मुंबई : जाणून-बुजून वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत भ्रम पसरवण्याचे काम योजनाबद्ध पद्धतीने पेंग्विन सेनेमार्फत केला जात आहे, हा प्रकल्प महाराष्ट्रात होता कधी? असे म्हणत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिवसेनेला खुले चॅलेंज देत शेलार म्हणाले की, “बोलायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे हे आता महाराष्ट्रात चालणार नाही. महाराष्ट्रातून आम्ही प्रकल्प बाहेर नेला नाही, असे अनिल अग्रवाल यांनी ट्विट करत सांगितले. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात आम्ही प्रकल्प करणार आहोत. त्यामुळे पेंग्विनसेना हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला, असे कसे काय म्हणू शकते” असा सवाल शेलारांनी उपस्थित केला.
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. शिवसेनेने देखील आपल्या मुखपत्रात म्हटले आहे की, हा प्रकल्प गुजरातमध्ये खेचून नेण्यात आला. त्यावर बोलताना शेलार म्हणाले की, “मविआ सरकारने वेदांता-फॉक्सकॉनसोबत करार केला होता का? हा प्रकल्प महाराष्ट्रात सुरू कधी झाला, त्याला मविआने सर्व परवानग्या दिल्या होत्या का?, फॉक्सकॉन प्रकल्पाबाबात सर्व संमती झाल्या होत्या का? त्याची पायाभरणी महाराष्ट्रात झाली होती का? गुजरातमध्ये प्रकल्प खेचून नेण्यात आला तर तो प्रकल्प महाराष्ट्रात कधी होता” असा थेट सवाल शेलारांनी मविआला विचारला आहे.
पुढे शेलार म्हणाले की, “आता खोटे सहन केले जाणार नाही. तुमच्या मनातला मुख्यमंत्री झाला नाही, म्हणून हे सगळे सुरू आहे. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचा एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला म्हणून त्याला हिणवण्याचे काम सुरू आहे. माझ्या प्रश्नाचे उत्तर जर पेंग्विनसेना देत नसेल तर, निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत याची चौकशी झालीच पाहिजे. राज्याला याचे सत्य कळालेच पाहिजे, असे थेट आव्हान शेलारांनी शिवसेनेला दिले.