Monday, July 15, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखकोकणात आता विरोध नको; विकास हवा

कोकणात आता विरोध नको; विकास हवा

अनघा निकम मगदूम

कोकणात राजापूरमध्ये रिफायनरीच्या स्वागतासाठी जनमत मोठ्या प्रमाणावर असताना त्याला सुरुंग लावण्यासाठी काही बाहेरची मंडळी पुन्हा एकदा कोकणात सक्रिय होऊ लागली आहेत. लोकांची दिशाभूल करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. पण कोकणच्या भूमिपुत्राने ‘विरोध’ करण्याआधी या बदलत्या जगात कोकण म्हणून नेमके आपण कुठे आहोत याचा विचार करणे आवश्यक झाले आहे. यासाठीच रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये घडलेल्या दोन घटनांचा उल्लेख येथे आवर्जून करावासा वाटतोय. खेडमध्ये २ तरुणांनी बेरोजगारीमुळे गळफास घेऊन आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे, तर दुसरीकडे राजापुरात येऊ घातलेल्या रिफायनरी विरोधात पुन्हा एकदा वातावरण तापविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. जिल्ह्याच्या दोन टोकांना घडलेल्या या घटना परस्परसंबंधी नसतील पण परस्पर निगडित जरूर आहेत आणि म्हणून विचार करायला भाग पाडत आहेत. त्यामुळे ‘विरोध’ करण्यापूर्वी या परिस्थितीचा विचार भूमिपुत्राने करणे आवश्यक झाले आहे आणि त्यानिमित्ताने उपस्थित होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे स्वतःच शोधली पाहिजेत.

मुसळधार पाऊस, निसर्गाची मुक्त उधळण, शेजारी अथांग समुद्र, सोन्याचा दर मिळणारा आंबा-काजूसारखी पिके असूनही आजही कोकण मागासलेला का? इथला प्रत्येक पिढीतला तरुण स्वतःच्या अस्तित्वासाठी आपली मुळे सोडून, आपले गाव सोडून मुंबईसारख्या महानगरात मिळेल त्या परिस्थितीशी का तडजोड करतोय? दहावी-बारावीमध्ये राज्यात अव्वल गुण मिळवणारा इथला विद्यार्थी आयुष्यात पुढच्या स्पर्धेत कुठे हरवून जातोय, एमपीएससी, आयएएसमध्ये कोकणातील मुले का नाहीत? परिपूर्ण आरोग्य सुविधा नाही म्हणून इथला गरीब माणूस परजिल्ह्यात का धावतोय? आणि इथला निसर्ग जपायचंय म्हणून आजवर अनेक प्रकल्प नाकारूनही आज इथला आंबा हळूहळू का कमी होतोय, प्रदूषणकारी कारखाने नसतानाही मत्स्य दुष्काळ का पडतोय, निसर्ग जपून ठेवला तरी पावसाचे प्रमाण का व्यस्त होतेय आणि इथली पारंपरिक शेती नेमकी कुठे हरवली आहे? किती प्रश्न उभे राहिले आहेत समोर.

कारखाने, प्रकल्प, उद्योग आला तर इथला निसर्ग बाधित होणार, आंबा, काजू नष्ट होणार, मासे संपणार असे सांगत आजवर आपण अनेक प्रकल्प, उद्योग नाकारले, जे आले ते टिकवले नाहीत. त्यामुळे परिसराचा विकास खुंटला. रोजगाराच्या संधीच उपलब्ध झाल्या नाहीत. मग इथला हुशार तरुण कामधंद्यासाठी बाहेत पडला, त्याने गाव सोडले आणि महानगराच्या दुष्टचक्रात अडकला. आता कोकणातली गावे सुद्धा ओस पडली आणि विकास सुद्धा गावाच्या वेशीबाहेरच थांबला. आजवरच्या विरोधाने कोकणाला हेच दिले आहे. तरीही या परिस्थितीवर विचार न करता आपण येणाऱ्या संधी फक्त नाकारायच्याच का?, कोणीतरी सांगतंय म्हणून विचार न करता त्यावर विश्वास ठेवायचा का? वास्तविक बेरोजगारी सातत्याने वाढते आहे. शिक्षणाच्या अमर्यादित संधी उपलब्ध असून अगदी घरी बसून सुद्धा ऑनलाइन पद्धतीने आपण शिक्षण घेऊ शकतो. पण घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग नेमका कुठे आणि कसा करायचा आणि त्याच्यासाठी संधी किती उपलब्ध आहेत हा प्रश्न आता इथल्या तरुणांसमोर उभा राहिला आहे. अधिक जटिल बनत चाललाय. कारण गेली अनेक वर्षं निसर्ग या एका नावाखाली आम्ही विकासाला दूरच ठेवले आहे. निसर्ग भकास होईल, निसर्गाचा ऱ्हास होईल ही कारणे देत येणाऱ्या अनेक संधी आम्ही आतापर्यंत नाकारत आलो आहोत.

अगदी आतासुद्धा रिफायनरीसारखी एक मोठी संधी कोकणवासीयांच्या समोर उभी राहिली आहे. आधी विरोध, मग समर्थन या परिवर्तनच्या उंबरठ्यावर ही संधी उभी आहे. अशा वेळी त्याला सुरुंग लावणारा एक गट सक्रिय होऊन गैरसमजाचे, अज्ञानाचे विष पसरवत आहे. त्यांना कोकणचा विकास करायचाच नाही म्हणूनच त्यांनी रिफायनरी विरोधक तयार करण्याचे काम सुरू केले आहे. लोकांची माथी भडकवण्याची, त्यांना अपुरी, अपूर्ण आणि चुकीची माहिती द्यायची आणि विरोधासाठी राजकारण करायचे ही गोष्ट कोकणवासीयांसाठी नवी नाही. तोच फॉर्म्युला पुन्हा रिफायनरी प्रकल्पासाठी सुद्धा वापरला जातोय. या प्रकल्पासाठी जनमत तयार होऊ लागले असताना आता काही बाहेरची माणसे आंदोलन करून लोकांना भडकवण्याचे काम करत आहेत.

पण आता खरी वेळ आली आहे ती रत्नागिरीकरांनी, कोकणवासीयांची पुढे येऊन सर्व गोष्टींचा सर्व बाजूने विचार करण्याची. प्रत्येकाला विरोध करणारा भूभाग म्हणजे कोकण असे चित्र जगभरात निर्माण झाले आहे. आतापर्यंत अशा अनेक संधी या विरोधामुळे, अपुऱ्या माहितीमुळे आणि कोणीतरी भडकवून दिलं यामुळे नाकारल्या आहेत. असे अनेक प्रकल्प कोकणात येऊन बंद पडलेत, रद्द झालेत किंवा आलेलेच नाहीत. त्यामुळेच इतक्या वर्षांमध्ये जग वेगाने बदलत असताना कोकण आहे तिथेच आहे. पण आताही जर इथल्या भूमिपुत्राने आपली मानसिकता बदलली नाही, तर येणाऱ्या पुढील २५ वर्षांत सुद्धा आपण आहोत तिथेच थांबणार आहोत हेही तितकेच निश्चित आहे.

म्हणूनच आजवर जी जी कारणे देऊन आपण येणाऱ्या उद्योगधंदे, प्रकल्प नाकारलेत त्या कारणांचा पुन्हा एकदा नव्याने विचार करणे आवश्यक झाले आहे. निसर्ग ऱ्हास हे कारण देऊन प्रकल्प नाकारले, पण म्हणून निसर्गाचा ऱ्हास थांबवू शकलो का? वातावरणातले बदल कोकणासाठी नियंत्रित झाले का? यामुळे आपल्या जीवनात उन्नती झाली का? तर नाही हेच उत्तर समोर येतेय. उलट आता उपलब्ध साधन संपत्ती कमी होतेय आणि त्यावर अवलंबून असलेल्या भूमिपुत्राच्या जगण्यासाठी आवश्यक गोष्टी सुद्धा हळूहळू कमी होत आहेत. त्याउलट राजापुरातील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी जगण्याची नवी दारे उघडणार आहे. अनेक संधी उपलब्ध करत आहे. एक कारखाना, एक छोटासा व्यवसाय, एक छोटा उद्योग आजूबाजूच्या परिसरामध्ये अामूलाग्र बदल घडवत असतो. त्या उद्योगामुळे, त्या व्यवसायामुळे त्या परिसरातील अनेक गोष्टी नव्याने सुरू होतात. एखादा मोठा प्रकल्प येणे म्हणजे केवळ त्या भागापुरताच तो मर्यादित राहत नाही तर त्याच्यामुळे अन्य सुद्धा व्यवसायाच्या संधी निर्माण होतात. राजापुरातील प्रस्तावित रिफायनरी या भव्य-दिव्य प्रकल्पामुळे अशा अनेक संधी उभ्या राहणार आहेत. एकीकडे जसा रोजगार, व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील तसेच मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी पूरक म्हणून या प्रकल्पांमुळे शैक्षणिक हब निर्माण होण्यास सुद्धा मदत होणार आहे. मोठे उद्योग जसे रोजगार व्यवसायाच्या संधी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देतात त्याचबरोबर सर्वांगीण विकासासाठी सुद्धा त्या महत्त्वाच्या मानल्या जातात. इथली आरोग्य व्यवस्था, दैनंदिन गरजा यामध्ये अामूलाग्र बदल होणार आहे. आज कोकणामध्ये महामार्ग चौपदरीकरण वेगाने सुरू आहे. कोकण रेल्वे वेग पकडते आहे. लवकरच सिंधुदुर्गप्रमाणे रत्नागिरीतसुद्धा विमानतळ सुरू होईल. दळणवळणाच्या दृष्टीने आपण सक्षम होणार आहोत. पण अशा व्यवस्था उपलब्ध असतानाही आपण अद्यापही पुढे का गेलो नाही हाही एक प्रश्नच आहे. मग या प्रश्नाचे उत्तर शोधताना ज्या संधी उपलब्ध असताना त्याचा उपयोग करून घेणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. विरोधाला विरोध करणे ही मानसिकता बाजूला करून नव्याने आपला प्रदेश घडवण्याची जबाबदारी आता प्रत्येकाच्या खांद्यावर येऊन पडली आहे.

आता जर रिफायनरीसारख्या मोठ्या प्रकल्पाला विरोध केला तर येणाऱ्या वीस-पंचवीस वर्षांत कोकणामध्ये नवीन प्रकल्प येणार तर नाहीच पण यासाठी आवश्यक प्रयत्न करणारे कडवट नेतृत्व सुद्धा उभं राहणार नाही. एकीकडे कोकणात ज्या प्रकल्पांना विरोध होतोय त्यांचं स्वागत खुल्या दिलाने करण्यासाठी विदर्भ मराठवाडासारखे प्रदेश सज्ज झाले आहेत. त्यामुळेच रिफायनरी एक मोठी संधी घेऊन येथे उभी असताना मूठभरांच्या चुकीच्या माहितीला, भडकवण्याला बळी पडून पुन्हा एकदा या कोकणाचा आपण बळी देणार आहोत का? याचा विचार विरोधाची भूमिका घेणाऱ्या प्रत्येक भूमिपुत्राने आवर्जून केला पाहिजे.

नुकताच आपण स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांचा अमृत महोत्सव साजरा केला. म्हणजेच आपण स्वातंत्र्याचे शंभरावे वर्षं पुढच्या २५ वर्षांनी साजरे करणार आहोत. एकीकडे भारत महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने पावले उचलतो आहे. भारतातील प्रत्येक प्रदेश या प्रगतीचा वेग पकडण्यासाठी तयारीला लागला आहे. अशा प्रगतीच्या काळात कोकण नेमका कोणता वेग आणि दिशा पकडणार आहे? या २५ वर्षांत निर्माण होणाऱ्या नव्या पिढ्यांसाठी काय देणार आहोत? इथली भकास गावे, ओसंडून वाहणारी महानगरे, त्यात भरडणारा इथला तरुण वर्ग हेच चित्र पुढच्या २५ वर्षांनंतर स्वातंत्र्याची शंभरी साजरी करणाऱ्या भारतात कोकण निर्माण करणार आहे की प्रगतीच्या नव्या वाटेवरून चालताना येणाऱ्या नव्या संधीचे मोकळ्या मानाने स्वागत करणार आहोत का? याचा विचार ‘विरोध’ हा शब्द बोलण्याआधी इथल्या कोकणच्या भूमिपुत्राने केला पाहिजे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -