- नारायण राणे
केंद्रीय सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग मंत्री
संपूर्ण भारतवासीयांचे लाडके प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी १७ सप्टेंबर २०२२ रोजी वयाच्या ७२व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. मोदीजींच्या कर्तव्यदक्ष स्वभावानुसार दरवर्षीप्रमाणे आपला वाढदिवस ते विविध विकासकामांमध्ये व्यग्र राहून कोणताही वैयक्तिक बडेजाव न करता साधेपणाने पार पाडतील, हे देशवासीय जाणतात.मोदीजींनी स्वत:ला भारतमातेच्या सेवेमध्ये समर्पित केले असून त्यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील शक्तिमान राष्ट्र होईल यात कोणतीही शंका नाही. त्यांना येणारे वर्ष आरोग्यपूर्ण, सुखा – समाधानाचे व अपेक्षापूर्तीचे जावो, अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. प्रधानमंत्री मोदीजींकडे विकासाचे व्हिजन आहे आणि भारताचा सर्वांगीण विकास हेच त्यांचे मिशन आहे. हे मिशन साध्य करण्यासाठी ते दिवसाचे अठरा-अठरा तास सतत कामामध्ये व्यग्र असतात. भारत वैश्विक महासत्ता व्हावा, हे ध्येय साध्य करण्यासाठी आपल्या देशाची अर्थव्यवस्था कणखर पायावर उभी राहिली पाहिजे, हे ते जाणतात. अर्थव्यवस्थेच्या मजबुतीकरणासाठी मोदीजींनी अनेक नवीन धोरणे आणली. सर्वसामान्यांचा आर्थिक विकास व्हावा व त्यायोगे देशाची अर्थव्यवस्था मजबूत व्हावी, यासाठी अनेक योजना व कार्यक्रम त्यांनी राबविले. ‘आत्मनिर्भर भारत’ हे या दृष्टीने टाकलेले मोठे व महत्त्वाचे पाऊल. या सगळ्या उपाययोजनांना मोठे यश मिळत असल्याचे दिसून येते. कोरोना काळात अर्थव्यवस्थेची वाढ थांबून ती आक्रसत होती. प्रधानमंत्री मोदीजींनी केलेल्या उपाययोजनांमुळे चालू वर्षात अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर दोन अंकी राहण्याची शक्यता असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून दिसून येते. प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताच्या अर्थव्यवस्थेने या वर्षी आणखी एक मैलाचा दगड सर केला. भारताला शेकडो वर्षे वसाहतवादाच्या गुलामगिरीमध्ये खितपत ठेवणाऱ्या इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेला मागे सारून भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचवी अर्थव्यवस्था म्हणून दिमाखात दाखल होत आहे.
भारतातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, गरीब, श्रमिक, मागास जाती-जमातींतील नागरिक, नोकरदार, छोटे व्यावसायिक व उद्योजक प्रधानमंत्री मोदीजींना युगपुरुष मानतात. सर्वसामान्यांची घराची, घरासाठी वीज पुरवठ्याची, घरामध्ये पाण्याची, श्रमिक, शेतमजूर व गोरगरिबांना दोन वेळेस मुखी घास पडण्याची, शेतकरी व छोट्या व्यावसायिकांची आर्थिक विकासाची छोटी-छोटी स्वप्ने साकार करण्यासाठी प्रधानमंत्री मोदीजींनी स्वत:ला वाहून घेतल्यामुळे हे सारे त्यांना युगपुरुष मानतात. मोदीजींनी देशाचा कारभार हाती घेतल्यापासून देशाच्या विकासाने भरारी घेतली. सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणाऱ्या देशव्यापी भव्य योजना हाती घेऊन त्या यशस्वी करण्याच्या मोदीजींच्या कुशल कारभारामुळे सर्वसामान्य लाभार्थ्यांची मोठी आकडेवारी देशासमोर येत असल्याचे आल्हाददायक चित्र दिसते. मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर बँकांमधील जन-धन खातेदारांची संख्या ४५.२१ कोटी झाली. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे कवच २८.३७ कोटी जनतेला मिळाले. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ १२.७६ कोटी लोकांनी घेतला. ‘आयुष्मान भारत’ योजनेखाली १७.९ कोटी लाभार्थ्यांना आरोग्य विमा योजनेचे कवच लाभले. प्रधानमंत्री आवास योजनेखाली २.३ कोटींपेक्षा जास्त घरांची निर्मिती झाली. शेतकरी व गोरगरीब लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये २२.६ लाख कोटी रुपये थेट जमा झाले. ‘सौभाग्य योजने’ अंतर्गत २.६ कोटी घरांमध्ये वीज पुरवठा सुरू झाला. उज्ज्वला योजनेअंतर्गत ९.१ कोटी स्वयंपाकाच्या गॅसच्या जोडण्या दिल्या गेल्या व त्या घरांमधील माता-भगिनींचे अश्रू थांबले. प्रधानमंत्री मोदीजींनी साधलेल्या विकासाची आणखी काही नेत्रदीपक आकडेवारी उपलब्ध आहे. ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत ६.२९ जलजोडण्या देण्यात आल्या. स्वच्छ भारत योजने अंतर्गत ११.५ कोटी स्वच्छतागृहांची निर्मिती झाली. प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत रस्त्यावरील ३१.९ लाख फेरीवाल्यांना कर्जाच्या सुविधेचा लाभ झाला. मुद्रा योजनेखाली ३५ कोटी लहान व्यावसायिकांना कर्ज पुरवठा करण्यात आला. कोरोना महामारीच्या लॉकडाऊन कालावधीमध्ये २० कोटी महिलांच्या बँकांमधील खात्यांमध्ये मदतीची रक्कम थेट जमा झाली. ‘स्टँड अप इंडिया’ योजनेखाली अनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थ्यांना ५,३०० कोटी रुपये कर्जवाटप झाले. आधीच्या तुलनेत २०१४ नंतर ५ पट अधिक एकलव्य निवासी छात्रालयांना मंजुरी देण्यात आली.
दहशतवादाचा समूळ नाश करण्याचे धोरण प्रधानमंत्री मोदीजींनी सुरुवातीपासून अंगीकारले. दहशतवाद्यांच्या कारवायांचा पोकळ तोंडी निषेध, निषेधाचे खलिते पाठविणे आणि संयुक्त राष्ट्र संघ तसेच अमेरिकेकडे रडगाणे गाणे या जुन्या गोष्टी झाल्या. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी प्रधानमंत्री मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय लष्कराने प्रत्यक्ष कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानात, म्यानमारमध्ये त्यांच्या भूमीवर जाऊन केलेले सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोटचे एअर स्ट्राइक ही त्याची जिवंत उदाहरणे! भ्रष्टाचार पूर्णपणे निपटून काढण्यावर मोदीजींचा खास कटाक्ष असतो. पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी ‘न खाऊंगा, न खाने दुंगा’ हे अगदी स्पष्ट शब्दांमध्ये बजावून सांगितले व त्याची कठोर अंमलबजावणीसुद्धा सुरू केली. मोदीजींच्या कठोर शिस्तीच्या धाकामुळे सरकारी कार्यालयांमधील भ्रष्टाचारावर चाप लागला. त्यामुळेच भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप आजवर होऊ शकले नाहीत. देशातील सरावलेल्या व्यावसायिकांना कठोर चाप तर बसलाच, पण सर्वसामान्य जनतासुद्धा भ्रष्टाचाराच्या विरोधात मोकळेपणे पुढे येऊन सक्रिय झाली. बँकांमध्ये अब्जावधी रुपयांचे घोटाळे करून देशाबाहेर पळणाऱ्या गुन्हेगारांना जरब बसविण्यासाठी प्रधानमंत्री मोदीजींच्या सरकारने नवीन इन्सॉल्व्हन्सी अॅण्ड बँकरप्सी कोड अमलात आणले. बँक घोटाळ्यांमुळे बँक बुडाल्यास सामान्य नागरिकांनी मुदत ठेवीमध्ये ठेवलेल्या बचतीचे रक्षण करण्यासाठी मोदी सरकारने ५ लाख रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवींना विम्याचे संरक्षण दिले. या व अशा इतर अनेक उपाययोजनांचे सुपरिणाम आता दिसू लागले आहेत. या वर्षी सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजे सरकारची मालकी असलेल्या जवळपास सगळ्या बँका फायद्यामध्ये आल्या आहेत.
प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत वेगाने आर्थिक प्रगती करून जगातील महासत्ता बनण्याचे स्वप्न साकारण्याचे ध्येय गाठण्याचे प्रयत्न करीत असतानाच २०२० साली जागतिक महामारी कोरोनाने भारताला गाठले. जीविताच्या भीतीने अर्थव्यवस्था ठप्प झाली. देशातील जनतेचे जीवित सुरक्षित राहावे, यासाठी मोदी सरकारने कंबर कसली. निर्बंधांमुळे उपजीविका गमावलेल्या गरीब व बेरोजगारांच्या रक्षणासाठी मोदीजींनी ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना’ राबविली. गरिबातील गरिबांना दोन वेळेचे अन्न व तेही मोफत मिळावे, यासाठी मोदी सरकारने ८० कोटी भारतीयांना १ लाख ७० हजार कोटी रुपयांचे अन्नधान्य मोफत दिले. करोडो लोकांची उपासमारीतून सुटका केली. अमेरिका, इंग्लंड व इतर पाश्चिमात्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनता मृत्युमुखी पडत असताना, तुटपुंज्या वैद्यकीय व्यवस्थेचा पुरेपूर वापर करून मोदी सरकारने कोरोनामुळे होणाऱ्या भारतातील नरसंहाराला आळा घातला. भारताने कोरोनाबरोबर दिलेल्या लढ्याचे जागतिक पातळीवरून कौतुक झाले. अनेक देशांतील शिष्टमंडळे भारताने कोरोनाविरुद्ध केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी भारतामध्ये येऊन गेली. कोरोनाविरुद्ध लढ्याला बळ व गती मिळावी यासाठी प्रधानमंत्री मोदीजींनी देशातील सर्व पात्र नागरिकांना मोफत लसीकरणाचा निर्णय घेऊन मोठे पाऊल उचलले. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ दिवस कोरोनाचा बुस्टर डोस विनाशुल्क देण्याचा कार्यक्रम मोदीजींनी राबविला. परिणामी, देशातील कोरोना आज पूर्णपणे आटोक्यात आला आहे. कोरोनाविरुद्ध जागतिक लढ्याचे नेतृत्व प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय औषध उद्योगाने समर्थपणे स्वीकारले. कोरोना लसीच्या उत्पादनामध्ये भारताने नेतृत्व केले. साऱ्या जगासाठी भारत हा कोरोनाविरोधी लसीचा उत्पादक व पुरवठादार झाला. भारतामध्ये निर्माण झालेल्या कोरोनाविरोधी लसींचा कित्येक आर्थिकदृष्ट्या कमकुवत व गरजवंत देशांना मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारने महत्त्वाच्या वेळी पुरवठा केला. जागतिक आरोग्य संघटनेने मोदीजींच्या नेतृत्वाखालील भारताच्या या कामगिरीचे मुक्तकंठाने कौतुक केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदीजींनी मुत्सद्दीपणा, दूरदृष्टी व अजोड बुद्धिमत्तेच्या जोरावर भारताची एक प्रगल्भ व बलशाली देश अशी प्रतिमा निर्माण केली व देशाला मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वार्ताहरांशी बोलताना नुकतीच प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजींची मुक्तकंठाने प्रशंसा केली व मोदीजी भारतीय जनतेसाठी अत्यंत उत्कृष्ट व मोलाचे काम करीत असल्याचे उद्गार काढले. गरिबांची कणव असलेल्या या अष्टपैलू नेतृत्वाचा गौरव व कौतुक करावे तेवढे थोडेच. देशातील १३५ कोटी भारतीयांना आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी आपले पंतप्रधान आहेत, याचा सार्थ अभिमान वाटतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आज जगभरात दबदबा व आदर निर्माण झाला आहे. आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना पुन्हा एकदा त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्यासाठी बळ द्यावे, यासाठी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो.