनाही पक्की घरे दिली गेली.
हजारो कुटुंबांना कर्जावर दोन लाखांचे अनुदान मिळाले आहे. कर्जाच्या बोजाखालील सामान्य कुटुंबांना हा दिलासा मिळाला. आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांवर ५ लाखांपर्यंत मोफत उपचार केले जात आहेत. देशातील १० कोटी कुटुंबातील ५० कोटी नागरिकांना उपचारांच्या कक्षेत आणले गेले. या योजनेमुळे गरिबीमुळे उपचार होणारच नाहीत, अशी वेळ एकाही कुटुंबावर येणार नाही, याची मोदीजींच्या सरकारने तजवीज केली. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून ९ कोटी गरीब कुटुंबांमध्ये गॅस पुरविण्यात आला आहे. विशेषत: ग्रामीण भागातील महिलांना योजनेतून दिलासा मिळाला आहे.
कोरोना काळात सामान्य जनतेला दिलासा देण्यात मोदीजींचे सरकार आघाडीवर होते. कोरोना योद्ध्यांचे मनोधैर्य वाढविण्याबरोबरच ५० लाखांचे विमा संरक्षण दिले गेले. लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या तब्बल ८० कोटी नागरिकांना दरमहा पाच किलो मोफत धान्य दिले गेले. जनधन खात्यांतर्गत २० कोटी महिलांच्या खात्यात तीन महिने प्रत्येकी ५०० रुपये दिले गेले. गरीब नागरिक, विधवा आणि अपंगांना एक हजार रुपयांचे अनुदान दिले गेले. कोरोनाच्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा गरीब कुटुंबांना आधार मिळाला. अडचणीत आलेल्या कुटुंबांच्या पाठीशी सातत्याने मोदीजींचे सरकार राहिले होते.
जल जीवन मिशननुसार आतापर्यंत साडेपाच कोटींहून अधिक घरात नळाने पाणीपुरवठा करण्यात आला आहे. पुढील वर्षापर्यंत प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी उपलब्ध करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशनअन्वये तब्बल १० कोटींहून अधिक स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या प्रत्येक निर्णयात जनतेच्या हितांना व लोककल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले. आतापर्यंत मोदीजींची आठ वर्षांची राजवट ही लोककल्याणकारी निर्णयांमुळेच गाजली. केंद्र सरकारच्या योजनांचे थेट लाभ मिळालेले कोट्यवधी लाभार्थी आहेत. या योजनांच्या माध्यमातून अंधारात असलेल्या कोट्यवधी कुटुंबांच्या जीवनात ‘प्रकाश’ पसरला आहे.