Thursday, June 12, 2025

आपण संन्यासी एकच आहोत

विलास खानोलकर


श्री स्वामी समर्थांना गोविंदस्वामींस प्रबोधित करावयाचे होते. एका संन्याशाने दुसऱ्या संन्याशाला भोजन-भिक्षेचे निमंत्रण देणे, हे अनुचित आहे, हे श्री स्वामींनी सुचविले होते. तरीही त्यांनी जाणून-बुजून गोविंदस्वामींच्या भोजन-भिक्षेच्या निमंत्रणाचा स्वीकार केला. दुसऱ्या दिवशी शिंदे सरकार, गोविंदस्वामी आणि इतर मंडळी श्री स्वामी समर्थांकडे येताच, त्यांनी दादूमियाँ या मुसलमानाकडून चपाती आणि बेसन मागून घेतले आणि ते गोविंदस्वामींपुढे ठेवले आणि मोठ्याने बोलले,


'आव जी अभेद परमहंस भिक्षा लेव, खाव.' सन्याशाला कशाचाच भेद नसतो, हे आदले दिवशीच गोविंदस्वामी म्हणाले होते. त्यावरच नेमके बोट ठेवून त्यांनी मुसलमानाकरवी ही कृती केली होती. त्याक्षणी गोविंदस्वामींना श्री स्वा समर्थाच्या या कृतीचा आणि उद्गारांचा उलगडा झाला.


श्री स्वामी समर्थांसारखी आपली वृत्ती निर्लेप, निरिच्छ, निरलस, अद्यापही झालेली नाही, याची जाणीव गोविंदस्वामींना झाली. त्यांनी या लीला भागात पश्चात्तापपूर्वक जे मनोगत व्यक्त केले आहे. 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.' आपली बरोबर स्वप्नात देखील करता येणार नाही. हे खरोखरच प्रत्येकासाठी चिंतनीय, ममनीय आणि आचरणीय आहे.


वरील मूळ लीलेतील भाग आपण सर्वांनाच अंतर्मुख करणारा आहे. शब्द वाचाळवीर खूप असतात, पण तशी कृत्ये करणारे श्री स्वामी समर्थासारखे मोजकेच, लालित्यपूर्ण, रसाळ भाषणाने दिपवून टाकणारे अनेक असतात, पण त्यांचा प्रभाव श्रोत्यावर पडतोच असे नाही आणि पडला तर तो श्रोत्यांवर टिकून राहत नाही. 'लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण स्वतः कोरडे पाषाणच' फार असतात. परंतु श्री स्वामींचा आचार-विचार हा 'बोले तैसे चाले' असाच कायम असल्याचे गोविंदस्वामींस जाणवले. तसे प्रांजळपणे त्यांनी बोलूनही दाखवले.


गोविंदस्वामींना योग्य बोध मिळाल्याने श्री स्वामींच्या लक्षात आल्यानंतर मोठ्या मनाने आणि उदार अंतःकरणारे ते गोविंदस्वामींस म्हणाले,'आपण एकच आहोत.' श्री स्वामींच्या या कृतीतून आपण काय बोध घेणार? उदार अंतःकरण, सर्वाप्रती ममत्वाची भावना. एखाद्याला एखादी गोष्ट-तत्त्व-बोध कृतीतून सहजगत्या समजावून देणे, असे बरेच काही करून सुध्दा कोणताही अहंभाव नाही. कर्तेपणाचा तोरा नाही.

Comments
Add Comment