Tuesday, July 16, 2024
Homeमहत्वाची बातमीजगातील सर्वात उंचावर आणि सर्वात कठीण रन खारदुन्ग्ला चॅलेंज मध्ये सिंधू पुत्रांचा...

जगातील सर्वात उंचावर आणि सर्वात कठीण रन खारदुन्ग्ला चॅलेंज मध्ये सिंधू पुत्रांचा झेंडा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : देशातच नव्हे तर जगभरात सर्वात उंचावर असलेल्या खारदुन्ग्ला चॅलेंज रन मध्ये ओंकार पराडकर आणि प्रसाद कोरगावकर या सिंधू पुत्रांनी झेंडा रोवला आहे. नवरत्नांची खाण असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातत्याने काहीतरी वेगळे निर्माण करण्याचे धाडस करणारे युवक आपल्या नैपुण्यवान कामगिरीने वेगवेगळी छाप पाडत असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधू रनर टीमचे ओंकार पराडकर आणि प्रसाद कोरगावकर काही वर्षापासून देशभर होणाऱ्या विविध रन इव्हेंट मध्ये भाग घेऊन जिल्ह्याचे नाव गाजवत आहेत. यातच भर म्हणजे देशातच नव्हेतर जगभरात सर्वात उंचावर असलेल्या आणि सर्वात कठीण अश्या खारदुन्ग्ला चॅलेंज रन मध्ये या दोघांनी पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करत जगभरात आपल्या देशाचे आणि जिल्ह्याचे नाव गाजवले.

समुद्र सपाटी पासून सुमारे १८००० फुटावर म्हणजे ६००० मीटर उंचीवर होणाऱ्या या खडतर रन मध्ये जगभरातून १५० रनर निवडले जातात त्यात या वर्षी ओंकार आणि प्रसाद यांची निवड झाली. या दोन्ही धावपटूंनी काही वर्षे सातत्यपूर्ण सराव, जिद्ध, चिकाटी आणि योग्य परिश्रम घेऊन या रन मध्ये निवड होण्यापर्यंत मजल मारली. परंतु निवड होऊनही रन वेळेत पूर्ण करणे काही सोपे नव्हते. समुद्र सपाटी पासून उंचावर असल्याने सतत बदलते हवामान, कधी पाऊस, बर्फ वर्षाव, थंडी, कोरडे हवामान, कडक ऊन आणि यात भर म्हणजे कमी प्रमाणात असलेला ऑक्सिजन प्राणवायू (३०-४०%) या सर्व आव्हांनाना सामोरे जात ७२ किलोमीटर्स १४ तासात पार करणे म्हणजे एक दिव्यच.

या दोघांनीही लेह मध्ये पोहचून ६-७ दिवस सातत्याने सराव करून स्वतःला तिथल्या वातावरणात जुळवून घेतले. ९ सप्टेंबरला सकाळी ३ ला रन चालू झाली. त्यावेळेस तापमान -३ डिग्री होते. अंगावर ३-४ टी शर्ट्स. २ जॅकेट, २ रन पँट्स आणि भर म्हणजे पाटीवर २ लिटर पाणी, खाण्याचे सामान असे अंदाजे ५ ते ६ किलो वजन घेऊन पळायचे होते, पहिले ३२ किलोमीटर कठीण चढण त्यात कमी कमी होणारे ऑक्सिजनचे प्रमाण त्यामुळे डोक्यात रक्त गोठणे, चक्कर येणे, उलट्या होणे अगदी जास्त प्रमाणात जोर लावून रन केला तर कमी ऑक्सिजन मुळे कोमात जाणे यासारखी आव्हाने होती. या सगळ्यावर मात करून या सिंधू पुत्रांनी दाखवून दिले कि सह्याद्रीच्या या सुपत्रांना काहीही अवघड नाही. अभेद्य आणि अजिंक्य सिंधुदुर्ग किल्ल्या प्रमाणेच इथले सुपुत्रही तसेच आहेत.

या रन मध्ये १९४ धावकांनी भाग घेतला होता आणि त्यातून १२३ जणांनी हि रन पूर्ण केली, प्रसाद कोरगावकर ने हि रन ११ तास आणि ५१ मिनिटात पूर्ण करून १२३ धावकांमधून ६२ वे स्थान पटकावले तर ओंकार पराडकर ने हि रन १३ तास आणि ८ मिनिटात पूर्ण करून १२३ धावकांमधून ९६ वे स्थान पटकावले. लेह लडाख सारख्या दुर्गम आणि थंड प्रदेशात जिथे फक्त भारतीय जवान राहून देशसेवा करतात त्या ठिकाणी या दोघांनीही वेळात रन पूर्ण करून दाखवून दिले कि जिद्द आणि चिकाटी असेल तर काही अशक्य नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -