ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे शहराला शुक्रवारी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. सकाळी साडेआठपासून साडेअकरा वाजेपर्यंतच्या ७ तासांत ९३ मिलीमीटर आजपर्यंतचा सर्वाधिक पाऊस झाला. संततधार पावसाने रेल्वे रुळावर पाणी साचल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला.
ठाणे शहरात पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले असून या पाण्यातूनच वाहन चालकांना वाट काढावी लागत आहे. सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळेत ९ मिलीमीटर पाऊस झाला. त्यानंतर साडेनऊ ते साडेदहा या वेळेत १६ मिलीमीटर त्यानंतर साडेदहा ते साडेअकरा या वेळेत १७ मिलीमीटर पाऊस झाला. पावसाच्या जोरदार हजेरीमुळे सर्वसामान्य ठाणेकरांचे जीवन काहीसे विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचले असून वाहन चालकांनाही या पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे.
ठाणे महापालिकेनेही पाणी साठू नये यासाठी आपली यंत्रणा कामाला लावली असून काही ठिकाणी महापालिकेची यंत्रणा हे काम करताना दिसत आहे. ठाण्यात चिरानगर ११० मिमी, नौपाडा-कोपरीत ८७ मिमी, कासारवडवली ८५ मिमी, मुंब्रा-कळवा ७५ मिमी अशी दिवसभरातील पावसाची आकडेवारी नोंदविण्यात आली आहे. तसेच ठाणे महापालिका परिसर, वंदना सिनेमा, श्रीरंग सोसायटी, भारत गिअर, शिळ रोड, मुंब्रा बायपास, ठाकूरपाडा, मुंब्रा, चितळसर मानपाडा, बाबुभाई पेट्रोलपंपजवळ, जुना पासपोर्ट ऑफीस, पडवळनगर, देवश्री बंगल्याजवळ, श्रीनगर, वागळे इस्टेट, नेहरुनगर नं.२, वागळे, वारली पाडा, श्रीनगर, वागळे, अॅँटी करप्शन ब्युरो, जुना आरटीओजवळ, कोर्ट नाका, बँक ऑफ महाराष्ट्रजवळ, प्रदीप सोसायटी, पाचपाखाडी आदी ठिकाणी पाणी साचले होते. शहरात अनेक ठिकाणी भिंती कोसळून पाणी थेट सोसायटीच्या आवारात तसेच काही घरांत घुसले असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.