मुंबई (वार्ताहर) : मुंबई विद्यापीठामार्फत आयोजित ५५व्या आंतरमहाविद्यालयीन/ संस्थात्मक/ विभागीय सांस्कृतिक युवा महोत्सव अंतिम फेरीचे उद्घाटन बुधवारी राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांचे हस्ते करण्यात आले.
विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात आयोजित करण्यात आलेल्या या उद्धाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सन्माननीय उपस्थिती म्हणून कुलगुरू प्रा. दिगंबर शिर्के, प्रभारी कुलसचिव प्रा. शैलेंद्र देवळाणकर यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री निवेदीता जोशी-सराफ, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील आणि कला-नाट्य यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सर्वोत्तमतेचा ध्यास घेऊन मार्गक्रमण करावे. ज्या-ज्या क्षेत्राची निवड करणार त्या-त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करा, असा सल्लाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. या प्रसंगी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा मानपत्र, गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर भाषणात कुलगुरू प्रा. दिगंबर शिर्के म्हणाले की, सांस्कृतिक युवा महोत्सव हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे दर्शन घडविणारे एक व्यासपीठ आहे. अशा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांना त्यांचातील कला-गुणांचा आविष्कार करण्याची संधी मिळत असते. विद्यार्थी विकास विभागाने या स्पर्धांच्या प्राथमिक फेऱ्यांचे उत्तम आयोजन केल्याबद्दल त्यांनी सर्व संयोजक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
मुंबई विद्यापीठामार्फत दरवर्षी सांस्कृतिक युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या सांस्कृतिक युवा महोत्सवाचे हे ५५ वे वर्ष आहे. या सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या प्राथमिक फेऱ्या मुंबई विद्यापीठाच्या सात जिल्ह्यातील विविध अकरा परिक्षेत्रात दिनांक ३ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट २०२२ या दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये जवळपास ३४० हून अधिक महाविद्यालयांनी सहभाग घेतला. यामध्ये संगीत, नृत्य, नाट्य, वाड्मय आणि ललीत कला या एकूण पाच कला प्रकारातील विविध ४१ स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.