डॉ. सुकृत खांडेकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी ही भारताला मिळालेली दैवी देणगी आहे. भारताची अखंडता, एकात्मता आणि सर्वसामान्य जनतेचा सदैव विचार या त्रिसूत्रीचा विचार करून देश चालवणारा हा नेता आहे. रोज अठरा तास काम करणारा व कशाची पर्वा न करता जनहिताचे बेधडक व बिनधास्त निर्णय घेणारे नेतृत्व आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्काराच्या मुशीतून त्यांच्या जीवनाची जडण-घडण झाल्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्यात कुठेही अहंकार नाही, मी पणा तर नाहीच, पण देशाच्या सर्वोच्च पदावर असतानाही प्रधानसेवक याच भावनेतून ते काम करीत आहेत. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक भाषणातून, त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयातून त्यांचा देश-विदेशातील जनाधार सातत्याने विलक्षण वेगाने वाढताना दिसतो आहे. एका टीव्ही चॅनेलवर त्यांची मुलाखत चालू होती. स्टुडिओत कॉलेजमधील विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती.
प्रश्न थेट आणि मार्मिक विचारले जात होते आणि मोदीही रोख ठोक उत्तर देत होते. प्रत्येक प्रश्नावर तरुणाई टाळ्या वाजवून दाद देत होती. अँकरने विचारले, पंजाबमध्ये सरदारांनी दिलेली दस्तार (पगडी) आपण स्वीकारलीत.अरुणाचल प्रदेशात तेथील पारंपरिक टोपी मस्तकावर परिधान केलीत. मग एका कार्यक्रमात इमामाने आपल्या डोक्यावर मुस्लीम टोपी घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपण त्याला रोखलेत, कारण काय? पंतप्रधान मोदी शांतपणे म्हणाले, महात्मा गांधींनी कधी कोणाकडून अशी टोपी घालून घेतली असे झाले नाही, सरदार वल्लभभाई पटेल यांनी डोक्यावर टोपी घालून कधी फोटो काढून घेतला नाही. मी सर्व जातीधर्मांचा सन्मान करतो, पण मी माझ्या परंपरेचे जतन करतो. कोणी तरी त्यांची टोपी घालतानाचे फोटो काढून लोकांच्या डोळ्यांत धुळफेक करण्याचे काम मी करू शकत नाही…. भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षं देशभर साजरे होत आहे. यानिमित्ताने देशातील एकशे पस्तीस कोटी जनतेत देशप्रेम आणि देशभक्तीची जाज्वल्य भावना पंतप्रधानांनी प्रत्येक नागरिकांत निर्माण केली आहे. १५ ऑगस्टला तर देशभर सर्वत्र जिकडे तिकडे तिरंगा फडकत होता. गरिबांच्या मोहल्ल्यांपासून, झोपडपट्टी आणि वाडे-चाळींपासून ते उत्तुंग टॉवर्सपर्यंत, पानटपरीच्या दुकानापासून ते मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेल्स मॉल्सपर्यंत, रिक्षा, टॅक्सी, बसेस, मोटारी, ट्रक, टेम्पो अशा सर्व वाहनांवर तिरंगा फडकताना दिसला. देशाच्या ऐक्याचे दर्शन सर्व जगाला त्या दिवशी घडले ते नरेंद्र मोदींच्या कल्पकतेतून आणि प्रेरणेतून.… स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत राजधानी दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा हा प्रकल्प म्हणजे मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. ब्रिटिश राजवटीचे प्रतीक असलेला राजपथ आता इतिहासजमा झाला आणि त्या जागेवर विस्तृत व अाधुनिक कर्तव्यपथ निर्माण झाला. देशाच्या अस्मितेचे अप्रतिम असलेल्या कर्तव्यपथाचे पंतप्रधानांनी गणेशोत्सवातच देशाला लोकार्पण केले. कर्तव्यपथ म्हणजे नवी प्रेरणा, नवी ऊर्जा असे त्यांनी स्वत: वर्णन केले. इंडिया गेट शेजारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे कामही मोदींनीच प्रत्यक्षात साकार करून दाखवले. नेताजींच्या पुतळ्याच्या रूपाने अाधुनिक व बलशाली भारताची प्राणप्रतिष्ठा झाली असल्याचे स्वत: मोदी यांनीच म्हटले. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे कर्तव्यपथ या नामकरणाला विरोध केलाच. जुन्या रस्त्याचे विस्तारीकरण व सौंदर्यीकरण करायचे व त्याचे उद्घाटन करायचे, त्यातलाच हा प्रकार असल्याची टीका त्यांनी केली. मुळात त्याची गरज होती का? असा प्रश्न काँग्रेसने विचारला. मात्र काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्या पुत्राने मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ज्या इमारतींनी ब्रिटिशकालीन नावे आहेत ती सुद्धा बदलली पाहिजेत, असे त्याने म्हटले आहे. काँग्रेसमधून बाहेर पडलेले माजी प्रवक्ते जयवीर शेरगीर यांनीही नामकरणाचे स्वागत केले आहे. सेंट्रल व्हिस्टा एव्हेन्यूचे उद्घाटनाचे भाषण करताना मोदींनी पश्चिम बंगालपासून दक्षिणेतील राज्यापर्यंत सर्वांची मने जिंकली. नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण करताना त्यांनी सुभाषबाबू असा अनेकदा आदराने उल्लेख केला.
सुभाषबाबूंचे कार्यकर्तृत्व हे एका राज्यापुरते मर्यादित नाही हे त्यांनी देशाला सांगितले. दक्षिण भारताचे महान कवी भारतीयार (सुब्रम्हण्यम भारती) यांची देशाची एकता, अखंडता याची महती सांगणारी कविता मोदींनी म्हणून दाखवली. स्वातंत्र्यानंतर नेताजी सुभाष यांची उपेक्षाच झाली. तत्कालीन राज्यकर्त्यांनी त्यांना न्याय दिला नाही, मोदींनी मात्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत नेताजींचा २८ फुटी पुतळा उभारून राजधानीतील कर्तव्यपथावर त्यांना सन्मान दिला. गुलामगिरीचे अवशेष जे अगोदरच्या सत्ताधाऱ्यांनी जपले ते मोदींनी नष्ट करून टाकले. ज्या श्रमिकांच्या अहोरात्र परिश्रमातून सेंट्रल व्हिस्टाची उभारणी झाली, त्या सर्वांची मोदींनी प्रेमाने भेट घेतली. त्यांची आपुलकीने विचारपूस केली व त्यांच्या कामाची प्रशंसा केली. त्या सर्व कामगार-मजुरांना येत्या प्रजासत्ताक दिनाला संचलन पाहण्यासाठी विशेष पाहुणे म्हणून त्यांनी निमंत्रण दिले आणि आपल्या उदारमनाचे दर्शन घडवले. खालच्या पायरीवर उभे असलेल्या माणसाची दखल घेणारे व त्याला कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून निमंत्रण देणारे मोदी हे देशाचे पहिलेच पंतप्रधान असावेत. बनारसमध्ये काशी साकारली तेव्हाही तेथील श्रमिकांवर पुष्पवृष्टी झाली. त्यांनाही भेटून पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले.
ब्रिटिशांच्या काळात राजपथ हा किंग्ज वे म्हणून ओळखला जायचा, नंतर तो राजपथ झाला, त्याचे नामांतर आता कर्तव्यपथ झाले आहे. किंग्ज वे व राजपथ या गुलामगिरीच्या खुणा इतिहासजमा झाल्या आहेत. कर्तव्यपथच्या दोन्ही बाजूला विविध राज्यांचे खाद्य स्टॉल उभारले जाणार आहेत. बाजूच्या हिरवळीवर बसून लोक त्याचा अस्वाद घेऊ शकतील, अशी व्यवस्था होणार आहे. इथे तीनशे सीसीटीव्हींची नजर ठेवणार असून अकराशे मोटारींसाठी नवे पार्किंगही उभे राहत आहे.
सेंट्रल व्हिस्टा एव्हेन्यूच्या अगोदर स्वदेशी बनावटीच्या आयएनएस विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका मोदींनी नौदलाकडे सुपूर्द केली. कोच्चीच्या बंदरातून सागरात उतरलेल्या विक्रांतचा मोदींनी अभिमानाने उल्लेख केला. विक्रांत ही भारताची शान आहे. सागरातील भारताची महाशक्ती आहे. नौदलाला यानिमित्ताने नवा ध्वज देण्यात आला असून त्यावर शिवमुद्रा आहे. इथेही मोदींची कल्पकता, छत्रपती शिवरायांबद्दल असलेला अभिमान दिसून येतो. वीस हजार कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या विक्रांतवर तीस लढाऊ विमाने एकाच वेळी असतील. ब्रम्होस्त्र क्षेपणास्त्रही तैनात राहील. मोदी है तो मुमकीन है, त्याचेच विक्रांत युद्धनौका आणि सेंट्रल व्हिस्टा एव्हेन्यू ही प्रतीके आहेत. संसदीय कार्यपद्धतीत विरोधी पक्षाला कसा सन्मान द्यायचा हे मोदींनी दाखवून दिले. पण त्याचबरोबर केवळ विरोधासाठी विरोध व जातीपातीचे आणि केवळ भावनिक राजकारण करणाऱ्या नेत्यांना व त्यांच्या पक्षांना त्यांनी त्यांची जागा दाखवून दिली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले, जे ३७ वर्षे पक्षाचे सरचिटणीस होते, जे सात वर्षे राज्यसभेत विरोधी नेता होते, अशा ७३ वर्षांच्या गुलाम नबी आझाद यांना राज्यसभेतील निवृत्तीनंतर काँग्रेसने बाजूला सारले. पण त्यांच्या कार्याची दखल मोदींनी घेतली. ते जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री असताना मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा काश्मीरमध्ये दहशतवाद जोरात होता. त्यावेळी गुजरातच्या नागरिकांची सुखरूप सुटका करण्यासाठी आझाद यांनी कशी मदत केली हे मोदी यांनी त्यांच्या निरोपाच्या भाषणाच्या वेळी आवर्जून सांगितले. तुम्ही माझे खरे मित्र आहात, असा उल्लेख करून माझा दरवाजा आपणास सदैव खुला आहे, असेही सांगून त्यांच्या संसदीय कामाची पावती त्यांनी दिली.
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील ३७० कलम रद्द करण्याची हिम्मत मोदींनी दाखवली. तिहेरी तलाख पद्धत रद्द करून लक्षावधी मुस्लीम महिलांना न्याय मोदींनीच मिळवून दिला. बांगला देशमार्गे भारतात आलेल्या म्यानमारच्या रोहिंग्या मुस्लिमांना ते घुसखोर आहेत, अशी ठाम भूमिका त्यांनीच घेतली. १५ ऑगस्टला अमृत महोत्सवानिमित्ताने घर घर तिरंगा, हर मन तिरंगा अशी देशभक्तीची भावना मोदींनीच प्रत्येक भारतीच्या मनात रुजवली. आदिवासी समाजातील पहिली महिला द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती करून त्या समाजाला सन्मान देण्याचे काम मोदींनीच करून दाखवले, महाराष्ट्रात अपवित्र महाआघाडी सरकार कोसळल्यावर एकनाथ शिंदेंसारख्या कट्टर शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाच्या सिंहासनावर बसविण्याचा निर्णयही मोदींनीच घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशसेवेसाठी आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो, याच वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!