Monday, July 15, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यगणेशोत्सवाच्या भेटी; पण चर्चा राजकीयच

गणेशोत्सवाच्या भेटी; पण चर्चा राजकीयच

सीमा दाते

कोरोनाच्या दोन वर्षांनंतरचा गणेशोत्सव आनंदात साजरा झाला, गेल्या दोन वर्षांत कोरोना निर्बंधामुळे आपल्या नातेवाइकाकडे कोणाला जाता आले नव्हते मात्र यंदाचा गणेशोत्सव सगळ्यांसाठीच वेगळा होता. या गणेशोत्सवात राजकीय नेत्यांच्याही भेटी-गाठी झाल्या, मात्र या भेटी-गाठीची राजकीय चर्चा रंगू लागली आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीला घेऊन या भेटीगाठी सुरू असल्याचं बोललं जात आहे. त्यातच मुंबईला झालेली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट, अमित शहा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आले मात्र त्याहीवेळी महापालिका निवडणुकीबद्दलच राजकीय चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे.

सध्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सगळेच पक्ष आपली मोर्चेबांधणी करायला लागले आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका ज्या महापालिकेचे आर्थिक बजेट ४० हजार कोटींहून अधिक आहे त्या महापालिकेवर आपल्या विजयाचा झेंडा फडवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

सध्या ही निवडणुकीची लढाई शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप अशी आहे. सध्या राज्यात भाजपची सत्ता आहे. मात्र मुंबई महापालिकेवरही भाजपचीच सत्ता आली पाहिजे यासाठी भाजपने यंदा सगळी ताकद लावली आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबईतील दौरा महत्त्वपूर्ण समजला जातो. लालबाग राजासह मुंबईतील विविध मंडळांना अमित शहा यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला, मात्र हाच संवाद म्हणजे महापालिका निवडणूक जिंकण्यासाठीचा कानमंत्र होता, असे म्हणावे लागले आणि यामुळे येणारी महापालिका निवडणूक ही उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप यांच्या अटीतटीची असणार आहे.

जेवढी राज्यातील सत्ता महत्त्वाची असते तेवढीच मुंबई महापालिकेतील सत्ता देखील महत्त्वाची असतेच. मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवल्यास विधानसभा क्षेत्रावरही त्याचा परिणाम होतो आणि म्हणूनच गेल्या अनेक वर्षांपासूनची मुंबई महापालिकेतील सत्ता शिवसेनेला सोडायची नाही, तर दुसरीकडे शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपला राज्यानंतर मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवणे गरजेचेच आहे. गेल्या २०१७ च्या महापालिका निवडणुकीत काहीशा फरकानेच भाजपला सत्तेपासून मुकावे लागले आणि शिवसेनेने आपला महापौर महापालिकेवर स्थापित केला. त्यावेळी सेनेला ८४, तर भाजपला ८२ मते मिळाली होती. त्यावेळी पाचशे ते दोन हजार मतांच्या फरकाने ३० जागा भाजपने गमावल्या होत्या. त्या जागांवर यावेळी भाजपने जोर लावला आहे. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून ६ नगरसेवक शिवसेनेत आले आणि शिवसेनेचे संख्याबळ वाढले. मात्र आता भाजपने १४० पेक्षाही जास्त जागांचे उद्दिष्टे ठेवले आहे.

त्यामुळे यंदा शिवसेनेपासून सत्ता मिळवण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करत आहे. मात्र तरीही शिवसेनेसोबतची ही निवडणूक भाजपला कठीण जाणार आहे. मुंबईत शाखांच्या माध्यमातून शिवसेनेने केला संपर्क आणि जमवलेली लोक मात्र असं असले तरी भाजपही आता बूथ संघटनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली आहे. आधीच शिवसेनेने महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केल्यामुळे मराठी मतदार रागावले आहेत. मात्र याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. कारण त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपसोबत जाण्याची चर्चा सुरू आहे.

तर दुसरीकडे शिंदे गट झाल्यामुळे येणारी निवडणूक ही रंगतदार असणार आहे. त्यातच शिवसेनेच्या पाच आमदारांनी सेनेची साथ सोडली आहे, तर गेले चार वर्षे स्थायी समिती पद भूषविलेले यशवंत जाधववर शिवसेनेने वेट अँड वॉचची भूमिका ठेवली होती. मात्र गणपती बाप्पाच्या भेटींमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यशवंत जाधव यांच्या मंडळाला भेट दिली आणि यशवंत जाधव हेही शिंदे गटात असल्यावर पूर्णविराम लागला. मात्र यामुळे शिवसेनेच्या मतांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे. मात्र तसे असले तरी शिवसेनेला याचा फारसा उपयोग होणार नाही. कारण राष्ट्रवादीचे मताधिक्य मुंबईत हातच्या बोटावर मोजण्याइतके आहे. त्यामुळे सगळ्या बाजूने विचार करूनच शिवसेनेला महापालिका निवडणुकीचे आव्हान पेलवायचे आहे. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरल्यामुळे सध्या मतदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाजूने देखील जाण्याची शक्यता आहे. भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आल्यास शिवसेनेची मतं इथे वळण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते आहे. २०१७ मध्ये मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल पाहता शिवसेना – ९९, भाजप – ८३, काँग्रेस – ३०, राष्ट्रवादी – ८, समाजवादी पार्टी – ६, मनसे – १, एमआयएम – २ आहे, तर २०१७ च्या निवडणुकीत मनसेतून ६ नगरसेवक गेल्याने शिवसेनेची संख्या वाढली होती. आताच्या महापालिका निवडणुकीत मात्र भाजप एकहाती सत्ता घेण्याच्या तयारीत आहेत, हे मात्र खरं. पण विशेष म्हणजे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कौल भाजप आणि शिंदे गटाकडे जाईल असेच वाटते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -