Saturday, January 18, 2025
Homeकोकणरायगडलम्पी आजाराबाबत शासनाने सुचविलेल्या उपाययोजनांचे पालन करावे : डॉ. किरण पाटील

लम्पी आजाराबाबत शासनाने सुचविलेल्या उपाययोजनांचे पालन करावे : डॉ. किरण पाटील

अलिबाग (वार्ताहर) : लम्पी स्कीन या पशुधनाच्या आजाराबाबत पशुपालकांनी घाबरून न जाता शासनाने सुचविलेल्या उपाययोजनांचे पालन करावे. एखाद्या जनावरामध्ये आजाराची लक्षणे दिसल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

लम्पी स्कीन हा पशुधनातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. मात्र हा आजार जनावरांपासून माणसांना होत नाही. यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. एखाद्या जनावराला हा आजार झाल्यास त्याच्यावर सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात मोफत उपचार करण्यात येत आहेत. तसेच या आजाराला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतींना गोठ्यांमध्ये कीटकनाशक फवारणी करण्याच्या सूचना दिल्याची माहिती डॉ. किरण पाटील यांनी दिली. या आजाराला आळा घालण्यासाठी जनावरांची खरेदी, विक्री, वाहतूक थांबवावी असेही त्यांनी सांगितले.

या आजाराची लक्षणे म्हणजे जनावरे खाणे पिणे सोडून देतात किंवा कमी खातात. तसेच त्याला ताप येतो, डोळ्यातून व तोंडातून चिकट स्त्राव येतो, पायाला सूज येते आणि अंगावर १० – २० मि.मि.च्या गाठी निर्माण होतात. त्यासाठीचा खबरदारीचा उपाय म्हणून जे जनावर या रोगाने आजारी आहे, त्यास ताबडतोब वेगळे केले पाहिजे व नजिकच्या पशुवैद्यकीय केंद्राला त्याची सूचना दिली पाहिजे. किंवा १९६२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. पशुवैद्यकाकडून बाधित जनावराची उपचार करून घेणे तसेच माशा, गोचीड व इतर तत्सम कीटक यांच्यापासून दुसऱ्या जनावरांना याचा संसर्ग होऊ नये यासाठी कीटकनाशक फवारणी करून घेणे आवश्यक असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -