सिडनी (वृत्तसंस्था) : सरकारी खर्चाने ऑस्ट्रेलिया आपल्या संपूर्ण लोकसंख्येची डीएनए तपासणी करणार आहे. असे करणारा तो जगातला पहिला देश ठरणार आहे. लोकसंख्या निरोगी राहावी आणि उपचार वेळेवर मिळावेत, यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. लोकसंख्येचे ‘डीएनए सॅम्पलिंग’ केल्याने आगामी काळात लोकांना कर्करोग आणि मधुमेहासारखे जनुकीय आजार होण्याची शक्यता किती आहे हे कळू शकेल, असा सरकारचा विश्वास आहे.
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील मोनाश युनिव्हर्सिटीमध्ये सामान्यतः महाग मानले जाणारे ‘डीएनए स्क्रीनिंग’ सुरू करण्यात आले आहे. ७५ पैकी एकाला गंभीर आजाराचा धोका असतो. मोफत डीएनए चाचणी प्रकल्पाबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता. पहिल्या टप्प्यात २४ तासांपेक्षा कमी कालावधीत १८-४० वयोगटातल्या दहा हजार लोकांनी डीएनए तपासणीसाठी नोंदणी केली. चाचणी केलेल्या प्रत्येक ७५ लोकांपैकी एकाला भविष्यात गंभीर आजार होण्याचा धोका असल्याचे निकालांनी स्पष्ट केले.
चाचणीत गंभीर आजार होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने अनेक जण चिंतेतही होते. मोनाश युनिव्हर्सिटीमध्ये या प्रकल्पाचे नेतृत्व करणा-या जेन टिलरच्या म्हणण्यानुसार, चाचणीदरम्यान भविष्यातल्या आजाराचे निदान झालेले लोक चिंतेत आहेत; परंतु त्यामुळे त्यांच्या आजाराचा धोका कमी होण्यास मदत होईल. यातून सावरण्यासाठी आपण त्यांना वेळ दिला पाहिजे.
वेळेत चांगले आरोग्य प्रदान करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. स्क्रिनिंगच्या डेटासह, सरकार आरोग्य बजेट ठरवू शकेल. ‘डीएनए स्क्रीनिंग’च्या डेटाच्या आधारे सरकार आरोग्य बजेट ठरवू शकेल. तज्ज्ञांचे मत आहे की, सध्या लोकांना आजार झाल्यानंतर निदान होते. प्रत्येक वयोगटानुसार ‘डीएनए स्क्रीनिंग’चा डेटा ठेवला जाईल, जो सरकार वापरणार आहे.