कराची (वृत्तसंस्था) : तब्बल १७ वर्षांनंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. २० सप्टेंबरपासून इंग्लंड आणि पाकिस्तान ही द्विपक्षीय मालिका सुरू होणार आहे.
जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ ७ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानात दाखल झाला आहे. २० सप्टेंबरपासून कराचीच्या नॅशनल स्टेडियमवरून या मालिकेला सुरुवात होणार आहे. १७ वर्षांनंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. ७ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेशिवाय ३ कसोटी सामनेही खेळले जाणार आहेत.
इंग्लंडने मागील वर्षी सुरक्षेचे कारण देताना पाकिस्तान दौरा स्थगित केला होता. पण, अखेर इंग्लंडचा संघ दाखल झाला. त्यांच्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने व सरकारने सुरक्षारक्षकांचा फौजफाटाच तयार ठेवला होता. पण, एका गोष्टीमुळे पाकिस्तानची नाचक्की झाली. विमानतळ ते हॉटेल या मार्गावरील खड्ड्यांमधून इंग्लंडच्या संघाला प्रवास करावा लागला. पाकिस्तानच्या पत्रकारानेच त्यांचे जाहीर वाभाडे काढून रस्त्यांवरील खड्ड्यांचा व्हीडिओ पोस्ट केला.