मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने कचऱ्याचे संकलन करणे, विल्हेवाट लावणे व कचरा व्यवस्थापनासाठी निविदा काढली होती. त्या निविदेसाठी दोन निविदाकारांनी एक कार्टेल तयार करून निविदेत घोटाळा केला असल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केला आहे.
विनोद मिश्रा म्हणाले की, एका कंपनीला महानगरपालिकेने कचरा संकलनासाठी निवडले आहे. यापैकी एका निविदाकाराला नागपूर महानगरपालिकेने आधीच काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश दिले आहेत. या निविदाकाराला कंत्राट मिळण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मदत केली असल्याचाही आरोप मिश्रा यांनी केला आहे. महापालिकेने या निविदेच्या अटी व शर्तींमध्ये बदल करून कंत्राटदारांना फायदा मिळवून दिला आहे. तसेच आता तीच निविदा दर रु. १५००/- प्रति मेट्रिक टन आहे, जो प्रचलित दराच्या जवळपास तिप्पट आहे आणि निविदाकार ३५ टक्के आहेत.
त्यामुळे महापालिकेचे १००० कोटी रुपयांहून अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. यात ठेकेदाराला कचऱ्यात भेसळ करू नये व कचरा संकलन प्लांट जिथे असेल तिथे सीआरझेड परवानगी हवी अशी मागणी केली आहे. तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून बृहन्मुंबई महापालिकेने ही निविदा रद्द करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी विनोद मिश्रा यांनी केली आहे.
घनकचरा विभागाचे कंत्राटदार व अधिकारी अनेक कंत्राटांमध्ये मोठ्या प्रमाणावर अटींचा भंग करून लूट सुरूच असून याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मिश्रा यांनी केली आहे.