Thursday, March 27, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेउत्तनच्या कोळी बांधवांवर मासे दुष्काळाचे संकट

उत्तनच्या कोळी बांधवांवर मासे दुष्काळाचे संकट

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

भाईंदर (वार्ताहर) : ऑगस्ट महिन्यापासून सुरू झालेल्या मासेमारी हंगामात तीन वेळा वादळ, पाऊस यामुळे मासेमारी बोटींना परत यावे लागल्यामुळे इंधन, मजुरी या खर्चामुळे आर्थिक नुकसान त्यात मासे न मिळाल्याने उत्पन्नात घट यामुळे उत्तनचा मासेमारी समाज हवालदिल झाला आहे. शासनाने मस्त्य विभागाद्वारे सर्व्हेक्षण करून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

१ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारीला बंदी घालण्यात येते कारण या काळात मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. मासळीच्या बीज निर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. तसेच या कालावधीत खराब व वादळी हवामानामुळे होणारी मच्छीमारांची जीवित व वित्त हानी मासेमारी बंदीमुळे टाळता येणे शक्य होते. १ ऑगस्टपासून पुन्हा मासेमारीचा हंगाम सुरू होतो. यावर्षी मासेमारी करणाऱ्या बोटी आपल्या जीवाची पर्वा न करता डिझेल, बर्फ,व इतर साहित्य घेऊन समुद्रात मासेमारीसाठी निघाले होते. दरम्यान केरळ राज्यातील किनाऱ्यावरुन अरबी समुद्राकडे कूच करणारे वादळ ८ व ९ ऑगस्ट रोजी अरबी समुद्रात आल्यामुळे मासेमारी बोटींना वादळाची चिन्हे दिसू लागताच बोटी माघारी परतू लागल्या होत्या, त्यात २२ बोटी अडकल्या होत्या.

मासेमारीचा मोसम सुरू झाला असतानाच वादळाच्या संकटामुळे बोटी माघारी आल्या होत्या, बोटीवरील खलाशांचा रोजगार बुडाला होता. पुन्हा वादळ, पाऊस निसर्गाच्या कोपामुळे मोसमाच्या अवघ्या ४४ दिवसात तीन वेळा बोटी माघारी आल्या आहेत. डिझेल, बर्फ तसेच मजुराची प्रत्येकी दर दिवसा बाराशे रुपये असा खर्च माथी पडला. उत्तन भागात साधारण ७०० बोटी आहेत. यामुळे उत्तनचा मासेमारी समाज हवालदिल झाला आहे. मासेमारी हंगाम पूर्णपणे वाया जाईल की काय, अशी शंका वाटत आहे. शासनाने मस्त्य विभागाद्वारे सर्व्हेक्षण करून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी माजी नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी केली आहे. तसेच अन्यथा आगामी निवडणूकींवर कोळी समाज बहिष्कार टाकण्याची शक्यता वर्तवली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -