अहमदाबाद : मागील काही वर्षांपासून सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे भारतातील उद्योगांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. ऑटो आणि स्मार्टफोन निर्मिती उद्योगांना यामुळे मोठा फटका बसला होता. यामुळेच सेमीकंडक्टरबाबत आत्मनिर्भर होण्यासाठी भारतातील उद्योजकांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. या ‘आत्मनिर्भर भारत’कडे एक पाऊल पुढे टाकत सोमवारी वेदांता समूहाने तैवानमधील फॉक्सकॉन कंपनीसोबत २० अब्ज डॉलरचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये अहमदाबादजवळ सुरू करणार असल्याची घोषणा केली.
वेदांत आणि फॉक्सकॉन यांनी मंगळवारी गुजरात सरकारसोबत राज्यात प्लांट स्थापन करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत गांधीनगरमध्ये या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
गुजरात सरकारने या प्रकल्पासाठी स्वस्त दरात वीज आणि अनुदान, इतर मदत जाहीर केली आहे. एका वृत्तानुसार, वेदांता समूहाने मोफत १००० एकर जमीन ९९ वर्षांसाठी मागितली होती. त्याशिवाय स्वस्त, वाजवी दरात पाणी-वीज मागितली होती, असे सूत्रांनी सांगितले.
भारतातील सेमीकंडक्टरची बाजारपेठ २०२० मध्ये १५ अब्ज डॉलर इतकी होती. ही बाजारपेठ २०२६ पर्यंत ६३ अब्ज डॉलर इतकी होण्याचा अंदाज आहे. तैवान, चीनसारख्या मोजक्याच देशांमध्ये सेमीकंडक्टरची निर्मिती केली जाते. आगामी डिजीटल तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेता सेमीकंडक्टरला मोठी मागणी असणार आहे. चीन-तैवानमधील तणाव, कोरोना महामारी साथ आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे भारताला विदेशातून होणाऱ्या सेमीकंडक्टर पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.