उदय पिंगळे
अशा कोणत्या कंपन्या आणि मॅनेजमेंट आहे की जे येणाऱ्या आव्हानांना तोंड देत, येणाऱ्या वरील संधीचा पुरेपूर फायदा उठवतील आणि शेयर होल्डर्सना मालामाल करतील? त्यांना ओळखायचे कसे? त्यांच्यामध्ये कोणते गुण आवश्यक वाटतात? यादृष्टीने आपल्या नजरेसमोर काही कंपन्या ठेवाव्यात. उदा. पॉलीकॅब, फाईन ऑर्गनिक्स, दीपक फर्टिलायझर, कोटक बँक, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, लार्सन, टीसीएस, इन्फोसिस, पॉवरमॅक, टिमकेन इ. यात अजूनही भर पडू शकते. अशा कंपन्यांनी सातत्याने चांगले रिटर्न दिले आहेत. त्यात तुमची थांबण्याची तयारी असेल, तर नक्की फायदा होईल; परंतु असे शेअर्स जर ५२ आठवड्यांच्या किमान भावाच्या जवळपास घेता आले तर लवकर आणि अधिक फायदा होऊ शकतो. आज ज्या आघाडीच्या कंपन्या आहेत त्या एकेकाळी सामान्य कंपन्या होत्या. असे शेअर ओळखण्यासाठी काही प्राथमिक गोष्टी माहिती असायला हव्यात. कोणत्या प्रकारातील कंपनी आहे, त्यांचे व्यवस्थापन आणि त्यांचे अन्य व्यवसाय? व्यवसाय चक्राप्रमाणे तेजीत आहे की मंदीत? मूलभूत विश्लेषण आणि तांत्रिक विश्लेषण याचा भाग येईल. यात विविध गुणोत्तराचा समावेश होतो. त्यांची तुलना त्या प्रकारच्या उद्योगांच्या सरासरीशी करावी. भाव आणि उलाढाल यांचा परस्परांशी असलेला संबंध. उपलब्ध चार्टच्या साहाय्याने गोल्डन गेट तयार झाल्याचे संकेत मिळत असताना खरेदी करण्याचे तंत्र वर्षभरात भावातील फरकाचा लाभ घेऊन या लाभाची आणि लाभांशाची योग्य वेळी त्याच शेअरमध्ये गुंतवणूक. बाजारात होणाऱ्या हालचालीमुळे मनोबल कमी अधिक न होता तेजी, मंदी यांच्याशी मुकाबला करून मंदी ही संधी समजून लाभ घेणे अथवा काहीही न करणे. यासाठी आपल्या गुंतवणुकीच्या ५०% गुंतवणूक करून उरलेली ५०% रक्कम तशीच ठेवावी. जर हे शेअर १०% खाली गेले तर थोडे शेअर्स विकत घ्यावे जर १०% भाववाढ झाली तर थोडे शेअर्स विकावेत. यामुळे भाव वाढो अथवा कमी होवो एक गुंतवणूकदार म्हणून आपल्याकडे विक्री आणि खरेदीच्या संधी उपलब्ध होतील. जर भाव त्याहून वरच्या किंवा खालच्या पातळीवर स्थिर झाले, तरीही हेच निकष वापरावे म्हणजे आपले गुंतवणुकीचे सरासरी मूल्य कमी होईल आणि त्याचा मनावर ताण येणार नाही.
योग्य वेळी बाहेर पडून आवश्यक असल्यास पुन्हा खरेदी करणे किंवा नुकसान होत असेल तरीही त्याचा कर नियोजन या दृष्टीने काही लाभ घेता येईल का? असा विचार करणे. कंपनीचा नफा, त्यात होणारी वाढ, नफा कमी होण्याची कारणे, भविष्यातील योजना.
लार्ज, मिड, स्मॉल कंपन्या कुणाला म्हणायचे याचे निकष सेबीने ठरवले असून ही यादी दर सहा महिन्यांनी अद्ययावत होत असते. या यादीत पूर्वी स्मॉलकॅप कंपनी मिडकॅपमध्ये किंवा मिडकॅप कंपनीने लार्ज कॅपमध्ये प्रवेश केला आहे का ते पाहून निर्णय घेता येईल. नावीन्यपूर्ण क्षेत्रात असलेल्या आणि स्थिर होऊन नफा मिळवू लागलेल्या कंपन्या शोधता येतील.
शेयर मार्केट विषयी क्लास चालवणारे, डे ट्रेडिंग आणि टेक्निकल अनालिसिसवर भर देतात. त्या फक्त तात्पुरत्या उपाययोजना असतात. त्यांची परिणिती ब्रोकर लोकांच्या व्यवसाय वृद्धीत होते. ब्रोकर लोकांना तुमचा भांडवल संच सतत हलता हवा असतो. असे झाल्यानेच, उलाढाल वाढून त्यांच्या व्यवसायात वृद्धी होते. त्यामुळे असे तथाकथित व्यावसायिक किंवा क्लासचे चालक यांना तुम्हाला स्वयंपूर्ण करणे हा उद्देश नसतोच. ते कायमच तुम्हाला त्यांच्यावर अवलंबून राहायला लावतील. एखादे सॉफ्टवेअर घ्यायला लावतील, याला काही सन्माननीय लोक अपवाद आहेत. पण सर्वसाधारण कल हा तुम्ही पांगळे कसे राहाल असाच असतो. चालता न येणारा जसा वॉकरची मदत घेतो आणि बरे झाल्यावर वॉकरचा उपयोग थांबवतो त्याप्रमाणे या सर्वांचीच मदत आपण शिकण्यासाठी आणि प्राथमिक माहिती मिळावी एवढ्यासाठीच करावी. चालता व्यवस्थित यायला लागल्यावर जसे आपण वॉकर वापरणे सोडून देतो त्याप्रमाणे यांचा वापर थांबवावा.
बँकेतील रिलेशनशिप मॅनेजर याहून भयानक असतात. ते तुमच्या गरजेचा अजिबात विचार करीत नाहीत. गरज असो अथवा नसो, कोणालाही युलीप योजना स्वीकारण्यास सांगून फक्त तीन वर्षे पैसे भरा नंतर नाही भरलेत तरी चालतील, असे सांगून गुंतवणूकदारांचे नुकसान करतात. बँकेत काम करणाऱ्या माणसाने सांगितल्याने लोक त्यावर पटकन विश्वास ठेवतात. एखादी गोष्ट जाणकार व्यक्तीकडून समजून घ्यावी. त्यासाठी आवश्यक असेल तर थोडीफार रक्कम खर्च करावी ती ज्ञानातील गुंतवणूक ठरेल असे कुणाला वाटतच नाही. त्यामुळे ६०% ते ८४% या दराने व्याज देतो. वर्षात पैसे दुप्पट करून देतो अशा आमिषाला लोक बळी पडतात आणि सर्वस्व गमावतात. आज अनेकांना काही न करताच, चांगला परतावा मिळवून देणाऱ्या टिप्स हव्या असतात. या मानसिकतेचा धूर्त लोक फायदा घेतात.
हे क्षेत्रच खूप मोठे आहे, त्यामुळे ज्ञान अद्ययावत ठेवून निष्कर्ष काढावे आणि पडताळून पाहावे. याचे निश्चित नियम बनवणे शक्य नाही. वेगवेगळ्या कोनांतून याचा विचार करावा लागतो. इतके सर्व करूनही, पुरेशी काळजी घेऊनही निष्कर्ष चुकू शकतात याची जाणीव ठेवून, त्यातूनही अजून नवीन काही शिकण्याची तयारी ठेवावी.लेखात उल्लेख केलेल्या कंपन्या केवळ अभ्यासासाठी असून यात गुंतवणूक करण्याची शिफारस नाही.