भारत हे वेगवान विकासाचे नवे मॉडेल आहे. जगातील पाचव्या क्रमांकांची अर्थव्यवस्था म्हणून भारताचा उदय आता कोणीही रोखू शकणार नाही. येत्या दशकभरानंतर विकसित देशांच्या रांगेतील अमेरिका आणि चीनच्या बरोबरीने भारताने आपले स्थान निर्माण केलेले असेल. भारताच्या मध्यमवर्गाचा वेगवान विकास आणि नव-मध्यमवर्गाचा उदय गेल्या आठ वर्षांत आपण अनुभवला. अशा विकासाचा सुकाणू ज्याच्या हाती असतो, त्याला लोकशाहीचा सातत्यपूर्ण कौल मिळत असतो. अशा नेत्याची गुणवत्ता, कार्यक्षमता, धोरणशक्ती, मूल्ये, यांवरच नेतृत्वाची क्षमता सिद्ध होत असते. गेल्या काही वर्षांत देशाच्या कुटुंबकेंद्रित राजकारणाने जनतेची जाणीवपूर्वक दिशाभूल केली आणि नेतृत्वाचा हक्क केवळ घराणेशाहीच्या वारसांनाच असतो, असे वातावरण निर्माण केले गेले. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा उदय झाला आणि भ्रम माजविण्याचे हे प्रयत्न पुसले जाऊ लागले. लोकशाहीला घराणेशाहीच्या मुखवट्यात बंद करण्याचा काँग्रेसचा डाव संपून सर्वसामान्यांमधील क्षमतावान व्यक्तीदेखील देशाचे नेतृत्व करू शकते, याची नवी जाणीव देशात रुजत आहे. घराणेशाही हा देशाच्या लोकशाहीपुढील सर्वात मोठा धोका आहे हे गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने सांगणाऱ्या नरेंद्र मोदी नावाच्या नेत्यामुळे आता भारतीय संविधानाला अपेक्षित असलेली सुदृढ लोकशाही स्थापित होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही काही वर्षांपर्यंत काँग्रेस पक्षाला उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या नेतृत्वाचे वलय होते. पं. जवाहरलाल नेहरूंनी कन्या इंदिरा गांधी यांना आपला राजकीय वारस म्हणून देशासमोर आणण्यास सुरुवात केली. अगोदर पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलून त्यांनी इंदिरा गांधींना काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा मान बहाल केला आणि लोकशाहीवर घराणेशाहीचा अंमल सुरू झाला. इंदिरा गांधींनी नेहरूंच्याच परंपरेचा पायंडा सुरू ठेवून पुत्र संजय गांधी यांचे बस्तान बसविण्यास सुरुवात केली तेव्हा काँग्रेसवर गांधी घराण्याचा पूर्ण प्रभाव प्रस्थापित झाला होता. संजय गांधींच्या दुर्दैवी निधनानंतर राजीव गांधी यांच्यावर नेतेपदाची झूल चढविण्यास सुरुवात झाली. राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसला घराणेशाहीपासून मुक्ती मिळेल या अपेक्षेने देश नव्या नेतृत्वाची प्रतीक्षा करत असतानाच सोनिया गांधींनी पक्षाचा ताबा घेतला. सर्वाधिक काळ काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या नेता म्हणून सोनिया गांधींची पक्षीय राजकारणाच्या इतिहासात नोंद झाली आणि गांधी-नेहरू घराण्याच्या आधाराखेरीज काँग्रेस तग धरूच शकणार नाही, असाच समज दृढ होत गेला. पिढ्यांमागून पिढ्यांच्या पक्षीय घराणेशाहीच्या माध्यमातून देशाच्या सत्तेवरही याच घराण्याची पक्की पकड राहिली. काँग्रेस हा गांधी-नेहरू घराण्याची खासगी मालकी असलेला पक्ष ठरावा अशा ठामपणे हे घराणे पक्षावर घराणेशाहीची पताका फडकवत राजकारणात वावरत आहे. लोकशाहीमध्ये काँग्रेसने रुजविलेल्या या प्रथेचा फायदा घेत अनेक लहान-मोठ्या नेत्यांनी प्रादेशिक पक्षांच्या मुखवट्याआडून आपल्या घराण्यांना राजकारणात प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेपर्यंत सर्वत्र विशिष्ट घराण्यांच्या वारसांना लोकप्रतिनिधित्वाची झूल चढवत हे नेते राजकारणावर आपली पकड घट्ट करू लागल्याने, लोकशाहीला अपेक्षित असलेल्या सर्वसामान्यांचा आवाज मात्र घुसमटत राहिला. एकाच नेत्याच्या मुठीत राजकारणाची सारी सूत्रे एकवटल्याने सत्तेची फळे सामान्यांपर्यंत पोहोचलीच नाहीत. थोडक्यात, राजकीय पक्ष म्हणजे नेत्याभोवतीच्या भाटांचे कोंडाळे असे या घराणेशाही राजकारणाचे रूप देशात जम्मू-काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत जागोजागी फोफावत गेले. भारतीय जनता पार्टी, काही लहान पक्ष आणि डावे पक्ष वगळता, घराण्यांच्या वर्चस्वाचे राजकारणाचे ग्रहण लोकशाहीला ग्रासत राहिले आणि सार्वजनिक जीवनातील नीतिमूल्यांची घसरण होत गेली.
घराण्याच्या हिताच्या राजकारणाने जनहिताच्या विचारांवर मात केल्याने सुशासन व्यवस्था कोलमडली, विकासाचे दरवाजे केवळ काही मोजक्या घराण्यांकरिताच उघडले गेले. नरेंद्र मोदी नावाच्या एका सामान्य कुटुंबातून उदयास आलेल्या नेतृत्वाने या प्रस्थापित राजकारणास पहिला जोरदार धक्का दिला आहे. पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय जीवनात प्रवेश केलेला एक नेता कोणा पूर्वजाच्या राजकीय पुण्याईवर नव्हे, तर असामान्य नेतृत्वक्षमता, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि परंपरांची जपणूक करतानाही नवतेचा ध्यास धरणारी स्वार्थनिरपेक्ष दूरदृष्टी या गुणांच्या जोरावर पंतप्रधानपर्यंत पोहोचला. घराणेशाहीच्या विळख्यात जखडलेल्या सत्तेच्या राजकारणास हा पहिला धक्का तर होताच, पण पुढे नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीच्या विरोधात पहिला आवाजही उठविला आणि घराण्यांच्या पुण्याईवर सत्तेचे लोणी चाखणाऱ्या पक्षांना आव्हान दिले. परिश्रमी मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच घराणेशाही मिरवणाऱ्या सर्वात मोठ्या पक्षाला-काँग्रेसला-हादरा दिला. त्या निवडणुकीत घराणेशाहीचे वारस किंवा जातीच्या भांडवलावर राजकारण करणाऱ्या अनेकांचे स्थान डळमळीत झाले. २०१९ च्या निवडणुकीतही याचीच पुनरावृत्ती झाली आणि घराणेशाहीच्या राजकारणाचा अंतकाळ सुरू झाल्याच्या संकेतांनी लोकशाही सुखावली.
एकाच कुटुंबाची पक्षावर सत्ता, असे चित्र देशात प्रत्येक राज्यात दिसून येते. यातूनच पक्षावर घराणेशाही वर्षानुवर्षे सातत्याने लादली जाते. घराणेशाहीच्या राजकारणात देश, समाज, जनता यांहूनही कुटुंब, घराणे, नातेवाईक, यांचेच हित जपले जाते. कुटुंब हाच या राजकारणाचा केंद्रबिंदू असतो आणि कुटुंबप्रमुखाच्या एकखांबी आधारावर या पक्षांच्या राजकारणाचा तंबू उभा असतो. आपल्याखेरीज कोणीच समाजाचा किंवा देशाचा तारणहार असू शकत नाही, अशी भावना समाजात रुजविण्याचा पद्धतशीर प्रयत्न ही घराणी करत असतात. लोकशाहीची ही कुचेष्टा थांबवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील प्रत्येक नागरिकाच्या लोकशाहीची पुनर्स्थापना करण्याचा ध्यास आता मोदीजींनी घेतला आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली घराणेशाहीचे राजकारण मोडीत काढण्याची मोहीम भाजपने हाती घेतली आहे. एक प्रकारे हे राजकारणाचे आणि लोकशाहीचे शुद्धीकरण आहे आणि त्यातून उदयाला येणाऱ्या नव्या सुदृढ लोकशाहीची फळे देशाच्या प्रत्येक नागरिकास चाखावयास मिळणार आहेत. जिथे शक्य आहे, तेथे प्रादेशिक पक्षांचे मुखवटे धारण केलेल्या राजकीय घराणेशाहीला विसर्जित करण्याची मोहीम मोदीजींच्या नेतृत्वाखाली भाजपने हाती घेतली आहे आणि या घराण्यांच्या हाती एकवटलेली सत्ता सामान्यांपर्यंत विकेंद्रित करण्याचा नवा प्रयोग देशात सुरू झाला आहे. हा प्रयोग सोपा नाही. हरियाणा, बिहार, तमिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आदी अनेक राज्यांत प्रादेशिक पक्षांचा बुरखा पांघरलेल्या घराण्यांनी सत्तेचा ताबा आपल्या हाती ठेवला होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदीजींनी पद्धतशीरपणे या सत्ताधीशांचे वर्चस्व संपविण्याची आखणी केली. महाराष्ट्रात त्याची पायाभरणी सुरू झाली आहे. काँग्रेसलाही घराणेशाहीच्या कचाट्यातून मुक्त होण्याचे वेध लागले आहेत. लोकशाहीत सगळे समान असतात आणि काहीजण अधिक समान असतात, असा अनेक दशकांपासून देशात रुजलेला समज दूर करण्याची प्रक्रिया मोदीजींच्या सक्षम, खंबीर आणि द्रष्ट्या नेतृत्वाखाली सुरू झाली आहे. तिला बळ देण्यासाठी उभा देश त्यांच्यासोबत राहील, ही त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा!
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…