नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशिया चषक स्पर्धेतील स्फोटक फलंदाजी भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी लाभदायक ठरली आहे. आयसीसीच्या टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत विराटने मोठी झेप घेतली असून तो थेट १५ व्या स्थानी पोहचला आहे. श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगालाही लाभ झाला असून टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत तो सहाव्या क्रमांकावर पोहचला आहे.
टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा सूर्यकुमार यादव चौथ्या स्थानावर आहे, तर कर्णधार रोहित शर्मा १४व्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान अव्वल स्थानी असून कर्णधार बाबर आझम तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. गोलंदाजीच्या क्रमवारीत भुवनेश्वर कुमारचे एक स्थान कमी झाले असून तो सातव्या स्थानावर घसरला आहे.
कोहलीने आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध कारकिर्दीतील ७१वे शतक झळकावले. त्याचा त्याला चांगलाच फायदा झाला आहे. त्याने आयसीसीच्या टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली असून तो १५व्या स्थानावर पोहचला आहे. आशिया चषक स्पर्धेपूर्वी विराट कोहली २९व्या स्थानावर होता.