जोधपूर (वृत्तसंस्था) : नवीन स्क्वाड्रनमध्ये सामील होण्यासाठी स्वदेशी हेलिकॉप्टर रुद्र जोधपूरमध्ये पोहोचले असून वायुसेना दिन सोहळ्यात सामील होणार आहे. सहा वैमानिकांनी ती बंगळुरूहून जोधपूरला नेली.
हवाई दलातील स्वदेशी लढाऊ हेलिकॉप्टरची पहिला स्क्वाड्रन जोधपूरमध्ये तयार होईल. त्यासाठी आणखी ७ हेलिकॉप्टर वायुसेना दिनापूर्वी तेथे पोहोचतील. रुद्रसाठी बंगळुरूमध्ये १५ हून अधिक वैमानिकांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. ही पहिली बॅच आहे. नंतर दुसरी तयार होईल. ८ ऑक्टोबरला वायुसेनादिनी सोहळ्यात ही लढाऊ हेलिकॉप्टर हवाई दलात दाखल होतील. त्या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
हवाईदलाचे प्रमुख एअर मार्शल व्ही.आर. चौधरी त्यासाठी जोधपूरला येतील. पश्चिम आघाडीवरील सर्वात मोठा बॅकअप एअरबेस असल्याने येथे ही हेलिकॉप्टर तैनात होत आहेत. देशात तयार या हेलिकॉप्टरचे ४५ टक्के भाग सध्या देशातच विकसित असून ते ५५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे नियोजन आहे.