Tuesday, July 23, 2024
Homeमहत्वाची बातमी'आघाडी'च्या कारनाम्यामुळे प्रकल्प गुजरातला

‘आघाडी’च्या कारनाम्यामुळे प्रकल्प गुजरातला

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा हल्लाबोल

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात विकासकामे जोमात सुरू आहेत. त्यावर काही बोलण्यासारखे आता राहिलेले नाही. त्यामुळे कोणताही मुद्दा काढून टीका करायची याशिवाय विरोधकांकडे काही कामच राहिले नाही. शिंदे सरकारमुळे नाही, तर महाविकास आघाडी सरकारच्या ‘त्या’ कारनाम्यामुळे फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला’, असा हल्लाबोल केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी केला.

वेदांता प्रकल्पावरून राज्याचे राजकारण तापले आहे. आरोप – प्रत्यारोप सुरू असतानाच आपल्या आक्रमक शैलीमुळे चर्चेत असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे हे यावर काय बोलणार? याकडे लक्ष लागले होते. ‘महाविकास आघाडीमध्ये तडजोड व्यवस्थित झाली नाही म्हणून हा प्रकल्प गुजरातला गेला’, अशी टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘शिंदे सरकार स्थापन होऊन दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. या प्रकल्पाचे काम गेल्या अनके दिवसांपासून सुरू होते. पण राज्यात तिघाडी सरकार असल्यामुळे तडजोड झाली नाही आणि प्रकल्प इतरत्र गेला’, असे ते म्हणाले.

राज्यात विकासकामे जोमात सुरू आहेत. त्यावर काही बोलण्यासारखे आता राहिलेच नाही. त्यामुळे कोणताही मुद्दा काढून टीका करायची याशिवाय विरोधकांकडे काही कामच राहिले नसल्याचे राणे यांनी सांगितले. शरद पवार हे राज्याचे ४ वेळेस मुख्यमंत्री होते. एवढ्या मोठ्या कालावधीत राज्यात का औद्योगिक क्रांती झाली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘शिवाय आताही शरद पवार यांची राजवट आणि तीन पक्षांचे सरकार यामुळेच राज्यात उद्योग आले नाहीत’, असे राणे म्हणाले. शिंदे – फडणवीस सरकारच्या काळात राज्यात विकासकामांचा सपाटा सुरू आहे. जनतेच्या हिताची कामे शिंदे सरकारने केली आहेत. शिवाय जनतेच्या मनातले सरकार सध्या सत्तेत आहे. त्यामुळे राज्याची चिंता सोडा आपल्या पक्षाचे बघा असा सल्ला राणे यांनी विरोधकांना दिला आहे.

द्वेष करण्यापेक्षा उद्योग कसा वाढेल याकडे लक्ष द्या…

कुणाचा द्वेष करण्यापेक्षा उद्योग कसा वाढेल याकडे लक्ष द्या, असे आवाहन केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी तरुणांना केले. तसेच उद्योग सुरू करण्याचे आवाहनही त्यांनी केले. नारायण राणे म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील औद्योगिक प्रगतीचे राज्य आहे. देशातील मागच्या वर्षीचा बजेट ३५ लाख कोटींचा आहे. या वर्षी अजून मोठा असेल. देशातील एकूण बजेटपैकी मुंबईचा टक्का कमी नाही आहे. पुढच्या वर्षी तो आणखी मोठा असेल. देशाला, राज्याला औद्योगिक प्रगतीसाठी तुम्ही स्वत: उद्योग सुरू करावेत, असे ते म्हणाले.

‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री आणि अॅग्रीकलचर’च्या ९४ व्या वार्षिक कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे, महाराष्ट्रचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.

राज्यातील तरुणांनी नोकरीपेक्षा उद्योग कसा करायचा याचे प्रशिक्षण घ्यावे. भले सुरुवातीला सूक्ष्म, लघू उद्योग सुरू झाले तरी चालेल. त्यासाठी तरुणांची मानसिकता तयार व्हायला हवी. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करायला त्यांनी उद्योगाकडे वळायला हवे. औद्योगिक प्रगती म्हणजे आपली प्रगती, महाराष्ट्राची प्रगती. उद्योगांमध्ये आज ५ हजार मिळतील, उद्या ५० हजार मिळतील; तर काही वर्षांनी लाख – दोन लाखही मिळतील. सतत कार्यशील राहा’, असा सल्ला त्यांनी दिला.

राज्यात बंद असलेल्या उद्योगांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन दिले तर ते पुन्हा सुरू होतील. भारतात अदानी, टाटा आणि अंबानींसारखे उद्योजक आहेत, तर आपण का नाही उद्योजक होऊ शकत; तुम्ही अशी जिद्द ठेवा, असे ते म्हणाले. कोणाचा द्वेष करण्यापेक्षा आपला उद्योग कसा वाढेल यावर जास्त लक्ष द्या. ज्यांनी कमी वेळात जास्त प्रगती केली आहे अशा उद्योजकांचा आपण सत्कार केला पाहिजे. कोरोना काळात काही उद्योग बंद पडले आहेत. त्या उद्योगांना कशाची गरज आहे हे समजून घ्या. आर्थिक मदत लागत असेल ती करा. नव्याने उद्योग चालू करा. मला काय शिकता येईल… देशातील जनतेला काय देता येईल, यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो, असे ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -