Saturday, October 25, 2025
Happy Diwali

एका अपघातामुळे मी संगीत क्षेत्राकडे वळले; डॉ. प्रभा अत्रे यांनी दिला आठवणींना उजाळा

एका अपघातामुळे मी संगीत क्षेत्राकडे वळले; डॉ. प्रभा अत्रे यांनी दिला आठवणींना उजाळा

मुंबई (वार्ताहर) : माझ्या आयुष्यातील एका अपघातामुळे मी संगीत क्षेत्राकडे वळले. माझी आई कायम आजारी असायची. आईचा विरंगुळा म्हणून घरी पेटी शिकवायला शिक्षक यायचे. आईने पेटी शिकण्याला नकार दिल्यामुळे वडिलांनी मला पेटी शिकण्यासाठी हट्ट केला. त्यानंतर मला संगीतात रुची वाढू लागली. कालांतराने मी अनेक स्पर्धेत भाग घेऊ लागले. त्यात मला ओळख मिळत होती. लोकांना आवडत होते, अशा प्रकारे माझा संगीताचा प्रवास सुरू झाला, अशी आठवण ज्येष्ठा गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी एका मराठी वृत्तवाहीनीशी बोलताना व्यक्त केली.

डॉ. प्रभा अत्रे यांच्या ९०व्या वाढदिवसानिमित्त शिवाजी नगर येथे स्थापन करण्यात आलेल्या किराणा घराणा ग्रंथालय व संसाधन केंद्राचे औपचारिक उद्घाटन अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष डॉ. विकास कशाळकर यांनी केले. या ग्रंथालय आणि संसाधन केंद्रामुळे त्यांच्या कार्याचा प्रवास निरंतर पुढे सुरू राहणार आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या अनेक गोड आठवणींना उजाळा दिला आणि सांगीतिक जीवनाचा प्रवास उलगडला.

डॉ. प्रभा अत्रे म्हणाल्या की, व्यवसायाने मी गायिका असले, तरी विज्ञान आणि कायदा क्षेत्रातील पदवीधर असल्यामुळे कुठल्याही गोष्टीकडे विज्ञान आणि तर्क यांच्या दृष्टीकोनातून पाहायची मला सवय झाली आहे. माझे आई, वडिल आणि गुरू मला उघड्या डोळ्याने परंपरेकडे बघ आणि काम कर, असे नेहमी सांगत. परंपरेवर माझी खूप श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धा नाही. संगीत मुळात एक कला आहे, पण त्याला विज्ञानाची जोड आवश्यक आहे, असे मत अत्रे यांनी व्यक्त केले.

Comments
Add Comment