डॉ. सर्वेश सोमण
मागील आठवड्यात निर्देशांक तेजीत राहिले. निफ्टी १७९२५ ते १७४८४ या पातळीत राहिली. पुढील आठवड्यासाठी निर्देशांकाची दिशा तेजीची असून गतीही तेजीची आहे. आता निर्देशांक निफ्टीची १७५०० ही खरेदीची पातळी आहे. आता जोपर्यंत निर्देशांक या पातळ्यांच्या वर आहेत, तोपर्यंत निर्देशांकातील तेजी कायम राहील. टेक्निकल अॅनालिसिसनुसार, बीएसएल, विनील इंडिया, बजाज होल्डिंग, स्टेट बँक ऑफ इंडिया यांची दिशा तेजीची आहे. मध्यम मुदतीच्या चार्टनुसार “टाटा इन्व्हेस्ट” या शेअरने १७३४ ही अत्यंत महत्त्वाची पातळी तोडत तेजी सांगणारी रचना तयार केलेली आहे. त्यामुळे या शेअरमध्ये पुढील काळात अल्पमुदतीत चांगली वाढ होणे अपेक्षित आहे. त्यामुळे आज १८२८ रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये १५०० रुपये किमतीचा बंद पद्धतीने स्टॉपलॉस ठेवून तेजीचा व्यवहार केल्यास चांगला फायदा होऊ शकेल. सध्या निर्देशांकाची दिशा जरी तेजीची असली तरी फंडामेंटल बाबतीत निर्देशांकांचे मूल्य थोडे महाग आहे. सध्या पी.ई रेशो हा २१.२९ आहे. इतिहासाचा विचार करता ज्यावेळी या गुणोत्तरानुसार निर्देशांकांचे मूल्य हे महाग असते. त्यावेळी त्यानंतर पुढील २ ते ३ वर्षे शेअर बाजाराने नेहमीच नकारात्मक परतावा दिलेला आहे. त्यामुळे या गोष्टींचा विचार करता कोणत्याही शेअर्समध्ये डोळे बंद करून गुंतवणूक न करता केवळ अल्प तसेच मध्यम मुदतीत तेजीची दिशा असणाऱ्या शेअर्सचाच गुंतवणुकीसाठी विचार करणे योग्य ठरेल.
दीर्घमुदतीची गुंतवणूक शेअर बाजारात नेहमीच उत्तम फायदा मिळवून देत आलेली आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता मूळ भांडवलापैकी, दीर्घमुदतीसाठी फार मोठी गुंतवणूक करणे घाईचे ठरू शकते. त्यामुळे दीर्घमुदतीसाठी गुंतवणूक करण्याची इच्छा असणाऱ्या गुंतवणूकदारांनी निर्देशांकांच्या पुढील घसरणीत टेक्निकल व फंडामेंटल अशा दोन्ही बाबतीत चांगल्या कंपन्या टप्प्याटप्प्यानेच खरेदी करण्याचे धोरण ठेवणे योग्य ठरेल. अल्प तसेच मध्यम मुदतीचा विचार करता टेक्निकल बाबतीत तेजीची दिशा असणाऱ्या शेअर्समध्ये स्टॉपलॉसचा वापर करूनच गुंतवणूक करावी. शेअर बाजारात बऱ्याच वेळा गुंतवणूकदार स्टॉपलॉसचा उपयोग करताना दिसून येत नाही. परिणामी होत असलेल्या तोट्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असते. पुढील काळात स्टॉपलॉसचा वापर टाळणे ही मोठी चूक ठरू शकते. याला कारण ज्यावेळी फंडामेंटल बाबतीत निर्देशांक महाग झालेले असतात. त्यावेळी निर्देशांकात होणाऱ्या घसरणीच्या तुलनेत शेअर्समध्ये होणारी घसरण ही फार मोठी असते. त्यामुळे गुंतवणूक करीत असताना स्टॉपलॉस अत्यंत आवश्यक आहे. निर्देशांक निफ्टी काही आठवडे रेंज बाउंड अवस्थेत होती. मात्र मागच्या आठवड्यात अल्पमुदतीच्या चार्टनुसार निफ्टीने ही रेंज बाउंड अवस्था तोडत तेजीचे संकेत दिलेले आहेत. त्यामुळे चार्टचा विचार करता निफ्टी पुढील काळात १८००० चा टप्पा ओलांडत १८२०० पर्यंत मजल मारणे अपेक्षित आहे. निर्देशांक देत असलेले संकेत पाहता ऑप्शन मार्केटमध्ये जोखीम घेण्याची क्षमता असणाऱ्या गुंतवणूकदारांनी पुढील २ आठवड्यांचा विचार करता या महिन्याच्या “कॉल ऑप्शन”मध्ये व्यवहार केल्यास चांगला फायदा होऊ शकेल. ऑप्शन खरेदी ही नेहमीच अत्यंत जोखमीची असते.
त्यामुळे त्यामध्ये आपली जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घेऊनच गुंतवणूक करावी. कमोडीटी मार्केटचा विचार करता टेक्निकल अॅनालिसिसनुसार या सोन्याची दिशा आणि गती ही अल्पमुदतीसाठी तेजीची आहे. आता सोन्याची ५०००० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी आहे. जोपर्यंत सोने या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत सोन्यामधील तेजी कायम राहील. त्याचवेळी सोने या धातूची मध्यम मुदतीचा विचार करता सोने काही काळ रेंज बाउंड राहू शकते. अल्पमुदतीचा विचार करता ५०७०० ही सोन्याची विक्रीची पातळी असून जोपर्यंत सोने ही पातळी तोडून स्थिरावत नाही, तोपर्यंत सोन्यात मोठी तेजी येणार नाही. टेक्निकल चार्टनुसार कच्च्या तेलाची दिशा आणि गती ही मंदीची असून कच्च्या तेलाने मध्यम मुदतीच्या चार्टनुसार ६८०० ही पातळी तोडत मंदी सांगणारी रचना यापूर्वीच केलेली आहे. मागील आठवड्यात कच्च्या तेलाने बाउन्स बॅक केला असला तरी ही विक्रीची उत्तम संधी आहे. सध्या कच्चा तेलाची दिशा मंदीची असल्याने यामध्ये तेजीचा व्यवहार करू नये.