हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांच्या माहितीने शेतकरी चिंताग्रस्त
मुंबई : सद्यस्थितीत पडणारा पाऊस हा आणखी चार महिने कोसळणार असून सप्टेंबर अखेर पाऊस आणखी वाढण्याचा इशारा हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे. महापूरांचा धोका कायम असून चार महिने मान्सून पुढे सरकला असल्याचा प्राथमिक परंतू अतिशय धक्कादायक निष्कर्ष त्यांनी काढला आहे. माहितीनुसार, ४ ऑक्टोबर नंतर निंबोस्ट्रेटस ढगांची निर्मिती प्रक्रीया वाढीस लागेल आणि उत्तर महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस सुरु होईल अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी दिली आहे.
साधारणत: मान्सून ०१ जूनला सुरू होतो आणि तो ३० सप्टेंबरला संपतो. मात्र यावेळी जवळपास चार महिने मान्सून पुढे सरकला आहे. आगामी दसरा-दिवाळीचे सण मुसळधार पावसातच साजरे करावे लागतील, तसेच जानेवारी अखेर पर्यंत पाऊस बरसेल आणि फेब्रुवारीत देखील पाऊस दिसू शकेल, असा अंदाज जोहरे यांनी व्यक्त केला आहे. ऑक्टोबर मध्येही पावसाचे प्रमाण राहणार आहे. ऑक्टोबरनंतर पावसाच्या प्रमाणात आणखी वाढ होऊन पावसाळा जानेवारी पर्यंत लांबणार आहे. त्यामुळे यंदाचा पाऊस दिर्घकाळ आव्हाने देत ठाण मांडणार आहे. यंदा तब्बल जुलैत झालेला पाऊस सुर्यावरील चुंबकीय वादळांमुळे झाला. विशेष म्हणजे यावर्षी अद्याप एकही प्रबळ चक्रीवादळ तयार झालेले नाही ही देखील गंभीर बाब आहे. मान्सूनच्या बदललेल्या पॅटर्नच्या ‘न्यू नॉर्मल’ला शेतक-यांनी व जनसामान्यांनी येत्या काळात घाबरून न जाता मान्सूनच्या नव्या पॅटर्नला स्वीकारावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील सर्वच धरणे तुडुंब भरलेली आहेत. भरलेल्या धरणांनी पुढच्या वर्षाचा पाणी प्रश्न सुटल्याचा आनंद व्यक्त होत असला तरी तब्बल डिसेंबर पर्यंत पडणारा मोठा पाऊस धरणे आणि बंधाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा देणारा आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आत्ताच धरणांचे आणि बंधाऱ्यांच्या पाण्याचे नियोजन करतांना त्यांची तपासणी व धरणांचे पाणी कमी करत आकाशातील व कचमेंट एरीयातील पाणी सामावण्यासाठी ३० ते ४० टक्के जागा निर्माण करणे गांभीर्याने व तातडीने आवश्यक गरजेचे आहे. यासाठी आत्तापासूनच शेतीचे नियोजन आणि शेतकऱ्यांचे प्रबोधन-जागृती करणे गरजेचे असल्याचे हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले आहे.
सूर्यावरील निर्माण झालेली वादळी परिस्थिती
सूर्यावर निर्माण झालेल्या वादळी परिस्थितीमुळे वैश्विक किरणे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर आदळल्याने पृथ्वीच्या वातावरणात खळबळ झाली, परिणामी क्युम्योलोनिंबस ढगांची निर्मिती होत असल्याने ढगफुटी होत आहे. वातावरणात तयार झालेल्या भोवऱ्यांमुळे जुलै महिन्यात ‘रेकॉर्ड ब्रेक’ पाऊस झाला. नोव्हेंबर नंतर देखील महाराष्ट्रासह भारताच्या बहुतांश भागात मोठा पाऊस पडणार असल्याने सर्व धरणांच्या पाण्याचे नियोजन करण्याची गरज असल्याचेही प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले आहे.