मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने मोठा दणका दिला आहे. तसेच शेतकरी वर्गालाही मोठी फटका या पावसाचा बसला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पुढील तीन ते चार तास मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
येत्या तीन दिवसांत कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी, पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेषतः घाट माथ्यावर सकाळपासूनच मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुणे शहर आणि परिसरातही सकाळपासूनच हलक्या स्वरूपाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार १६ आणि १७ सप्टेंबर म्हणजे आज आणि उद्या मुंबईसह उत्तर कोकणातील काही भाग आणि घाट परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवस मान्सून सक्रीय राहील, अशी माहिती हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.
गोदावरी नदीला चौथ्यांदा पूर
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला चौथ्यांदा पूर आला आहे. रामकुंडमध्ये अनेक मंदिर पाण्याखाली गेली आहेत. गंगापूर धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीतील पात्रामध्ये विसर्ग वाढवून सकाळी ९ वाजता १५ हजार २११ क्यूसेक करण्यात आला आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली.