Wednesday, July 9, 2025

आयटी कंपन्यांमध्येही मंदीचे संकेत; नोकरकपात सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयटी कंपन्यांमध्येही मंदीचे संकेत दिसून येत आहेत. आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्येही आता मंदीच्या लाटेने प्रवेश केला आहे. ‘आयटी’ क्षेत्रातल्या कंपन्यांमध्येही नोकरकपात सुरू झाली आहे.


माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतातली तिसरी सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी ‘एचसीएल टेक्नॉलॉजीज’ने जागतिक स्तरावर मोठी कारवाई केली आहे. याअंतर्गत तब्ब्ल ३५० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. काढून टाकलेले कर्मचारी ग्वाटेमाला, फिलीपिन्स आणि भारतासह काही देशांमधले आहेत. ‘एचसीएल टेक्नॉलॉजीज’मधून काढून टाकलेल्या या कर्मचाऱ्यांचा कंपनीत ३० सप्टेंबर हा शेवटचा दिवस असेल.


भारतीय कंपनीने उचललेल्या या मोठ्या पावलांमुळे या क्षेत्रात मंदीची चिंता वाढली आहे. एका अहवालानुसार, ज्या कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे, ते कंपनीचे क्लायंट ‘मायक्रोसॉफ्ट’च्या संबंधित उत्पादनांवर काम करत होते. जागतिक चलनवाढीच्या वाढत्या संकटात ‘एचसीएल’चे हे पाऊल आयटी क्षेत्रासाठी पुढे कठीण परिस्थिती दर्शवत आहे.


या प्रकरणाशी संबंधित लोकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिन्यात झालेल्या टाऊन हॉल बैठकीत कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची माहिती देण्यात आली होती; पण याबद्दल ‘एचसीएल टेक्नॉलॉजीज’ कडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.


दरम्यान, ‘एचसीएल टेक्नॉलॉजीज’ ही जगभरातल्या व्यापक आर्थिक दबावामुळे संघर्ष करत असलेली एकमेव भारतीय आयटी कंपनी नाही. जागतिक चलनवाढीच्या वाढत्या संकटकाळात ‘टीसीएस’, ‘विप्रा’ आणि ‘इन्फोसिस’ सारख्या इतर भारतीय ‘आयटी’ दिग्गजांसाठीही अडचणी निर्माण झाल्या आहेत. खर्चात वाढ झाल्यामुळे या कंपन्यांना मार्जिनच्या दबावाचा सामना करावा लागत आहे.

Comments
Add Comment