मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरूवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी तळकोकणाचे भवितव्य बदलणाऱ्या एका महत्त्वाच्या प्रकल्पाविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. हा प्रकल्प १२७ किलोमीटर लांबीच्या कोकण किनारपट्टी रेल्वे मार्गाचा प्रकल्प आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महत्त्वाचे किनारे रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी कणकवली ते सावंतवाडी व्हाया देवगड, मालवण आणि वेंगुर्ला असा हा रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे. या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पासाठी नारायण राणे यांनी पुढाकार घेऊन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना २०२१ साली पत्र देखील लिहिले होते. मात्र त्यामध्ये राज्य सरकारचा देखील महत्त्वाचा वाटा असल्याने राणे यांनी मुख्यमंत्र्यांशी भेटून हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी सविस्तर चर्चा केली.
या रेल्वे मार्गावर टुरिस्ट ट्रेन किंवा माथेरान, दार्जिलिंग आणि शिमला प्रमाणे ट्रेन सुरू करावी, अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे. काही वर्षांपूर्वी राणे यांनी मालवण येथे एका कार्यक्रमात याबद्दल सूतोवाचही केले होते. त्यानंतर त्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर कोकण रेल्वे प्रशासनाने या प्रस्तावित ‘टॉय ट्रेन’ प्रकल्पाचा प्राथमिक सर्व्हेही केला होता. मात्र त्यानंतर या विषयाला चालना मिळाली नव्हती. ही मूळ कल्पना स्वतः राणे यांचीच असल्याने केंद्रीय मंत्री होताच त्यांनी या विषयाला चालना मिळावी आणि यासाठी प्रयत्न सुरू केले.
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. इथला निसर्गरम्य परिसर, मनाला भुरळ पाडणारे समुद्रकिनारे, इथले ऐतिहासिक किल्ले, इथली कला संस्कृती हे पर्यटकांचे खास आकर्षण बनले आहे. या बाबी विचारात घेऊन ‘टुरिस्ट टॉय ट्रेन’ लवकरात लवकर सुरू करावी, अशी आग्रही मागणी राणे यांची आहे. कोकणातील इतर प्रकल्पप्रमाणे जमीन संपादन आणि निधीअभावी हा प्रकल्प जर रखडला नाही, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीला भारतातील सर्वाधिक पर्यटक प्रतिवर्षी भेट देतील यात शंका नाही. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून या ठिकाणी मिनी ट्रेन सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आगामी बजेटमध्ये हा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.