मुंबई (प्रतिनिधी) : येत्या काळात प्रत्येक होर्डिंगवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक होण्याची चिन्हे आहेत. जेणेकरून त्याच्या परवानगीबाबतची सारी माहिती थेट मोबाईलवर प्रत्येकासाठी जाहीरपणे उपलब्ध होईल. राज्यभरातील बेकायदेशीर होर्डिंग आणि बॅनरवर आळा घालण्याच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचे पाऊल ठरणार असून लवकरच मुंबई उच्च न्यायालय याबाबतचे सविस्तर आदेश जारी करणार आहे.
तसेच राज्यभरातील बेकायदेशीर होर्डिंग्जविरोधात दिलेल्या आदेशांनुसार कारवाई न करणाऱ्या पालिकांना मुंबई उच्च न्यायालयाने अखेरची संधी देत तीन आठवड्यांत आपली भूमिका मांडण्याचे निर्देश दिले आहेत. यात प्रामुख्याने कोल्हापूर, लातूर, धुळे, नांदेड, अहमदनगर या पालिकांचा समावेश होता, ज्यांनी एकही कारवाई केलेली नसल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाच्या निर्दशनास आणून दिली. १३ ऑक्टोबरला होणाऱ्या पुढील सुनावणीत यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालय सविस्तर आदेश जारी करणार आहे.
सोमवारच्या सुनावणीत महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी माहिती दिली की, ऑगस्ट महिन्यात राज्य सरकारने बेकायदेशीर होर्डिंगविरोधात खास मोहीम राबवली होती. ज्यात राज्यभरात २७ हजार २०६ अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करत तब्बल ७ कोटी २३ लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय ३ ते २० ऑगस्ट दरम्यान मुंबई महापालिकेनंही विशेष कारावाई करत १६९३ होर्डिंग्ज हटवले आणि यासंदर्भात १६८ फौजदारी गुन्हे दाखल केल्याची माहिती उच्च न्यायालयात दिली. बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून होर्डींगच्या तक्रारीसाठी टोल फ्री नंबर तसेच वेब साईटवरही तक्रार दाखल करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिल्याची माहिती देण्यात आली. तसेच या कारवाईसाठी २६वाहने कर्मचा-यांसह तैनात केल्याची माहिती देण्यात आली.
राज्यातील बेकायदा होर्डिंगबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुस्वराज्य फाऊंडेशन तसेच भगवानजी रयानी यांनी काही वर्षांपूर्वी जनहित याचिका दाखल केल्या होत्या. या जनहित याचिकांवर पाच वर्षापूर्वी जानेवारी २०१७मध्ये उच्च न्यायालयाने निर्णय देताना बेकायदा होर्डिंग, बॅनरविरोधात कठोर कारवाई करावी, नागरिकांना तक्रार करता यावी यासाठी यंत्रणा निर्माण करावी याबाबत सविस्तर आदेश दिलेले आहेत. बेकायदा होर्डिंगबाबत महापालिका, नगरपालिकेकडे सर्वसामान्य लोकांकडून तक्रार आल्यास त्या तक्रारीची तातडीने शहानिशा करून गुन्हा नोंदवणे पोलिसांना बंधनकारक आहे. मात्र सहसा ही कारवाई होताना दिसत नसल्याचं हायकोर्टापुढे आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
काय आहे प्रकरण?
राज्यातील अनधिकृत पोस्टर्स, होर्डिंग्ज आणि बॅनर्सबाबत मुंबई उच्च न्यायालयाने पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशांत काही मार्गदर्शक तत्वे आखून दिली होती. मात्र त्या आदेशाची अद्याप अंमलबजावणी होत नसल्याने उच्च न्यायालयाने याबाबत स्वत:हून दाखल केलेल्या सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर सोमवारी मख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. ज्यात बेकायदा होर्डिंग आणि बॅनरबाजी विरोधात आदेशानुसार काय कारवाई केलीत?, याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारसह राज्यातील सर्वच महापालिका व नगरपालिकांना दिलेला होता.
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…
डोंबिवलीवर शोकसागराचे सावट, पनवेलमध्ये दु:खाचा कल्लोळ तर पुण्यात अश्रूंच्या धारा मुंबई : काश्मीरच्या पहलगाम येथील…
CT Scan Caused Cancer: सीटी स्कॅन हा शब्द प्रत्येकांनी कधी ना कधी ऐकला असेल, वेगवेगळ्या…