Saturday, July 20, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखगोव्यातील फूट;‘राहुल यात्रेला’ला अपशकून

गोव्यातील फूट;‘राहुल यात्रेला’ला अपशकून

देश स्वतंत्र होण्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर बराच काळ ज्या एका पक्षाचे वर्चस्व होते, त्या सुमारे दीडशे वर्षांचा इतिहास असणाऱ्या काँग्रेस पक्षाची विद्यमान स्थिती अत्यंत दयनीय झालेली दिसत आहे. सर्वात जुना असलेला हा पक्ष हळूहळू जर्जर आणि दिवसेंदिवस क्षीण होत चालला आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाच्या ताब्यात सध्या काही मोजक्याच राज्यांची सत्ता असून एक एक राज्य या पक्षाच्या हातून निसटत चालले आहे. या पक्षाची अशी दयनीय अवस्था होण्यास या पक्षाचे सर्वोच्च नेतेच कारणीभूत आहेत हे निश्चित. या पक्षाची धुरा अनेक वर्षे गांधी घराण्याकडे आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी यांच्याकडे जेव्हा पक्षाचे नेतृत्व आले त्यानंतर काही काळ या पक्षाला बरे दिवस होते, असे म्हणण्यास हरकत नाही. सोनिया गांधी पक्षाध्यक्ष आणि डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान अशी दहा वर्षे या पक्षाने विविध पक्षांचा समावेश असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतृत्व करीत सत्ता राबविली. पण त्यानंतर २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने २८२ जागा मिळवित नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळविले आणि बघता-बघता काँग्रेससह विरोधी पक्ष क्षीण होत गेला. त्यानंतर २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपने फार मोठे यश मिळवित स्वबळावर ३०३ जागा मिळवून विरोधकांचे पार तीनतेरा वाजविले. देशाचे विरोधी पक्षनेतेपद मिळविणाऱ्या काँग्रेस खासदारांची संख्या पार ५०च्या खाली गेली आणि नंतर तर ती आणखी कमीकमी होत गेलेली दिसत आहे. सोनियांनंतर या पक्षाला आणि पर्यायाने देशाचे नेतृत्व करू पाहणाऱ्या राहुल गांधी यांना देशातील जनतेने बरेचदा नाकारलेले दिसले. नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना करणे कदापि शक्य होणार नाही, इतकी या दोन नेत्यांमध्ये तफावत दिसून येत आहे. मोदींचे नेतृत्व दिवसेंदिवस भक्कम होताना दिसत आहे, तर राहुल यांची लोकप्रियता कमालीची घटताना दिसत आहे. अशा परिस्थितीत गलितगात्र झालेल्या काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी राहुल गांधी यांनी केरळच्या कन्याकुमारी ते काश्मीर अशी ‘भारत जोडो’ यात्रा सुरू केली आहे. यात्रेच्या माध्यमातून देशभरातल्या जनतेला साद घालून केंद्रातील मोदी यांना सत्तेवरून खाली खेचण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधींना मोठा धक्का बसला आहे.

केरळमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा जोरात सुरू असताना गोव्यामध्ये मात्र या पक्षाला नवा हादरा बसला आहे. माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांसह आठ विद्यमान आमदारांनी बुधवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. या आठ सदस्यांच्या पाठिंब्यामुळे ४० सदस्यांच्या गोवा विधानसभेत भाजपचे संख्याबळ २८ वर पोहोचले आहे. आठ महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर गोवा विधानसभेमध्ये काँग्रेसचे ११, तर भाजपचे २० आमदार होते. आता काँग्रेस आमदारांच्या पक्षबदलामुळे भाजपचे संख्याबळ वाढले आहे. याशिवाय भाजपला महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाच्या दोन आणि तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे ४० सदस्यांच्या विधानसभेमध्ये आता भाजपला ३३ आमदारांचा पाठिंबा आहे.

गोवा काँगेसमध्ये गेले अनेक दिवस खदखद सुरू होती. पण पक्षनेतृत्वाने नेहमीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याचा परिणाम म्हणून गोवा काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह मायकल लोबो, डेलिलाह लोबो, केदार नाईक, संकल्प आमोणकर, राजेश फळदेसाई, अॅलेक्सिओ सिक्वेरा आणि रुडॉल्फ फर्नांडिस या आठ आमदारांनी भाजपची वाट धरली. आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता काँग्रेसकडे केवळ तीन आमदार उरले आहेत. विशेष म्हणजे ही मोठी फूट असल्याने विधिमंडळ पक्ष चक्क भाजपमध्ये विलीन करण्याची औपचारिकता पूर्ण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याच्या आणि गोव्याच्या विकासाच्या उद्देशाने हा निर्णय घेतला असल्याचे या आमदारांनी सांगितले. गमतीची गोष्ट म्हणजे निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या याच उमेदवारांनी मंदिर, मशीद आणि चर्चमध्ये पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती. मात्र याबाबत प्रश्न विचारताच कामत यांनी ही देवाचीच इच्छा असल्याचे म्हटले. ‘‘या परिस्थितीत काय करावे असे देवालाच विचारले, तेव्हा माझ्यासाठी जे उत्तम असेल तेच मी करावे’’, असे देवाने सांगितल्याचे उत्तर त्यांनी दिले. पक्षांतर करण्याचा निर्णय हा परिस्थितीनुरूप घेतला आहे. काँग्रेसमध्ये सध्या जे सुरू आहे, ते योग्य नाही. गुलाम नबी आझाद यांचे पत्र वाचले तरी हे लक्षात घेईल. सध्या सुरू असलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेऐवजी ‘काँग्रेस जोडो’ यात्रा काढणे आवश्यक होते, अशीच स्थिती सध्या दिसत आहे. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा अपयशी ठरत असल्याने लोकप्रतिनिधींनी ‘काँग्रेस छोडो’ यात्रेची गोव्यातून सुरुवात केली आहे, असेच आता म्हणावे लागेल. काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून भाजपमध्ये येतील आणि त्याची सुरुवात गोव्यातून झाली आहे, अशी स्थिती सध्या दिसत आहे. देशातील सर्वांत जुना पक्ष आपले आमदार पक्षाबाहेर जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरला आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहेच. मात्र काँग्रेसचाही त्यात मोठा दोष आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -