Wednesday, April 30, 2025

महामुंबईताज्या घडामोडीराजकीय

Video : या असल्या धांगडधिंगाण्याची आम्ही दखल घेत नाही आणि घेतली तर यांचं चालणं बोलणं कठीण होऊन बसेल

Video : या असल्या धांगडधिंगाण्याची आम्ही दखल घेत नाही आणि घेतली तर यांचं चालणं बोलणं कठीण होऊन बसेल

मुंबई : शिंदे गटाची ताकद काय आहे ते काळानुसार कळेल. ठाकरे गटाच्या या असल्या धांगडधिंगाण्याची दखल आम्ही घेत नाही. आणि घेतली तर यांचं चालणं बोलणं कठीण होऊन बसेल. सरकार आमचं आहे हे लक्षात ठेवा. असले प्रकार चालू देणार नाही, असा थेट इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला दिला आहे. नारायण राणे यांनी आज शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.

अनंत चतुदर्शीनिमित्त गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत प्रभादेवी येथे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात जोरदार बाचाबाची झाली. यानंतर आमदार सदा सरवणकर आणि त्यांचा मुलगा समाधान सरवणकर यांचा उद्धव ठाकरे गटासोबत वाद झाला. यात सदा सरवणकर यांनी शिवसैनिकांना धमकावण्यासाठी त्यांच्याकडील पिस्तूलमधून हवेत गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. त्याअंतर्गत सदा सरवणकर यांच्या विरोधात पोलिसांनी आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा देखील दाखल केला आहे.

या संपूर्ण प्रकरणानंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सदा सरवणकर यांची त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली. ते माझे चांगले मित्र आहेत आणि आम्ही आता युतीत आहोत. त्यामुळे घटनेची माहिती घेण्यासाठी आलो होतो, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

"मातोश्रीच्या दुकानात बसून फक्त तक्रारींचे मार्केटिंग सुरू आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात त्यांनाही फिरायचे आहे. परवानगी घ्यावी लागेल याचा त्यांनीही विचार करावा. ५० लोक एखाद्या व्यक्तीला मारण्यासाठी घरावर येतात मग त्यांच्यावर कोणत्या अॅक्ट अंतर्गत कारवाई करणार?", असा सवाल उपस्थित करत नारायण राणे यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला.

Comments
Add Comment