Tuesday, March 25, 2025
Homeमहत्वाची बातमीसाखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना थकवले

साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना थकवले

अभयकुमार दांडगे

मराठवाड्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत खूप कमी आहे. तरीदेखील मराठवाड्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांची यंदाच्या गाळपामधील कोट्यवधी रुपयांची रक्कम थकविली आहे. मराठवाड्यातील नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील २७ पैकी १४ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची १४० कोटी ५८ लाख रुपयांची एफआरपी रक्कम म्हणजेच रास्त व किफायतशीर दर थकविला आहे. काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकले आहेत. ही रक्कम त्यांना अद्यापही मिळालेली नाही. गाळप हंगाम बंद होऊन चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे, तरीही हजारो ऊस उत्पादक शेतकरी या साखर कारखान्याकडे आज ना उद्या एफआरपीची रक्कम मिळेल म्हणून आशेने वाट पाहत आहेत. ज्या साखर कारखान्यांकडे एफआरपीची रक्कम थकीत असते अशा साखर कारखानांना पुन्हा गाळप हंगामाची परवानगी दिली जात नाही, त्यामुळे आयुक्तांचे आदेश असतानाही अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम थकविली आहे. याबाबत मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे नेते प्रल्हाद इंगोले तसेच गुणवंत पाटील यांनी अनेकदा आवाज उठविला आहे. मराठवाड्यात जे काही साखर कारखाने आहेत, त्यावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे वर्चस्व आहे. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यासोबत सत्तेचा उपभोग घेतला. शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे अनेकदा शेतकऱ्यांच्या बाजूने बोलले. एवढेच नव्हे तर शिवसेनेची सत्ता आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो, असे ते नेहमी म्हणत; परंतु ते सत्तेवर आले व सत्तेतून गेले, त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा काही कोरा केला नाही, अशी लाखो शेतकऱ्यांची खंत आहे.

परभणी जिल्ह्यातील योगेश्वरी सहकारी साखर कारखाना यांच्याकडे ६४ लाख रुपये एफआरपी रक्कम थकीत आहे. तसेच परभणी जिल्ह्यातील बळीराजा सहकारी साखर कारखाना यांच्याकडे सर्वाधिक ३६ कोटी ३० लाख ७ हजार रुपयांची एफआरपी रक्कम थकीत आहे. तसेच परभणी जिल्ह्यातील श्री लक्ष्मी नरसिंह साखर कारखाना यांच्याकडे देखील ५ लाख ८७ हजार रुपये रक्कम थकीत आहे. हिंगोली जिल्ह्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना डोंगरकडा यांच्याकडे ८ कोटी ६४ लाख १७ हजार रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकले आहेत. या कारखान्याचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे आहेत. हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा सहकारी साखर कारखाना यांच्याकडे ११ कोटी ६९ लाख ४० हजार रुपये थकीत आहेत. हा कारखाना राष्ट्रवादीचे नेते जयप्रकाश दांडेगावकर यांचा आहे. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा येथील टोकाई सहकारी साखर कारखाना यांच्याकडे शेतकऱ्यांचे १३ कोटी ३१ लाख ६५ हजार रुपये थकीत आहेत.

शेतकरी हा आर्थिक विकासाचा कणा आहे. शेतकरी उन्हात तसेच पावसाळ्यात दिवसभर शेतात राबत असतो त्यामुळे शेतात जे काही पिकते ते बाजारात विक्री केल्यानंतर पैशांची उलाढाल होत असते. मराठवाडा हा शेतीच्या तुलनेत कोरडवाहू भाग म्हणून ओळखला जातो. ऊस उत्पादक शेतकरी या भागात कमी आहेत. जे शेतकरी हिम्मत करून उसाचे पीक घेतात त्यांना पैशासाठी साखर कारखानदारांकडे डोळे लावून बसावे लागतात. हिंगोली जिल्ह्यातील शिऊर साखर कारखाना यांच्याकडे शेतकऱ्यांचे ४ कोटी ८३ लाख २२ हजार रुपये एफआरपी थकीत आहे. नांदेड जिल्ह्यातील अशोकराव चव्हाण हे अध्यक्ष असलेल्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याकडे ९ कोटी २८ लाख ७५ हजार रुपये शेतकऱ्यांचे थकीत आहेत. नांदेड जिल्ह्यातील सुभाष सहकारी साखर कारखाना हडसणी यांच्याकडे १२ कोटी ८३ लाख २३ हजार रुपये थकीत आहेत, तर मारोतराव कवळे सहकारी साखर कारखाना यांच्याकडे देखील शेतकऱ्यांचे ६ कोटी ५१ लाख २५ हजार रुपये थकीत आहेत. हे देखील काँग्रेसचेच नेते म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादीचे नेते राजेश कुंटूरकर यांच्या कुंटूरकर साखर कारखान्याकडे ६ कोटी १८ लाख ९२ हजार रुपये शेतकऱ्यांचे एफआरपी थकलेले आहेत. नांदेड जिल्ह्यातील वेंकटेश्वरा साखर कारखाना यांच्याकडे १६ कोटी २९ लाख १८ हजार रुपये थकीत आहेत. लातूर जिल्ह्यातील सिद्धी साखर कारखाना बालाघाट यांच्याकडे १५ कोटी ३३ लाख ७१ हजार रुपये शेतकऱ्यांचे थकले आहेत, तर लातूर जिल्ह्यातील श्री साईबाबा साखर कारखाना शिवनी यांच्याकडे १ कोटी ३७ लाख २९ हजार रुपये थकीत आहेत.

परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर जिल्ह्यांतील २७ पैकी १४ साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे १४० कोटी ५८ लाख २ हजार रुपये एफआरपी थकीत आहेत. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड साखर कारखाना तसेच परभणी जिल्ह्यातील रेणुका साखर कारखाना तसेच ट्वेंटीवन साखर कारखाना यांनी एफआरपीची कुठलीही रक्कम थकविली नाही. हिंगोली जिल्ह्यातील कपिलेश्वर साखर कारखाना जवळा बाजार यांनी देखील एफआरपीची कुठलीही रक्कम थकविली नाही. तसेच नांदेड जिल्ह्यातील बारहाळी येथील शिवाजी सहकारी साखर कारखाना यांनी देखील एफआरपीची कुठलीही रक्कम थकविली नाही. लातूर जिल्ह्यातील मांजरा सहकारी साखर कारखाना तसेच विलास सहकारी साखर कारखाना, रेना सहकारी साखर कारखाना, संत श्री मारुती महाराज सहकारी साखर कारखाना, जागृती साखर कारखाना, पन्नगेश्वर साखर कारखाना तसेच ट्वेंटीवन साखर कारखाना यांनी देखील एफआरपीची कुठलीही रक्कम थकविली नाही.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये ज्या १४ साखर कारखान्यांकडे थकले आहेत त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ही एफआरपीची थकीत रक्कम व्याजासह द्यावी, यासाठी जन आंदोलन उभारण्यात येत आहे. मराठवाड्यातील अनेक साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तोड वाहतुकीचा खर्च कमी दिला आहे. कुठलीही निवडणूक आली की, शेतकऱ्यांना वोट बँक म्हणून पाहणाऱ्या नेत्यांनी किमान शेतकऱ्यांचे तरी पैसे थकीत ठेवू नये, असा सूर मराठवाड्यातून निघत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -