Thursday, July 18, 2024
Homeकोकणरायगडखालापूरमधील १०३ गावांचा भूमापन सर्व्हे यशस्वी!

खालापूरमधील १०३ गावांचा भूमापन सर्व्हे यशस्वी!

‘शासन आपल्या दारी’ योजने अतर्गंत सनदचे वाटप

अलिबाग (वार्ताहर) : खालापूर तालुक्यात ड्रोनद्वारे झालेल्या गावठाण भूमापन सर्व्हे अन्वये सनद वाटप कार्यक्रमाला तालुक्यातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत १०३ गावांचा ड्रोनद्वारे भूमापन सर्व्हे झाला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, कोकण प्रदेश, मुंबई भूमी अभिलेखचे उपसंचालक जयंत निकम आणि रायगड जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी यांचे विशेष मार्गदर्शन मिळत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या गावांचे गावठाण भूमापन झालेले नाही, अशा गावांचे संपूर्ण गावठाण सर्वेक्षण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी अशा स्वामित्व योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास खात्यांतर्गत घेण्यात आला. त्यानुसार भूमी अभिलेख विभागाच्या पुढाकाराने महसूल विभाग व ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वामित्व योजना” सुरु करण्यात आली.

स्वामित्व योजनेंतर्गत खालापूर तालुक्यातील कामकाज सुरु असून, या तालुक्यातील एकूण १५३ गावे व वाड्यांपैकी गावठाण भूमापन न झालेले १०३ गावांची अत्याधुनिक ड्रोनद्वारे भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्यामार्फत अत्यंत अचूक पद्धतीने मोजणी करण्यात आली. यावेळी मोजणी नकाशे भारतीय सर्वेक्षण विभागाकडून मिळाल्यानंतर प्रत्यक्षात जागेवर जाऊन भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून संपूर्ण अभिलेख डिजिटाईज करून घेतले.

सर्व्हे ऑफ इंडियामार्फत भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे गावठाणातील प्रत्येक मिळकतीची सनद मिळकत पत्रिका व नकाशा तयार करण्यात आले. अशा पद्धतीने खालापूर येथे १०३ गावांचे ड्रोन सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून ४५ गावांचे प्रत्यक्ष जागेवर जावून चौकशीचे काम देखील पूर्ण झालेले आहे. त्यापैकी ३८ गावांच्या मिळकत पत्रिका तयार असून, १३ गावांच्या सनद तयार झालेल्या आहेत. सनद हा शासनाने मालकी हक्काचा पुरावा म्हणून घोषित केलेला आहे.

या सनद वाटप कार्यक्रमासाठी विणेगाव, इसांबे, तोंडली, ढेकू, वारद, कुंभिवली व सारसन, लोहोप, स्वाली, पौद, केळवली या गावांमध्ये विशेष शिबीर घेण्यात आले. यावेळी संबंधित गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक यांनी उत्तम सहकार्य केले. याप्रसंगी सरासरी ८२ टक्के वसूली झाल्याचे सांगण्यात आले. उपअधीक्षक, भूमी अभिलेख, खालापूर या कार्यालयाने “शासन आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत संबंधित खातेदारांना सनद वाटप व मिळकत पत्रिका चावडी वाचन केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -