ठाणे (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षांपासून बेपत्ता, घर सोडून गेलेल्या मुलांचा छडा लावून त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात पोलिसांच्या विविध शाखांना यश आले आहे. गेल्या आठ महिन्यांत ७७ बालकांना त्यांचे हक्काचे घर मिळाले आहे.
गेल्या चार-पाच वर्षांपासून बेपत्ता असलेल्या मुलांचा शोध ठाणे गुन्हे शाखेच्या मानवीय तस्करी विरोधी पथक, चाईल्ड प्रोटेक्शन युनिट व इतर सात पथकांच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२२ या गेल्या आठ महिन्यांत तीन व त्याहून अधिक वर्ष शोध न लागलेल्या ७७ अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात सुखरूप देण्याची कामगिरी ठाणे गुन्हे शाखेने बजावली आहे. अपहरणांच्या दाखल एकूण गुन्ह्यात ७५ टक्के गुन्हे हे लहान मुलांच्या अपहरणाचे आहेत. पूर्ववैमनस्य, खंडणी, भीक मागण्यासाठी आदी कारणांमुळे लहान मुलांचे अपहरण करण्यात येत असल्याच्या घटना अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
पूर्ववैमनस्यातून अपहरण करण्याचे प्रमाण फार कमी असले तरी खंडणीसाठी व भीक मागण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करण्यात येत असल्याच्या घटना पोलीस तपासात वेळोवेळी उघड झाल्या आहेत. लहान मुलांचे अपहरण करून त्यांना भीक मागण्याच्या कामाला लावणाऱ्या अनेक टोळ्या मुंबई, ठाणे परिसरात कार्यरत असल्याचा देखील संशय पोलिसांना आहे. आतापर्यंत अपहरणाच्या गुन्ह्यातील अनेक गुन्हेगारांना व टोळ्यांना गजाआड केले आहे.