Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीएसटीच्या फाटलेल्या पत्र्यामुळे दोन तरुणांचे हात कापले

एसटीच्या फाटलेल्या पत्र्यामुळे दोन तरुणांचे हात कापले

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात धावत्या एसटी बसच्या फाटलेल्या पत्र्यामुळे रस्त्याच्या कडेला मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन तरुणांचे हात कापले गेले. या घटनेत दोन्ही तरुणांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारांसाठी सुरुवातीला मलकापूर सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यानंतर त्यांना जळगावमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मलकापूर-पिंपळगाव देवी मार्गावर सकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी काही तरुण रस्त्याच्या कडेला पोलीस भरतीसाठी व्यायाम करत होते. यावेळी याच मार्गावरुन मलकापूर आगाराची बस जात असताना चालकाच्या केबीनच्या मागील बाजूचा पत्रा तुटून बाहेर आलेला होता. त्यामुळे या व्यायाम करणाऱ्या तरुणांना या पत्र्याचा धक्का लागून दोन तरुणांचे हात कापले गेले. हा अपघात इतका भीषण आहे की दोन्ही तरुणांचे हात अक्षरशः तुटून पडले. विकास गजानन पांडे व परमेश्वर पाटील असे या दोन्ही तरुणांची नावे आहेत.

बस चालकाने बस धामणगाव बढे पोलीस स्थानकात उभी केली असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

मलकापूर आगारातील बस पहाटे साडेपाच वाजता मलकापूरहून पिंपळगावदेवी इथे जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी पिंपळगावदेवी आणि मलकापूर दरम्यान काही तरुण हे रस्त्याच्या कडेला व्यायाम करत होते. हे तरुण रोज या ठिकाणी व्यायाम करत असतात, पोलीस भरतीची तयारी करत होते. याचवेळी संबंधित एसटी भरधाव वेगाने इथून जात असताना बसचा धक्का मुलांना लागला. यात दोन मुलांचे हात अक्षरश: कापले गेले आहेत. हात नुसते कापले नाहीतर तर तुटून जवळपास ५० ते ६० फूट अंतरावर जाऊन पडले. यावेळी चालकाने बस थोडा वेळ थांबवली, पाहिले आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला निघून गेला. या जखमी मुलांना तिथेच सोडून चालक निघून गेला. ही घटना जवळच्या गावातील लोकांना समजल्यानंतर त्यांनी या दोन्ही तरुणांना रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान संतप्त जमावाने मलकापूर बस आगार व्यवस्थापकाच्या कार्यालयात हल्लाबोल केला. आगार व्यवस्थापक दराडे हे कार्यालयात असताना, या बसचा पत्रा तुटून बाहेर आलेला असूनही ती आगाराबाहेर कशी काढली, असा सवाल रहिवाशांनी विचारला. एखादी एसटी बस आगारातून बाहेर पडण्यापूर्वी तिची तपासणी केली जाते. काही त्रुटी वगैरे नाही या हे पाहिले जाते. परंतु संबंधित बसचा पत्रा बाहेर आलेला असूनही ती आगाराबाहेर पडली आणि पुढील दुर्घटना घडली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -