नाशिक (प्रतिनिधी) : मानवतेच्या दृष्टीकोनातून आरोग्य सेवा जोडली जावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मातेचे आरोग्य निरोगी असणे महत्वाचे असून निरोगी मातृत्वातूनच सशक्त भारताचे भविष्य घडणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.
जिल्ह्यातील ७५ आरोग्य केंद्रावर गरोदर मातांच्या तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांचा शुभारंभ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात डॉ. भारती पवार यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड या दूरदृष्यप्रणालीद्वारे तर आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डॉ. सुनील राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, चांदवड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशीलकुमार शिंदे, चांदवड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे आदी प्रत्यक्ष उपस्थित होते.
डॉ. पवार पुढे म्हणाल्या की, सशक्त व सुदृढ पिढी तयार करण्यासाठी त्याची सुरूवात मातेच्या गर्भधारणेपासून होणे आवश्यक आहे. गरोदरपणाच्या काळात प्रत्येक मातेला चौरस आहार मिळणे, तिच्या आरोग्याची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. तसेच अतिजोखमी मातांचा शोध घेवून त्यांना गरोदरपणात लागणाऱ्या आरोग्याच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा या शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने मातांना सुरक्षा व सुरक्षित मातृत्व देण्यासाठी अनेकविध योजना राबविण्यात येत असून यात गरोदर मातांची नोंदणी, पंतप्रधान मातृ वंदना योजना, जननी सुरक्षा योजना, नियमित लसीकरण अशा अनेक योजनांच्या माध्यमातून मातांना आरोग्यविषयक आवश्यक सुविधांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येत असून यामुळे माता व बाल मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे, असेही डॉ. बारती पवार म्हणाल्या.
सर्व आरोग्य यंत्रणेच्या मदतीने आयोजित करण्यात आलेले हे शिबीर मानवतेचा संदेश देणारे आहे. यापुढेही आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णांपर्यंत सहजतेने पोहचून त्यांना रुग्णसेवा व औषोधोपचार पुरविण्यासाठी प्रयत्न करावा. आपल्या संसस्कृतीमध्ये मातेला आदराचे व सर्वोच्च स्थान असून आपण भारत मातेप्रती समर्पित भावना जपतो, याच भावनेतून गर्भवती महिला, मातांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड म्हणाल्या की, गरोदरपणात महिलेला योग्य व सकस आहार तसेच आरोग्य सुविधा मिळाल्यास जन्मत: कुपोषित असणाऱ्या बालकांचे प्रमाण कमी होईल. त्यादृष्टीने जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे. गरोदर मातांसाठी ॲनॉमली स्कॅनची सुविधा आरोग्य यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आली. या शिबिरांच्या माध्यमातून स्त्रीरोग तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात येणाऱ्या गरोदर महिला व अतिजोखमीच्या गरोदर मातांच्या आरोग्याप्रती जागृत राहून विशेष काळजी घेण्यात येणार आहे, असेही लीना बनसोड यांनी यावेळी सांगितले.
सुरूवातील आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. प्रास्ताविकात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी शिबिरांत देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.