भूपेंद्र यादव
चित्त्याच्या भारतातील पुनरागमनासाठी उलट गणती सुरू झाली आहे. एकेकाळी ज्याच्या गुरगुरण्याचा आवाज देशातील किनारे व पर्वतीय प्रदेश वगळता इतर प्रदेशातील जंगलांमध्ये घुमला आहे अशा सर्वात वेगवान भूचर प्राण्याचे स्वागत करण्यासाठी भारत उत्सुक आहे. येत्या १७ सप्टेंबर रोजी भारतात चित्त्याचे पुनरागमन होणार आहे. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात लवकरच चित्त्याचा वावर सुरू होईल.
इतर प्राण्यांच्या शिकारीसाठी चित्त्यांचा वापर, मनोरंजनासाठी चित्त्यांची शिकार, विस्तीर्ण प्रदेशातील त्याला योग्य अशा अधिवासाचा ऱ्हास व त्यातून चित्त्याच्या भक्ष्य प्रजातींमध्ये घट अशी अनेक कारणे भारतातून चित्ता कायमचा नाहीसा होण्यामागे आहेत. मानवी हस्तक्षेपातून निर्माण झालेली ही सर्व कारणे एकमेव बाबीकडे अंगुलीनिर्देश करतात; ती बाब म्हणजे नैसर्गिक जगतावर माणसाचे अमर्याद वर्चस्व. निसर्गाप्रती केलेल्या चुकीचे परिमार्जन करून ‘मिशन लाईफ’च्या ध्येयपूर्तीकडे वाटचाल करण्यासाठी भारताने उचललेले एक पाऊल म्हणजे चित्त्याचे भारतीय भूमीवरील नैसर्गिक अधिवासात पुनर्वसन करण्याचा निर्णय. खऱ्या अर्थाने सर्वसमावेशी जगाची उभारणी जिथे माणसाची हाव वनस्पती व प्राणिजगताच्या अस्तित्वाला धोका पोहोचवणार नाही, माणसे वन्य प्राण्यांसह निसर्गाशी जुळवून घेत राहतील, असे जग साकारणे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला दिलेल्या ‘मिशन लाईफ’ या मंत्राचा उद्देश आहे.
माणूस सर्वश्रेष्ठ आहे व तंत्रज्ञानाच्या जोरावर हा ‘सर्वश्रेष्ठ माणूस’ त्याला हवे ते मिळवू शकतो, असा समज विकासाच्या पाश्चात्य संकल्पनेमुळे झाला आहे. ही संकल्पना सत्यात आणण्याच्या प्रयत्नात माणसाची भरभराट होत असल्याचे वाटत असले तरी ती भरभराट अल्पजीवी आहे. प्रत्यक्षात माणूस सातत्याने पराभूत होत आहे. विकासाच्या या संकल्पनेमुळे अनेक प्रजाती नष्ट होऊन एकंदरीत पृथ्वीचाच विनाश होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
‘प्रकृति रक्षति रक्षिता’ अर्थात ‘तुम्ही निसर्गाचे रक्षण करा तर निसर्ग तुमचे रक्षण करेल’ या उक्तीवर भारताने शतकानुशतके विश्वास ठेवला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या देशातून सस्तन वन्य प्राण्याची फक्त एक प्रजाती नष्ट झाली आहे.
आपल्या देशाची लोकसंख्या आणि विकासाची गरज हे अत्यंत प्रभावी घटक असूनही देशाने वाघ, सिंह, आशियाई हत्ती, घडियाल (मगरीची एक प्रजाती), एकशिंगी गेंडा अशा अनेक महत्त्वपूर्ण प्रजाती व त्यांना सामावून घेणाऱ्या परिसंस्था राखून ठेवल्या आहेत. व्याघ्र प्रकल्प, सिंह, हत्ती प्रकल्प या योजनांच्या आधारे भारताने गेल्या काही वर्षांत देशात या प्रजातींच्या प्राण्यांच्या संख्येत वाढ शक्य केली आहे.
जंगल परिसंस्थेतील सर्वोच्च भक्षक म्हणून तिचे प्रतीक ही वाघाची जशी ओळख आहे तसा चित्ता हा खुली वने, झुडपी व गवताळ माळरानांच्या परिसंस्थेच्या प्रतिकाची जागा घेईल. चित्त्याचे पुनर्वसन हे जग शाश्वततेकडे नेण्यासाठी भारताने उचललेले महत्त्वाकांक्षी पाऊल आहे. सर्वोच्च भक्षकाचे पुनरुज्जीवन यशस्वी झाले तर त्यातून संबंधित परिसंस्थेचा एकूण समतोल साधता येऊ शकतो, सर्वोच्च भक्षक, त्याखाली त्याच्या भक्ष्य प्रजाती, त्या खालोखाल त्यांचे भक्ष्य अशी साखळी पूर्ण होऊन अधिवासाचे पुनरुज्जीवन शक्य करता येते. उत्क्रांतीच्या प्रक्रियेतील नैसर्गिक निवडीच्या बलाचा प्रभाव म्हणून चित्त्यामुळे अँटिलोप, गझेल आदी प्रजातींनी जलद गतीने धावणे आत्मसात केले. चित्त्याच्या पुनरागमनामुळे त्याचे अधिवास असलेल्या परिसंस्था व चित्त्याच्या त्यातील भक्ष्य प्रजातींचे अस्तित्व सुनिश्चित करता येईल. हे अधिवास व काही भक्ष्य प्रजातींना आजघडीला कायमचे नष्ट होण्याचा धोका आहे.
दुर्लक्षित अधिवासांचे पुनरुज्जीवन व पर्यायाने त्यांतील जैवविविधतेचे संवर्धन, परिसंस्थांमुळे मिळणाऱ्या नैसर्गिक सेवा, त्यांच्या कार्बन अलग करून साठवण्याच्या क्षमतेचा पुरेपूर वापर शक्य करण्यासाठी साधनसामग्री मिळवण्याकरता चित्ता प्रकल्प उपयोगास येईल. चित्त्याविषयी कुतूहलापोटी येणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिक समुदायांना पर्यटनातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. रोजगार मिळाल्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
मांसाहारी प्राण्यांच्या मोठ्या प्रजाती व त्यांना सामावून घेणाऱ्या परिसंस्थांचे रक्षण करण्याची आवश्यकता आता संपूर्ण जगाच्या लक्षात आली आहे. त्याकरिता जगभरात पुनर्वसन, संवर्धन/स्थानांतरण हे पर्याय वापरले जात आहेत. शाश्वत भविष्यकाळासाठी भारताने सर्व इच्छाशक्तीनिशी चित्त्याच्या अधिवासाचा ऱ्हास रोखण्यासाठी या अधिवासातील सर्वोच्च भक्षक असलेल्या चित्त्याचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे.
कुनो इथे पुनर्वसनाच्या प्रयत्नात चित्त्यांची संख्या पुरेशी वाढल्यानंतर गुजरात, राजस्थान, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश आदी राज्यांमध्ये चित्त्यांच्या पुनरागमनाचा विचार करता येऊ शकतो. हे शक्य झाल्यास भारताचा नैसर्गिक वारसा असलेल्या चित्त्याचे संबंधित परिसंस्था व त्यातील अन्य वन्य प्रजातींसह पुनरुज्जीवन पूर्ण करता येईल.