Monday, July 15, 2024
Homeकोकणरायगडसमुद्रातील वादळी स्थितीमुळे मासेमारीला जाण्याचा निर्णय रद्द

समुद्रातील वादळी स्थितीमुळे मासेमारीला जाण्याचा निर्णय रद्द

२०० हून अधिक बोटी आगरदांडा-दिघी बंदरात नांगरून उभ्या

नांदगाव-मुरुड (वार्ताहर) : गेल्या आठवड्यापासून अरबी समुद्रात वादळी वारे वाहत असून समुद्रात लाटांचे तांडव सुरू आहे. ही परिस्थिती कमी जास्त होत असून आठवडाभर मासेमारी बंद होती. सोमवारी गुजरात राज्यातील काही नौका मासेमारीस गेल्याचे दिसून आले. मात्र तरीही सोमवारी मुरूड- एकदरा येथील मच्छीमारांनी वादळी वारे आणि अक्राळविक्राळ रूप धारण केलेल्या समुद्राचा आढावा घेऊन पुढील तीन दिवस समुद्रात मासेमारीस न जाण्याचा निर्णय घेल्याची माहिती मुरूड येथील नौका मालक हितेंद्र कुलाबकर, रणजित बळी, नरेंद्र सवाई यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

या सर्वांनी सांगितले की, सोमवारी बाहेरच्या आणि आपल्या भागातील २०० पेक्षा अधिक नौका आगरदांडा-दिघी बंदरात नांगरून उभ्या आहेत. वादळाचा धोका टळलेला नाही, असे स्पष्टपणे दिसत आहे. तरीही काही अतिउत्साही मच्छीमार मासेमारीस जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे अंत्यत धोकादायक आहे. वादळाचा इशारा हवामान खात्याकडून तसेच प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ यांच्याकडून देण्यात आलेला आहे. खोल समुद्रातील वादळ किनाऱ्यावर दिसून येत नाही. परंतु भर समुद्रात त्याचा मोठा जोर आहे.

सध्या वादळी वारे समुद्रात वाहत आहेत. पाऊस, वारे, मोठया उसळत्या लाटा अशी स्थिती असल्याने मच्छमारांनी धोका पत्करु नये असे मत वरील तिन्ही नौका मालकांनी व्यक्त केले. मुरूड- एकदरा खाडीत देखील काही नौका आलेल्या आहेत.आता सर्वच मच्छीमार वादळी परिस्थितीचा अंदाज घेऊनच पुढील मोहीमेवर निघतील अशी माहिती काही मच्छीमारांनी दिली. कारण पुढील तीन दिवस वादळाची द्रोणिय स्थिती कायम राहील असे मत बुजुर्ग मच्छीमारांनी देखील व्यक्त केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -