Tuesday, July 16, 2024
Homeमहत्वाची बातमीचांगले आमच्यामुळे, वाईट तुमच्यामुळे, हे योग्य नाही : उदय सामंत

चांगले आमच्यामुळे, वाईट तुमच्यामुळे, हे योग्य नाही : उदय सामंत

मुंबई (प्रतिनिधी) : वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याचे खापर आमच्यावर फोडू नका. सगळे जे वाईट होत आहे, ते आमच्यामुळे आणि चांगले घडत आहे, ते तुमच्यामुळे असे होत नसते, अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ‘मविआ’वर केली. ते माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.

‘मविआ’वर टीका करत सामंत म्हणाले, वाईट झाले तर आमच्यामुळे झाले. ही राजकारणातली वाईट प्रवृत्ती आहे, तिचा मी जाहीर निषेध करतो. हा प्रोजेक्ट इथे आणण्यासाठी ८ ते ९ महिन्यांपासून प्रयत्न करत होतो. अनेक इनसेनटिव्ह योजना शासनासमोर ठेवल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वीच शिंदे-फडणवीसांचे सरकार आले. वेदांताला आणखी काही देता येईल का, याविषयी चर्चा झाल्या. स्वतः अनिल अग्रवालजीं यांच्यांशी देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली होती. पण, मागचा काही अनुभव पदरी आलेला असताना त्यांनी प्रकल्प गुजरातला हलवण्याचे ठरवले.

६ महिन्यांत फक्त भेटीगाठी झाल्या. मात्र, कोणताही निर्णय होऊ शकला नाही. फॉक्सकॉन प्रकल्प येणार नाही, अशीच मविआची मानसिकता होती. मविआने हाय पॉवर कमिटीची मीटिंग घेतली नाही. हा ७ जानेवारी २०२२ मधला अहवाल आहे. हा प्रकल्प गेला आहे, याचे दु:ख आम्हालाही आहे. चांगले झाले तर ते आमच्यामुळे झाले आणि वाईट झाले ते तुमच्यामुळे झाले, ही प्रवृत्ती योग्य नाही, अशी टीका त्यांनी मविआवर केली.

महाराष्ट्राला मोठा प्रोजेक्ट देण्याचे मोदींचे आश्वासन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींशी याबाबत चर्चा केली असून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे. कंपनीला वेळेत इनसेनटिव्ह पॅकेज दिले गेले असते तर हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गेला नसता. परंतु, याचे खापर शिंदे आणि फडणवीस सरकारवर फोडले जात आहे, असा घणाघातही त्यांनी मविआवर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भविष्यात याच तोडीचा किंबहुना यापेक्षा मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्राला, युवा पिढीला देऊ. जो रोजगार अपेक्षित आहे, तो आम्ही उपलब्ध करून देऊ, असे आश्वासनही मुख्यमंत्री शिंदेंना दिल्याचे सामंतांनी सांगितले.

महाविकास आघाडीच जबाबदार

वेदांतचा हा प्रकल्प गुजरातला गेल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला. आमदारांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी चर्चा करताना त्यांना वेदांत प्रकल्पावरुन प्रश्न विचारण्यात आला. ‘आमच्या शिवसेना-भाजपा सरकारला दोनच महिने झाले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ‘वेदांत समुहा’चे मालक अनिल अग्रवाल यांच्याबरोबर बैठक घेतली. या बैठकीत मी होतो, उपमुख्यमंत्री होते, कंपनीचे प्रमुख संचालक होते. त्यांनाही आम्ही विनंती केली होती. सरकार आपल्याला ज्या काही सवलती आहेत त्या निश्चित देईल असे त्यांना सांगण्यात आले होते. तळेगावजवळ ११०० एकर जमीन आम्ही देऊ केली होती,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

हा प्रकल्प राज्याबाहेर जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कारणीभूत असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्षपणे सांगितले. “त्यांना ३३ ते ३५ हजार कोटींच्या सवलती दिल्या होत्या. त्यामध्ये सगळ्याच गोष्टी होत्या, सबसिडी वगैरे आम्ही ऑफर केल्या होत्या. मात्र गेले दोन वर्षं त्यांना ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळायला हवा होता तो कमी पडला असावा. आमच्या नवीन सरकारने त्यांना पूर्णपणे सवलती देऊ केल्या होत्या,’ असे म्हणत एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडी सरकारकडे बोट दाखवले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -