Monday, April 21, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरपालघरमध्ये रिक्षा भाडेवाढीसंदर्भात सरकार सकारात्मक : उदय सामंत

पालघरमध्ये रिक्षा भाडेवाढीसंदर्भात सरकार सकारात्मक : उदय सामंत

विरार (प्रतिनिधी) : रिक्षा भाडेवाढीसंदर्भात सरकार सकारात्मक आहे. या मागण्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने लवकरच बैठक आयोजित करून निर्णय घेतले जातील व येत्या काही दिवसांत इतर मागण्या जाहीर करून १० दिवसांत रिक्षा भाडेवाढ जाहीर करू, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. ऑटोरिक्षा, टॅक्सी युनियनच्या मागण्या व अडचणी संदर्भांत चर्चा करण्यासाठी मंगळवार, १३ सप्टेंबर रोजी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी मुंबई, ठाणे, वाशी, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि वसईतील रिक्षा संघटनांकडून विविध मागण्या उद्योगमंत्र्यांसमोर मांडण्यात आल्या.

पालघर जिल्ह्यात एकूण आठ तालुक्यांपैकी सहा तालुके ग्रामीण भागात समाविष्ट आहेत. वसई आणि पालघर तालुका हा मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणात समाविष्ट झाला आहे. या ठिकाणी सीएनजी हे पेट्रोलपेक्षा स्वस्त मिळत असले तरीही होणारा पुरवठा कमी प्रमाणात आहे. तसेच सीएनजी भरण्यासाठी येऊन-जाऊन ६० किलोमीटरचा पल्ला गाठावा लागतो. सीएनजी पंपांवरील सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे बहुतांश रिक्षा चालक पेट्रोलवर रिक्षा चालवणे पसंत करत असल्याने पेट्रोलचे दर पालघर जिल्ह्यात द्यावे, अशी मागणी या बैठकीत नवनिर्माण रिक्षा-टॅक्सी टेम्पो चालक-मालक संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष महेश अंबाजी कदम यांनी केली.

यासोबतच महाराष्ट्र शासनाने ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्यासाठी कल्याणकारी महामंडळाची स्थापना करावी, महाराष्ट्रातील अवैध वाहतूक रोखण्याकरता प्रत्येक जिल्हानिहाय एक भरारी पथक नेमण्यात यावे, बेकायदा व्यवसाय करणाऱ्या रॅप्पीडो दुचाकी वाहनांवर सक्त कारवाई करण्यात यावी, कोरोना महामारीमुळे कर्जाचे हफ्ते रिक्षाचालकांना वेळेवर फेडता आलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर बजाज फायनान्स कंपनी व तत्सम कंपन्याविरोधात फौजदारी कारवाई करावी व बेकायदेशीर रिक्षा जप्त करण्यास मनाई करून रिक्षा चालकांना न्याय देण्यात यावा, अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली.

या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक आहे. लवकरच बैठक आयोजित करून निर्णय जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन उदय सामंत यांनी उपस्थित रिक्षा संघटनांना दिले. या बैठकीला मुंबई, ठाणे, वाशी, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीतील रिक्षा संघटनांसह आणि वसईतून नवनिर्माण रिक्षा, टॅक्सी टेम्पो चालक मालक संघटना संस्थापक-अध्यक्ष-महेश अंबाजी कदम व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -