मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सत्ता बदल झाला की, आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात हे नेहमीचेच आहे. मात्र सध्या मुंबई महापालिकेत बदल्या केल्या जातात आणि काही दिवसांतच पुन्हा त्याच अधिकाऱ्याला जुन्या नियुक्तीच्या ठिकाणी पुन्हा नियुक्त केले जात आहे. यामुळे पालिका आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उभे केले जात आहे.
विशेष म्हणजे ठाकरे सरकार होते त्यावेळीही आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांचा बदल्या केल्या होत्या. इतकेच नाही तर गेले २५ वर्षे पालिकेत शिवसेनेची सत्ता असल्यामुळे त्यांच्या निकटवर्तीय अधिकाऱ्यांच्या मोक्याच्या ठिकाणी बदल्या केल्या जात असल्याची चर्चा होती. मात्र आता सत्ता बदलताच पुन्हा एकदा काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच बदल्या केल्यानंतर पुन्हा काही दिवसांनी त्याच अधिकाऱ्यांना जुन्या नियुक्तीवर नियुक्त केले जात आहे. यामुळे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहाल यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.
सध्या घन कचरा विभागाच्या उपायुक्त संगीता हसनाळे यांची झोन १ मध्ये, तर चंदा जाधव यांची बदली घन कचरा विभागात करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा त्यांना आधीच्याच जागी नियुक्त करण्यात आले आहे. परिमंडळ चारचे सहआयुक्त विजय बालमवार यांची बदली उपायुक्त पदावर करण्यात आली होती, तर या पदावरील संजोग कबरे यांची बदली परिमंडळ चारच्या उपायुक्तपदी करण्यात आली. काही दिवसांत या दोघांकडे पुन्हा एकदा त्यांच्या आधीच्या पदाचाच भार देण्यात आला. सह आयुक्त अजित कुंभार यांची पुन्हा शिक्षण विभागात, रमेश पवार यांची सुधार विभागात, केशव उबाळे यांची उपायुक्त दक्षता या विभागात पुन्हा नियुक्ती केली आहे. तर किरण दिघावकर यांची दादर येथून भायखळा आणि नंतर बोरिवली येथे बदली केली आहे. मात्र बदल्या करून काही तासांत पुन्हा त्या रद्द केल्या जात असल्यामुळे राजकीय वर्तुळात आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.