लाहोर (वृत्तसंस्था) : आयसीसीच्या एलिट पॅनेलचे माजी सदस्य, पाकिस्तानचे माजी अंपायर असद रऊफ यांचे बुधवारी लाहोरमध्ये निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. ते ६६ वर्षांचे होते.
हृदयविकाराच्या झटक्याने असद रऊफ यांचे निधन झाल्याच्या वृत्ताला त्यांचा भाऊ ताहिर रऊफ यांनी दुजोरा दिला आहे. बुधवारी ते लाहोरमधील दुकान बंद करून घरी परतत असताना त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
रऊफ यांनी २३१ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचांची भूमिका बजावली आहे. ज्यात ६४ कसोटी, २८ टी-२० आणि १३९ एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. त्यांनी २०१३मध्ये सर्व प्रकारच्या अंपायरिंगमधून निवृत्त घेतली होती.
रऊफ हे २००६ ते २०१३ या काळात आयसीसीच्या एलिट अंपायर पॅनेलचे सदस्य होते. २०१३ साली बीसीसीआयने बसवलेल्या शोध समितीत रऊफ यांच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप झाला होता. ज्यानंतर २०१६ साली बीसीसीआयद्वारे त्यांच्यावर ५ वर्षांची बंदी घालण्यात आली होती.
मॅच फिक्सिंगच्या आरोपात अडकल्यानंतर रऊफ यांच्यावर चप्पल विकायची वेळ आली. लाहोरमध्ये त्यांचे चप्पल बुटांचे दुकान आहे.